BiggBoss13 अखेर सिद्धार्थ शुक्लाने विजेतेपद पटकावले!

रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (10:47 IST)
सर्वाधिक वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय ठरलेल्या कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रियालिटी शोने गेल्या ४ महिन्यात टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले. सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या या पर्वाचे विजेतेपद अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने पटकावले. सिद्धार्थ या पर्वात अनेक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. मात्र त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनातही त्याने स्थान मिळवले आणि त्या जोरावरच ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यासोबतच सिद्धार्थने ४० लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि कारदेखील जिंकली.
 
गेल्या चार महिन्यापासून हे पर्व सुरू होते. या वादग्रस्त शोच्या टॉप थ्रीमध्ये सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज आणि शहनाज गिल यांनी स्थान मिळवलं होतं. त्यानंतर शहनाज बाहेर पडली आणि सिद्धार्थ व आसीममध्ये अंतिम सामना रंगला. या दोघांसाठी १५ मिनिटांचं लाईव्ह वोटिंग घेण्यात आलं. त्यात सिद्धार्थच्या बाजूने सर्वाधिक मतं पडली.
 
बिग बॉसच्या घरातून सर्वात आधी पारस छाब्राने संधी साधत काढता पाय घेतला. आपण जिंकू शकत नाही, असे ज्या स्पर्धकाला वाटते त्याने एक्झिट घेतल्यास १० लाख रुपये मिळतील, अशी ऑफर शोचा होस्ट सलमान खान याने दिली होती. ती पारसने स्वीकारली. पारस आऊट झाल्यानंतर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंग यांच्यात खऱ्या अर्थाने अंतिम फेरी रंगली. आरती, रश्मी देसाई, शहनाझ अशा क्रमाने स्पर्धक बाद झाले आणि अंतिम टक्कर सिद्धार्थ शुक्ला व असिम रियाज यांच्यात झाली. ‘बिग बॉस’चा अंतिम सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. सलमान खानने या सोहळ्यात रंग भरले. एकापेक्षा एक सरस अशा सादरीकरणासोबतच स्टेजवर अनेक स्टंटदेखील रंगले. शिवाय भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी देखील अंतिम फेरीत हजेरी लावली होती. सलमान त्यांच्यासोबत क्रिकेटही खेळला. दरम्यान, ‘बिग बॉस १३’चे विजेतेपद पटकावल्यानंतर सोशल मीडियावरून सिद्धार्थ शुक्लावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती