कोरोनानंतरच्या काळात तुमच्या मुलांच्या शिक्षण पद्धतीत होणार 'हे' मोठे बदल

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (16:47 IST)
- प्रियंका दुबे
बुद्धिबळ शिक्षिका अनुराधा बेनीवाल या इंग्लंड आणि भारतातल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. लंडनमधल्या उच्चभ्रू घरातल्या मुलांना शिकवण्यापासून ते भारतातल्या दुर्गम भागातील सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांचा अनुभव कोरोनानंतर पूर्णपणे बदलला आहे. 
 
भारतात डिजिटल शिक्षणासाठी डिजिटल साधनं उपलब्ध असणं अतिमहत्त्वाचं ठरलं आहे. भारतासाठी हे एक आव्हान आहे.
 
सध्या अस्तित्वात असलेली शैक्षणिक धोरणं बदलण्याची गरज असल्याचं, असं फोनवरील मुलाखतीदरम्यान बेनीवाल यांनी बीबीसीला सांगितलं.
 
"मी लंडनमध्ये जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यांचा 'झूम'वर क्लास घेते. इथं बहुतेक विद्यार्थ्यांना स्वत:ची खोली असते, तसंच त्यांच्याकडे लॅपटॉप किंवा टॅबलेट्स असतात. यांतील बहुतेक मुलं ही तंत्रस्नेही असतात." आता दिल्लीत अनेक शाळा आणि विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचा याबाबतचा अनुभव वेगवेगळा आहे.
 
"अनेक ठिकाणी ऑनलाईनकडे वळतं होणं आमच्यासाठी सोपं ठरलं. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लगेच आम्ही ऑनलाईनकडे वळालो. जवळपास सगळे वर्ग गुगल मीट किंवा झूमवर घेतले जात होते," दिल्लीतल्या अशोका यूनिव्हर्सिटीतील प्राध्यापक सैकत मजूमदार सांगतात.
 
"पण, असं असलं तरी विद्यापाठीत काही विद्यार्थी असे आहेत, ज्यांना इंटरनेट कनेक्शनविषयी समस्या आहेत. यामध्ये काश्मीर आणि इतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा सामावेश आहे."
 
देशातील अनेक खासगी शाळांनी आता झूम अॅपवर वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. पण, ही फक्त तात्पुरती सोय आहे, असं अनेक पालकांचं म्हणणं आहे.
 
नाव न छापण्याच्या अटीवर एका दोन मुलांच्या पालकानं बीबीसीला सांगितलं, "माझे दोन्ही मुलं नियमितपणे झूमवरच्या शिकवणी वर्गाला हजेरी लावतात. पण, ऑनलाईन शिक्षणाच्या अनुभवाची गुणवत्ता ही ठीक आहे. शिक्षकाला विद्यार्थ्याशी वन-टू-वन संवाद साधायला इथं मर्यादा येते."
 
याशिवाय कॅम्पस एक्सपरियन्सची संकल्पना कोरोनामुळे पूर्णपणे बदलल्याचं विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं.
 
"आमचं पुढचं सत्र ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे. आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अभ्यासक्रम देत आहोत. पण, असं असलं तरी काही प्रमाणात हे काम आव्हानात्मक असणार आहे," सैकत सांगतात.
 
एकदा लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा कशा पद्धतीनं शाळा आणि विद्यापीठांनी सुरुवात करावी हा सुद्धा प्रश्न आहे. सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा मुद्दा आणि ज्या पद्धतीनं यूरोप, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या आहेत, त्यातून बोध घेता येऊ शकतो.
 
काही शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये ग्लास शीट वापरली आहे. काहींनी विद्यार्थ्यी शाळेच्या इमारतीत शिरल्यानंतर त्यांचं तापमान तपासणं अनिवार्य केलं आहे. पण, असं असलं तरी भारतासारख्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्य असलेल्या देशात शिक्षणाचं भविष्य विद्यार्थ्यांनुसार बदलण्याची शक्यता आहे.
 
ऑनलाईन शिक्षण प्रणाली कदाचित नवीन ट्रेंड असेलही, पण यामुळे वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात काय फरक पडेल?
 
"बऱ्याच मुलींची शाळेमुळे त्यांच्या घरातील कठीण अशा पेचातून सुटका झाली होती. शाळेत शिकण्यापलीकडे मित्रमंडळ, संवाद, दुपारचं जेवण या गोष्टीही होत्या. आता त्या संपण्यात जमा आहेत," अनुराधा सांगतात.
 
अनुराधा या दुर्गम भागात शिकवतात पण दिल्लीसारख्या ठिकाणीही परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.
 
9 वर्षांची राणी राजपूतनं दिल्लीतल्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. तिची आई राधा राजपूतनं बीबीसीला सांगितलं, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राणी ही घरात एकटीच बसून आहे.
 
"कामाच्या शोधात आम्ही उत्तर प्रदेशातून दिल्लीला स्थलांतर केलं. माझा नवरा रिक्षा चालवतो आणि मी मोलकरीण म्हणून काम करते. मोठ्या घरातली मुलं कॉम्प्युटरवर शिकत असल्याचं आम्ही ऐकलं आहे," राधा सांगतात.
 
"पण, आमच्याकडे तर स्मार्टफोनसुद्धा नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माझ्या मुलीच्या शाळेकडून आम्हाला काही सूचना मिळालेली नाहीये. आमच्या एका खोलीच्या घरात दिवसभर बसून राहणं तिला चिंताजनक वाटतं."
 
कोरोनानंतरच्या जगात शिक्षण क्षेत्रासमोर बरीच आव्हानं असणार आहेत. ऑनलाईन शिक्षणासोबतच इतर नवनवीन पर्याय शोधण्याचा जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी शिकू शकतील, प्रयत्न शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना करावा लागणार आहे.
 
रितेश सिंह हे Eckovation या सोशल लर्निंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत.
 
शिक्षणासाठी उन्नयन हे अॅप तयार केल्यामुळे रितेश यांना Prime Minister's innovation award मिळाला आहे. भारतातल्या 8 राज्यांमधील 12 लाख विद्यार्थी या अॅपचा वापर करत आहेत.
 
"ऑनलाईन लर्निंग आपल्याला परिणामकारक करायची असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याचं संदर्भीकरण आणि वैयक्तिकीकरण वेगवेगळ्या प्रकारे करावं लागेल," ते पुढे सांगतात.
 
"उदाहरणार्थ दिल्लीतल्या विद्यार्थ्यासाठी तयार केलेलं व्हीडिओ ट्यूटोरियल हे बारमेर किंवा लाटेहर सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी असंबद्ध ठरेल. तसंच जर तुम्ही एखाद्याची क्षमता नसतानाही त्याला त्रिकोणमिती शिकवणार असाल, तर त्याचा काहीएक उपयोग नसतो," रितेश सांगतात.
 
प्रादेशिक गरजा लक्षात घेऊन रितेश आणि त्यांची टीम एक अभ्यासक्रम तयार करत आहे. उन्नयन अपचं स्लोगन आहे 'मेरा मोबाईल मेरा विद्यालय'. यामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता तपासून त्यानुसार त्यांना त्यापद्धतीचं शिक्षण दिलं जातं.
 
पण, कोरोनानंतरच्या काळात स्मार्टफोन आणि इंटरनेट नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईल अप्लिकेशनच्या आधारे सुरू असलेली शैक्षणिक यंत्रणा अधिकाअधिक कशी पोहोचेल, हा प्रश्न आहे.
 
यामुळेच रितेश यांना टीव्ही फॉरमॅटचा विचार करावा लागला. आता ते काही राज्यांमध्ये टीव्ही माध्यमातून शिकवत आहेत.
 
ते सांगतात, "इयत्ता 9 वी आणि 12 वी साठी अभ्यासक्रमाशी संबंधित भागांची मालिका डीडी बिहार आणि झारखंडवर 20 एप्रिलपासून सुरू झाली आहे. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे आता आम्ही माध्यमिक शाळांच्या वर्गासाठी अभ्यासक्रम तयार करत आहोत. आम्ही राजस्थान सरकारसोबतही काम करत आहे. 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात टीव्ही क्लासही सुरू करण्यात आले आहेत."
 
पण, टीव्ही सेटसमोर विद्यार्थ्यांना एकसारखं बराच वेळ बसवून ठेवण्यात अनेक प्रॅक्टिकल अडचणी आहेत. यात घरातील वातावरण आणि लक्ष केंद्रित करण्यासंबंधीच्या अडचणी येतात.
 
"भविष्यात व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभ्यासाचं साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आमची योजना आहे. पण, आतापर्यंत या माध्यमातून आम्ही फक्त 30 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत," छाया बेन सांगतात.
 
छाया बेन या गुजरातमधील चिकोदरा येथे सरकारी कन्या शाळेत शिक्षिका आहेत.
 
"आमच्या शाळेतल्या 380 मुलींपैकी बहुसंख्य मुली या वंचित घटकातील आहेत. या मुलींच्या पालकांकडे स्मार्टफोन नाही, तसंच ते मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्षही देत नाहीत."
 
समाजाच्या एका टोकावर जे विद्यार्थ्यावर आहेत त्यांच्यासाठी कोरोनाची साथ म्हणजे वर्षभराची हानी किंवा शिक्षणातील दीर्घकालीन संधी असू शकते, त्या पुढे सांगतात.
 
आनंद प्रधान (24) हे भारतातील सर्वांत तरुण शिक्षण तत्ज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी ओरिसा या राज्यात International Public School of Rural Innovationची स्थापना केली आहे.
 
कोरोना नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्राशी निगडीत राहण्यासाठी बदलावं लागेल.
 
ते सांगतात, "ऑनलाईन शिक्षण हेच काय ते सत्य आहे आणि तेच समोर चालू राहणार आहे. त्यामुळे आता शाळांनी हे ठरवायचं आहे की कशापद्धतीनं यामध्ये सहभाग नोंदवता येऊ शकतो."
 
आनंद यांच्या शाळेत कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण विचारांवर भर दिला जातो. यामध्ये विद्यार्थी विज्ञानाधारित शेती, उद्योजकता शिकतात. आता जगाला नोकरी निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक गरज आहे, ना की नोकरी मागणाऱ्या, असं आनंद यांचं मत आहे.
 
"त्यामुळे मग प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्याधारित शिक्षण द्यायचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून एखादी अडचण आल्यास हेच विद्यार्थी त्यावर उपाय शोधतील."
 
पण, मग यामुळे extra-curricular activitiesलाही पाठ्यपुस्तकांइतकंच महत्त्व मिळेल, याची शाळा कशापद्धतीनं खात्री करणार, हा प्रश्न समोर येतो. विद्यार्थी ज्यापद्धतीनं खेळ आणि नृत्य आदी गोष्टी शिकायचे त्यात मोठा बदल दिसून येऊ शकतो. आता आपल्याला शाळेच्या मैदानावर विद्यार्थी सोलो स्पोर्ट्स खेळताना दिसू शकतील किंवा सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून मास्क घालून खेळतानाही दिसू शकतात.
 
बिजेंद्र हे हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी आहे. ते आपल्या शिक्षकांचं एक नेटवर्क तयार करून डिजिटल डिव्हाईड भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.
 
"आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून अधिकाअधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही व्हीडिओ आणि ऑडियो ट्यूटोरियल पाठवत आहोत. पण, यांतील अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातून येतात आणि त्यांचे पालक मजूरी करायला जातात. त्यामुळे ते त्यांचा फोन सोबत घेऊन जातात. या विद्यार्थ्यांना संध्याकाळी फोन मिळतो आणि तेव्हाच ते ऑनलाईन ट्यूटोरियलमध्ये सहभाग नोंदवू शकतात."
 
"अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही रात्री उशिरापर्यंत काम करतो. ऑडियो आणि व्हीडिओ कसा वापरायचा, हे आमचे शिक्षक शिकत आहेत. ही क्लिष्ट प्रक्रिया असली तरी त्याशिवाय दुसरा पर्यायही नाही."
 
गावात दूध भुकटीचं वितरण करत असताना बिजेंद्र आणि त्यांच्या टीमनं गावातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या परिस्थितीविषयी सर्वेक्षण केलं.
 
"समजा एखाद्याकडे डिजिटल साधनं नसतील, तरीही लोकांच्या नेटवर्कच्या माध्यमातून नोट्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असं असलं तरी हे आव्हानात्मक काम आहे. "
 
शाळा लहान असो की मोठी, कोरोनानंतरच्या काळात ऑनलाईन शिक्षण हे एक आव्हान असणार आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या काळात शिक्षण क्षेत्र एका आमूलाग्र बदलातून जाणार आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होईल, हे येणारा काळच सांगू शकेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती