आर्यन खानचा जामीन फेटाळताना कोर्टानं दिली ही 7 कारणं

गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (09:05 IST)
आर्यन खानचा जामीन अर्ज मुंबईच्या सेशन्स कोर्टाने आज (20 ऑक्टोबर) फेटाळून लागलाय.
 
न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानची जामीन याचिका फेटाळून लावल्याचा आदेश दिला. त्यानंतर आर्यन खानच्या वकीलांनी तात्काळ मुंबई हायकोर्टात अपील दाखल केलं. यावर गुरुवारी (21 ऑक्टोबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
 
आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चॅट आणि मुनमुन धामिचा यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आलाय.
2 ऑक्टोबरला नार्कोटिक्स कंटृोल ब्यूरोने आर्यन खानला कथित क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती.
 
या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आर्यन खान सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेल आहे.
आर्यन खानचा जामीन का फेटाळण्यात आला? कोणत्या कारणांमुळे कोर्टाने जामीन याचिका नामंजूर केली?
 
न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानची जामीन याचिका का फेटाळण्यात आली याबाबत आपल्या आदेशात खालील मुद्दे नमूद केले आहेत -
 
1. आरोपी नंबर 1 (आर्यन खान ) आणि आरोपी नंबर 2 ( अरबाज मर्चंट) मित्र आहेत. दोघांनी आपल्या जबाबात जवळ ड्रग्ज असल्याचं आणि सेवन केल्याचं मान्य केलंय. त्यामुळे आर्यन खानला अरबाजकडे ड्रग्ज असल्याची माहिती होती.
 
2. कोर्टाला दाखवण्यात आलेल्या Whats App चॅटवरून दिसून येतं की, आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) अज्ञात लोकांसोबत ड्रग्जबाबत चॅट आहेत. जास्त प्रमाणात ड्रग्ज आणि हार्ड ड्रग्जबद्दल बोलण्यात आलंय. प्राथमिक पुराव्यांनुसार आर्यन खानचे ड्रग्जशी संबंधित लोकांसोबत संबंध होते.
 
3. What's App चॅट मधून दिसून येतं की आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्ससोबत संबंध आहेत
 
4. आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केला.
 
5. आरोपी ड्रग्जशी संबंधित मोठ्या नेटवर्कचे भाग आहेत
 
6. आर्यन खानची जामीनावर मुक्तता केली तर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो या सरकारी पक्षाच्या युक्तिवादाशी सहमत आहे.
 
7. What's App चॅटवरून आरोपी नंबर 1 (आर्यन खान) ड्रग्ज कारवायांशी संबंधित आहे असं दिसून येतं. जामीनावर असताना पुन्हा असा गुन्हा करणार नाही असं म्हणता येणार नाही
 
त्यामुळे या आरोपांना जामीन देणं योग्य ठरणार नाही
 
आर्यन खानने जामीन याचिकेत काय म्हटलं होतं?
मी निर्दोष आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने गुंतवण्यात आलं आहे, असं आर्यन खानने याचिकेत म्हटलं होतं.
 
माझ्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कलम 37(1) लागू होत नाही, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
आर्यन खानचा ड्रग्ज तयार करणं, खरेदी, विक्री, ड्रग्ज जप्त होण्याशी आणि ड्रग्जच्या व्यापाराशी काहीही संबंध नाही असं याचिकेत म्हणण्यात आलं होतं.
 
एनसीबीने जामीनाला विरोध करताना काय म्हटलं?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामीनाला पहिल्यापासून विरोध केला होता.
 
आर्यन खानने ड्रग्ज खरेदी केले आणि तो ड्रग्जचं सेवन करणार होता. आर्यन खान, अरबाज मर्चंटकडून ड्रग्ज घेत होता, असा युक्तिवाद NCB ने कोर्टात केला होता.
 
आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित लोकांच्या संपर्कात होता असाही दावा NCB ने कोर्टात दावा केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती