एम सी स्टॅन : इन्स्टा आणि यूट्यूबवर कोट्यवधी फॉलोअर्स असलेला हा पुणेकर रॅपर नेमका कोण आहे?
सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (12:22 IST)
facebook
रॅपर एम सी स्टॅन बिग बॉस-16 चा विजेता ठरला. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट या टॉप 5 स्पर्धकांमध्ये बिग बॉस 16 चा महाअंतिम सोहळा रंगला होता.
शिव आणि स्टॅन या दोन मित्रांमध्ये जेतेपदाच्या करंडकासाठी चुरस होती. अखेर सूत्रसंचालक सलमान खानने स्टॅन विजेता ठरल्याचं जाहीर केलं.
19 आठवड्यानंतर स्टॅनने जेतेपदावर नाव कोरलं आहे. जेतेपदासाठी मराठमोळ्या शिव ठाकरेचं नाव चर्चेत होतं. पण व्होटिंगमध्ये स्टॅनला अधिक मतं मिळाली.
मराठी बिग बॉसविजेत्या शिव ठाकरेला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पाठिंबा मिळाला होता. टॉप-3मध्ये पोहोचलेल्या प्रियंका चौधरीने बाहेर पडताना शिवला पाठिंबा दिला होता.
कोण आहे एम सी स्टॅन?
एम सी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. तो फक्त 23 वर्षांचा आहे. पुण्यातल्या ताडीवाला रोड या भागात स्टॅनचं बालपण गेलं. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या भागात लहानाचा मोठा झालेल्या स्टॅनने सातवीतच रॅपर व्हायचं ठरवलं. अमुक क्षेत्रात जावं, कॉर्पोरेट नोकरी करावी असं कधीच त्याला वाटलं नाही.
मोठ्या भावाच्या माध्यमातून स्टॅनला संगीताची गोडी लागली. सायबर कॅफेत बसून रॅप संस्कृतीबद्दल स्टॅनने वाचलं, पाहिलं.
हिप हॉप चळवळीचा तो भाग झाला. एकीकडे रॅपरसारखा वेगवान आणि आधुनिक प्रकाराचा पाईक असणाऱ्या स्टॅनने पारंपरिक कव्वालीच्या माध्यमातून सूर आणि ताल समजून घेतले. कव्वालीचा खूप प्रभाव असल्याचं स्टॅन सांगतो.
लोकांना अन्य माणसांच्या आयुष्याबद्दल वाचत बसायला, पाहायला वेळ नसतो. पण जे लोक वेळ काढतात त्यांच्यासाठी स्टॅनने तडीपार हा ऑडियो व्हिज्युअल प्रोजेक्ट तयार केला.
सहा गाणी आणि सहा व्हीडिओच्या माध्यमातून स्टॅनने आपली गोष्ट चाहत्यांसमोर मांडली आहे. त्याचं पुण्यातलं आयुष्य, पोलिसांबरोबरचे अनुभव, प्रसिद्धी, पुण्याहून मुंबईला येणं अशा अनेक गोष्टी या सादरीकरणात आहेत.
बोलण्याच्या वेगळ्याच ढंगामुळे स्टॅन लक्ष वेधून घेतो. बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर स्टॅन सुरुवातीचे काही आठवडे घरातल्या लोकांमध्ये फारसा मिळूनमिसळून नव्हता. त्याचे फार मित्रही नव्हते.
सुरुवातीच्या काही दिवसात उद्धट वाटणाऱ्या बोलण्यामुळे त्याचं आणि शिव ठाकरेचं भांडणही झालं होतं. पण नंतर दोघे मित्र झाले. शिवच्या बरोबरीने अब्दू रोझिक साजीद खान, गोरी नागोरी यांच्याशीही त्याची गट्टी जमली.
स्टॅनने बिग बॉसच्या प्रवासादरम्यान शेमडी शब्द अनेकदा वापरला. रणवीर सिंग, विकी कौशल, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक सेलिब्रेटी त्याचे चाहते झाले.
स्टॅनसह शिव, अब्दू, साजीद खान, सुंबल तौकीर आणि निमरीत कौर अहलुवालिया या कंपूला 'मंडळी' असं नाव पडलं होतं.
facebook
"स्पर्धकांनी आम्हाला मंडळी हे नाव दिलं. बिग बॉस संपलं पण मी मंडळींच्या संपर्कात राहीन. साजीद सरांनी व्हीडिओ शूट करूया असं म्हटलं होतं. मंडळींकडून मी खूप काही शिकलो," असं स्टॅनने सांगितलं.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला बिग बॉसच्या घरात आयोजित कॉन्सर्टमध्ये स्टॅनने परफॉर्म केलं आणि चाहत्यांची मनं जिंकून घेतली.
बिग बॉसच्या घरातील लोकांचं टोकाचं व्यक्त होणं पाहून घाबरून जायला होत असे असं स्टॅनने सांगितलं. "क्षुल्लक मुद्यांवर घरातली माणसं भांडायची. ते असे विचित्र का वागत आहेत हे कळायचं नाही. मी इथे मिसफिट असल्यासारखं वाटायचं. मी खरा संघर्ष पाहिला आहे, त्यामुळे बिग बॉसच्या घरातल्या लोकांचं वागणं अपरिपक्व वाटायचं," असं स्टॅन म्हणाला होता.
अनोखी केशरचना, गळ्यात साखळ्या, बोटात अंगठ्यासदृश दागिने, बोकड दाढी, डोळ्याला चष्मारुपी गॉगल, पायात स्टायलिश बूट हा स्टॅनचा वेश असतो. मराठी-हिंदी मिश्रित इंग्रजी बोलणारा स्टॅन तरुणाईला आपलासा वाटतो.
"हा रॅप कम्युनिटीचा विजय आहे. पब्लिकचा विजय आहे. मी जिंकेन असं वाटलं नव्हतं. शिव जिंकेल असं वाटलं होतं. विजेता झाल्यावर रडावं की आनंद व्यक्त करावा काही कळेना. बिग बॉसच्या घरात शांत राहिलं की कमकुवत आहे असं लोकांना वाटतं. घरच्यांची आठवण यायची पण मी कोणाला सांगितलं नाही," असं स्टॅनने सांगितलं.
"शिवने मला प्रेमाने सांभाळलं. शिव एकदम साफ मनाचा आहे. तोही जिंकण्याचा हकदार होता. शिव माझ्या भावासारखा आहे," असं तो म्हणाला.
"इतके दिवस बिग बॉसच्या घरात राहणं सोपं नाही. काही दिवसांनी डोळ्यातून अश्रू येणंही बंद होतं. मन कठोर होतं. मी घरात बाथरुममध्ये जाऊन रडत असे," असं तो म्हणाला.
"आम्ही इतिहास घडवला. स्पर्धेदरम्यान जसा आहे तसाच राहिलो. हिपहॉपला नॅशनल टीव्हीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. आईचं स्वप्न पूर्ण केलं. पुण्याला जिंकून दिलं. ज्यांनी ज्यांनी प्रेम, पाठिंबा दिला सगळ्यांचा माझ्यावर हक्क आहे," असं स्टॅनने म्हटलं आहे.
सोशल मीडिया स्टार
इन्स्टाग्रामवर 7.8 मिलिअन फॉलोअर्स आहेत. पण तो स्वत: कोणालाही फॉलो करत नाही. तर युट्यूबवर त्याच्या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. त्यातून तो लाखो रुपये कमावत असल्याचीदेखील चर्चा आहे.
एम सी स्टॅन बीट बॉक्सिंग आणि बी-बोईंगही करत असे. बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याला स्टॅनचे वडील उपस्थित होते. स्टॅन विजेता घोषित झाल्याचं कळताच ते भावुक झाले. सर्वसाधारण कुटुंबात त्याचा जन्म झाला. अभ्यासापेक्षा गाण्याकडेच त्याचं लक्ष असायचं. 12व्या वर्षी त्याने कव्वाली गायला सुरुवात केली. देशातल्या अव्वल रॅपर्सबरोबर स्टॅन गाणी सादर करतो. पैसे नसल्याने अनेकदा त्याने रस्त्यावरती रात्र काढली आहे. पण स्टॅनने हार मानली नाही. 'अस्तगफिरुल्लाह' हे त्याचं प्रसिद्ध गाणं. या गाण्यात स्टॅनने आपल्या संघर्षाबाबत सांगितलं. 'वाटा' नावाच्या गाण्याने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. युट्यूबवर या गाण्याला 21 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.