अनंत चतुर्दशी: गणपती विसर्जनासाठी लातूरमध्ये पाणी नाही, मूर्ती दान करून गणपती बाप्पाला निरोप द्या पालिकेचं आवाहन

गुरूवार, 12 सप्टेंबर 2019 (10:57 IST)
हलिमाबी कुरेशी
अनंत चतुदर्शी हा बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात आज गणपती विसर्जन केलं जाईल.
 
लातूरमध्ये मात्र यंदा गणपती विसर्जनावर पाणीटंचाईचं सावट आहे. त्यामुळेच गणेश मूर्तींचं विसर्जन न करता त्यांचं दान करावं, असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
 
एकीकडे राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला असताना मराठवाडा मात्र तहानलेलाच आहे. ज्या लातूरला काही वर्षांपूर्वी रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती, त्या लातूरमध्ये यंदाही भीषण पाणी टंचाई आहे.
 
बहुतांश ठिकाणी विहिरीत तसंच धरणात पुरेसा पाणीपुरवठा नाहीये. उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखून ठेवावं लागणार असल्यानं गणपती विसर्जन करू नये, असं आवाहन लातूर महापालिका उपायुक्तांनी केलं आहे.
पाणीसाठे कोरडे ठणठणीत
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पुढचे दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्यानं हे आवाहन केल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
 
"यंदा लातूर जिल्ह्यात केवळ 50% पाऊस झाल्याने विहिरी, नदी, नाले कोरडेच आहेत. त्यामुळे मूर्ती विसर्जित करण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यानं प्रशासनाने मूर्तिदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर ज्यांना मूर्तिदान करायचं नाही अशा लोकांनी घरातच बादलीमध्ये मूर्ती विसर्जित करावी किंवा ती लातूर महापालिका प्रशासनाकडे द्यावी असंही सांगण्यात आलं आहे," असं जी श्रीकांत यांनी म्हटलं.
 
प्रशासनानं केलेल्या मूर्तिदानाच्या आवाहनाला सर्व गणपती मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
लातूर शहरामधील सिध्देश्वर जलकुंभात गणपती विसर्जन केलं जातं. मात्र हा जलकुंभ कोरडा ठणठणीत असल्याने यंदा इथं मूर्ती विसर्जन करणं शक्य नाही.
 
प्रशासनाने शहरातील जवळपास 150 सार्वजनिक गणपती मंडळांची बैठक घेऊन पाण्याची उपलब्धता आणि भविष्यातील स्थितीविषयी माहिती दिली. या बैठकीला लातूर शहरातील गंज गोलाई परिसरातील बाप्पा मंडळाचे सदस्य देखील उपस्थित होते.
 
"मूर्ती प्रशासनाला किंवा गणपती मूर्ती कलाकारांकडे दान करावी. ज्यांना आपल्या घरगुती गणपतीचं विसर्जन पाण्यात करायचं आहे, त्यांनी घरीच बादलीभर पाण्यात मूर्ती विसर्जित कराव्यात. ज्यांना आपल्या गणपती मूर्तीचं पाण्यातच विसर्जन करण्याची इच्छा आहे, त्यांच्या मूर्ती पाणी उपलब्ध झाल्यानंतर विधीवत विसर्जन केल्या जातील असं बैठकीत सांगितलं गेलं," अशी माहिती बाप्पा गणेश मंडळाचे सदस्य महेश कौळखेरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
बाप्पा गणेश मंडळाची मूर्ती पर्यावरणपूरक असून या मूर्तीचं छोट्याशा बादलीत विसर्जन केलं जातं. मूर्तीत वेगवेगळ्या वनस्पतींच्या बिया असतात. विसर्जनानंतर या बियांचं शेतात रोपण करण्यात येत असल्याचंही कौळखेरे यांनी सांगितलं.
 
'पाणी वाचवणं ही प्राथमिकता'
"लातूरमध्ये मागच्या वर्षी परतीचा पाऊस झाला नाही. यंदादेखील सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरणं, पाणी वाचवणं गरजेचं असल्याने गणपती मूर्तिदानाचा निर्णय एकत्रित घेण्यात आला आहे," अशी माहिती लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलं.
 
मूर्तिदानाचे पर्याय सांगताना निलंगेकर यांनी म्हटलं, की मूर्ती ज्यांच्याकडून घेतल्या त्यांना दान कराव्यात, प्रशासनाकडे दान करावं किंवा घरातच ठेऊन पूजाअर्चा करावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
 
पंधरा ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान लातूर मध्ये पाऊस होईल अशी आशा संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
 
पाण्याशिवायही विसर्जन शक्य?
मुळात पाणी टंचाई आहे, हे माहीत असताना मोठ्या मूर्तींचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न खगोल आणि पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी उपस्थित केला. अगदी दोन इंचांची मूर्ती केली तरी चालते. पृथ्वीची पूजा हा गणेश पूजेचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळेच आपण पार्थिव मूर्तीची पूजा असंच म्हणतो, असं सोमण यांनी सांगितलं.
 
पाणी टंचाईमध्येही विधीवत विसर्जन कसं करायचं याबद्दल सांगताना सोमण यांनी म्हटलं, की मूर्ती आणि निर्माल्यावर पाण्याचं प्रोक्षण केलं (पाणी शिंपडलं) तरी विसर्जन होतं. आपण उत्तरपूजेनंतर मूर्तीतलं देवत्व काढून घेतो, तसाच हाही प्रकार आहे. प्रोक्षण केलेली मूर्ती जमिनीत पुरुन ठेवली तरी चालते. मातीची मूर्ती मातीतच मिसळून जाते.
 
अनेकदा मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जित करावी असं सांगितलं जातं. त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्येच मूर्ती विसर्जनाकडे अनेकांचा कल असतो. हे धर्मसंमत आहे, हाच लोकांचा समज आहे. मात्र काळाप्रमाणे धर्मशास्त्रही बदलायला हवं, असं मत सोमण यांनी व्यक्त केलं.
 
पूर्वी मूर्तींची संख्या कमी होती. आकारानं मोठ्या मूर्ती बनवल्या जात नव्हत्या. अशावेळी वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जन करणं ठीक होतं. पण आता परिस्थिती तशी नाहीये. शिवाय नद्याही प्रदूषित झाल्या आहेत. अशावेळी नागरिकांना सामाजिक जबाबदारीचं भानही बाळगणं गरजेचं असल्याचं सोमण यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती