सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला विजेतेपद

शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (15:35 IST)
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वात प्रथमच समावेश करण्यात आलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने वर्चस्व राखला. महाराष्ट्राने 21 वर्षाखालील गटात सर्वसाधारण विजेतेपद तर, 17 वर्षाखालील गटात संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
 
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या संकुलातील वेलोड्रमवर झालेल्या सायकलिंगच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एका सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि तीन कांस्पदकांची कमाई केली. आशियाई विजेता असलेला सातार्‍याचा मयूर पवार आजही ट्रॅकचे आकर्षण ठरला. आपल्या वेगवान सायकलिंगने त्याने केरिन सारख्या  आकर्षक सायकल शर्यतीतही स्पर्धकांना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. अभिषेक काशीदने मोडलेल्या चाकासह हातात सायकल घेऊन अंतिम रेषा गाठली. त्यामुळे त्याला रौप्यपदक देण्यात आले.
 
मुलींच्या याच स्पर्धा प्रकारात पश्चिम बंगालच्या त्रियाशा पॉल हिने निर्विवाद वर्चस्व राखले. तिने आपल्या   प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत सुवर्णपदक पटकाविले. पण, तिच्या नंतर मयूरी लुटे आणि शशिकला आगाशे यांनी अंतिम रेषा गाठताना रौप्य आणि कांस्पदकाची कमाई केली.
 
मुलांच्या 17 वर्षांखालील गटात 200 मीटर वैयक्तिक स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राचा मंगेश तालमोगे कांस्पदकाचा मानकरी ठरला. ही शर्यत अंदमानच्या डेव्हिड बेकहॅमने 10.891 सेकंद वेळ देत जिंकली. मणिपूरचा राहुल सिंग (11.406 सेकंद) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला आणखी एक कांस्पदक शुशिकला आगाशे, वैष्णवी पिल्ले, मधुरा वायकर आणि अंजली यांनी 21 वर्षांखालील गटात मुलींच्या टिम परस्यूट प्रकारात मिळवून दिले. या चौघींचा महाराष्ट्र चमूने 5 मिनिट 41.791सेकंद अशी वेळ देताना हे पदक मिळविले. ही शर्यत कर्नाटकच्या संघाने जिंकली. यजमान आसाम संघ रौप्यदकाचा मानकरी ठरला.
 
या यशस्वी खेळाडूंची महाराष्ट्रातील क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती