अनलॉक 1 : रेल्वे, बस, विमानानं प्रवास करण्यासाठीचे नियम कोणते?
मंगळवार, 9 जून 2020 (13:15 IST)
भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसागणिक वाढतोच आहे. मात्र, तरीही देश अनलॉक करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत. लॉकडाऊन-5 हा त्यातलाच एक मोठा टप्पा आहे.
लॉकडाऊनच्या या टप्प्यात वेगवेगळ्या सवलती दिल्यामुळे याला अनलॉक-1 असंही म्हटलं जात आहे.
देशात रेल्वे आणि विमान वाहतूक आधीप्रमाणे नियमित आणि सातत्यपूर्ण सुरू झाली नसली, तरी थोड्याफार प्रमाणात सुरू करण्यात आलीय.
मात्र, रेल्वे असो, विमान असो, बस वा कार असो, प्रत्येक प्रवासाच्या बाबतीत अजूनही काही नियम-अटी कायम आहेत. महाराष्ट्र सरकारनेही 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेतच. त्या काय आहेत, ते आपण थोडक्यात पाहूया...
सर्वच प्रवाशांसाठी प्राथमिक अटी :
तुम्ही कुठल्याही कंटेनमेंट झोनमधून आलेले नसाल आणि कुठल्याही कंटेनमेंट झोनमध्ये जाणार नसाल.
गेल्या दोन महिन्यात तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झालेली नसावी
तुमच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नसावीत आणि सध्या तुम्ही क्वारंटाईनमध्ये नसायला हवेत
तुमच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असणं पूर्वी बंधनकारक करण्यात आलं होतं. आता ते डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात तुम्ही निरोगी असल्याची खात्री पटवणं आवश्यक आहे.
हे निकष पूर्ण केल्यावरच तुम्ही कुठेही प्रवास करू शकता. मात्र, या प्रवासात सोशल डिस्टन्सिंगच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं, मास्क तसंच हँड सॅनिटायझरचा वापर करून योग्य ती खबरदारी घेणं सक्तीचं असेल.
खासगी वाहनांसाठी काय आहेत अटी?
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना ई-पाससाठी अर्ज करण्याची गरज नाहीय. मात्र, इतरांना राज्यात आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हात जाण्यासाठी) प्रवासासाठी आजही ई-पासची गरज आहे.
सध्या अत्यावश्यक आणि गरजेच्या कामांसाठीच ई-पास दिले जात आहेत. त्यामुळे सहकुटुंब सहलीचे बेत आखू नका. कारण या पासचा गैरवापर करणं गुन्हा आहे.
तुम्ही गटाने प्रवास करणार असाल, तर वाहनांची माहिती, सर्व प्रवाशांची माहिती आणि प्रवासाचा हेतू इत्यादी माहिती या अर्जासाठी द्यावी लागते.
मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात MMR मध्ये येणाऱ्या सर्व नऊ महापालिका क्षेत्रांमध्ये आता ई-पासची गरज नाही. त्यामुळे MMR भागामध्ये आता कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवास करता येणार आहे.
जर तुम्ही आंतरजिल्हा प्रवास करून घरी किंवा गावी परत जाणार असाल, तर तुम्हाला नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून, मग तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावं लागेल.
ई-पास मिळवण्यासाठी या साईटला भेट द्या - https://covid19.mhpolice.in/
एसटी बसेस
आता विविध शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती तसंच खासगी कार्यालयांमध्ये 10 टक्के उपस्थिती ठेवून कामकाज सुरू करण्यात येणार असल्यामुळे शहरातल्या शहरात प्रवासाला पासची गरज नाही.
मात्र, अनेकांकडे स्वतःची वाहनव्यवस्था नसल्यामुळे शासनाने नियमित स्वरूपात बसेसची व्यवस्था केली आहे. तसंच स्थलांतरित लोक, विद्यार्थी आणि देवदर्शनासाठी आंतरजिल्हा प्रवास करू पाहणाऱ्यांना ई-पासची गरज असेल.
जर तुम्ही आंतरजिल्हा प्रवास करून घरी किंवा गावी परत जाणार असाल तर तुम्हाला नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून, मग तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावं लागेल.
रेल्वे प्रवासाचे नियम
सध्या केंद्र सरकारतर्फे परराज्यात अडकलेल्या स्थलांतरितांसाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी श्रमिक आणि स्पेशल रेल्वेच सोडल्या जात आहेत. IRCTC च्या वेबसाईटवरून त्यांना तिकीट बुक करण्याची सोय आहे.
तुम्ही रेल्वेने प्रवास करून घरी किंवा गावी परत जाणार असाल तर तुम्हाला नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून, मग तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावं लागेल.
रेल्वे प्रवास कोणकोणत्या मार्गांवर सुरू झाला आहे? वाचा ही बातमी -1 जूनपासून 'या' ट्रेन्सचा महाराष्ट्रातून देशभरात प्रवास सुरू
विमान प्रवासाचे नियम
सध्या मर्यादित शहरांमध्ये दररोज उड्डाणं सुरू झाली आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांनजिकच्या लहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये प्रवास करणं सोयीस्कर झालं आहे.
पण विमान प्रवास करताना काही विशेष सूचनांचं पालन केलं जात आहे. काही एअरपोर्ट्सवर अगदी सुरुवातीलाच तुमचं सामान सॅनिटाईझ केलं जातं.
एअरपोर्टवर प्रवेश करताना तुमचं शारीरिक तापमान चेक केलं जातं, त्याशिवाय तुमच्या फोनमध्ये असलेलं आरोग्य सेतू ऍपसुद्धा बघितलं जातं.
तुम्ही तिकीट ऑनलाईन बुक केल्यावर प्रवासाच्या किमान चार तासांपूर्वी तुम्हाला वेब चेक-इन करणं बंधनकारक आहे. म्हणजे ऑनलाईन तुमची जागा निश्चित करणे गरजेच आहे. तुम्ही बोर्डिंग पास प्रिंट केलं तर बरं, नाही तर एअरपोर्टवर किओस्क असतात ज्यात PNR नंबर टाकून तुम्ही तुमचं बोर्डिंग पास मिळवू शकता.
त्यासोबत तुम्हाला एक बारकोड असलेलं लगेज टॅग प्रिंट करण्यास सांगितलं जातं. चेकइन लगेज म्हणजे जे विमानात खाली दिलं जातं, त्याला हे टॅग लावावं लागतं. जर तुम्हाला हे प्रिंट करणं शक्य नसेल तर तुमची प्राथमिक माहिती म्हणजे नाव, कुठून कुठे प्रवास करत आहात ते, तसंच PNR ही माहिती एका कागदावर प्रिंट करून तो कागद आपल्या लगेजवर चिटकवता येईल.
एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांना तुमच्या बॅगला हात लावण्याची कमीत कमी गरज पडावी, म्हणून ही प्रक्रिया टचलेस करण्याचा प्रयत्न एअरपोर्ट प्रशासनाचा आहे. मात्र काही एअरपोर्टवर अजूनही ही सोय पूर्णपणे कार्यान्वित होण्यास वेळ लागत असल्यामुळे अजूनही पूर्वीप्रमाणे चेकइन काऊंटरवरील कर्मचारी तुमच्या सामानाला टॅग लावेल.
याशिवाय, एक महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे वेब चेकइन सोबतच तुम्हाला एक सेल्फ हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म भरण्यास सांगितला जातो. त्यात तुमची माहिती म्हणजेच नाव, संपर्क, तुम्ही कुठे राहणार आहात, इत्यादी माहिती मागितली जाते. तसंच तुम्ही निरोगी असल्याचंही त्यात कबूल करावं लागतं. आणि गरज पडल्यास विमान कंपनी तुम्हाला संपर्क करू शकते, अशी अट तुम्हाला मान्य करावी लागते.
विमानात प्रवास करताना तुम्हाला मास्क पूर्णवेळ घालणं बंधनकारक आहेच, शिवाय तुम्हाला एक शील्ड दिलं जातं, कारण मधली सीट रिकामी ठेवणं शक्य नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग शक्य नसतं. त्यामुळे अतिरिक्त सुरक्षाकवच म्हणून हे प्लास्टिकचं शील्ड दिलं जातं.
जिथे तुम्ही पोहोचणार आहात, त्या एअरपोर्टवर पोहोचल्यावर पुन्हा तुमचं तापमान चेक केलं जातं आणि त्यानंतर तुमच्या डाव्या हातावर शिक्का मारला जातो. या शिक्क्यानुसार 14 दिवस होम क्वारंटाईन होणं बंधनकारक असेल.
अतिमहत्त्वाच्या कामासाठी विलगीकरण कक्षात राहण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. जे प्रवासी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी राज्यात राहणार आहेत, त्यांना क्वारंटाईन होण्यापासून सूट दिलेली आहे. पण त्यासाठी संबंधित प्रवाशाला रिटर्न तिकीट दाखवणं गरजेचं आहे.
(महत्त्वाचं - हे सर्व नियम महाराष्ट्रपुरते आणि 8 जूनपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशांनुसार आहेत. तुम्हाला महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिथल्या स्थानिक सरकारचे नियम आधी माहिती करून घेणे.)