शाहरुख खानला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (15:02 IST)
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक संकटाचा सामना करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला एका प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला आहे. शाहरूख खान याच्याविरुद्ध दाखल याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २०१७ रोजी शाहरूख खान रईस या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना गुजरातच्या बडोदा रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. या प्रकरणी शाहरूख खान याच्या विरुद्ध दाखल याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
 
शाहरूख खानलाविरुद्ध २०१७ रोजी दाखल एका गुन्हेगारी याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळत दिलासा दिला आहे. रईस या चित्रपटाच्या प्रमोशनाचा भाग म्हणून शाहरूख खानने बडोदापर्यंत रेल्वेप्रवास केला होता. त्यादरम्यान रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. बडोदा स्थानकावर एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. शाहरूखविरुद्ध कथितरित्या दुसऱ्यांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.
 
न्यायमूर्ती निखिल करील यांनी शाहरूख खान विरुद्ध गुन्हेगारी प्रकरण आणि बडोद्याच्या एका न्यायालयाकडून त्याच्याविरुद्ध जारी समन्स फेटाळण्याची मागणी करणारी याचिका स्वीकारली. खालच्या न्यायालयाने दंड प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम २०४ अंतर्गत शाहरूख खानला समन्स जारी केला होता. त्यानंतर शाहरूख खानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे वृत्त बाहेर येताच शाहरूख खान समर्थक आणि फॅन्सनी आनंद व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती