पेणवरून खोपोलीच्या दिशेनं वरसई नावाच्या गावाला जायला निघालं की एका रस्त्यावर एका बाजूला वरसई आणि दुसऱ्या बाजूला गागोदे अशा दोन पाट्या दिसायला लागतात. एका बाजूला माझा प्रवास लिहिणाऱ्या गोडसे भटजींचं आणि इतिहासतज्ज्ञ वि. का. राजवाडे यांचं वरसई गाव तर दुसऱ्या बाजूला साक्षात विनोबा भावे यांचं गागोदे.
गीताई आणि इतर पुस्तकांमधून विनोबा भेटले असले तरी त्यांच्या गागोद्याला जायला मिळेल असं वाटलं नव्हतं.
वरसईतल्या लोकांनी इथं आलाच आहात तर गागोद्यालाही जाऊन या असं सांगितलं, म्हणून तिकडे जायचं ठरवलं. या गागोद्याचे दोन भाग होते एक छोटं गागोदे आणि एक मोठं गागोदे. त्यातलं छोटं गागोदे पाण्याच जाणार होतं.
विनोबांचं घर मोठ्या गागोद्यात होतं. त्या गावातल्या लोकांची घरं वाचणार असली तरी काही शेतजमीन जाणार असल्याचं कळलं. त्यामुळे आता गागोद्याला जायलाच हवं असं पक्कं केलं. वरसईतल्याच एका रिक्षानं गागोद्याच्या फाट्यावर सोडलं.
कदाचित पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ असल्यामुळं दोन्ही गावांमध्ये शुकशुकाट दिसत होता. इथं विनोबांचं घर कुठं आहे हे विचारायला लागलंच नाही. एक चढ चढून गेल्यावर समोरच एक छान रंगवलेलं उत्तम घर समोर होतं. तेच विनोबांचं घर होतं.
एकदम स्वच्छ आवार, रंगवलेलं. लाकडाला तेल-पाणी केलेलं, सारवलेली जमीन असं ते नेटकं घर होतं. गावातल्या इतर घरांपेक्षा मोठं दिसत असल्यामुळं आणि या टापटिपीमुळे ते आणखी वेगळं दिसत होतं.
त्यांच्या घरासमोर गेल्यावर लक्षात आलं, आपल्याला विनोबांच्या संदर्भातील एखाद्या ठिकाणी अचानक जायला मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. पूर्वी एकदा तेलंगणमधल्या पोचमपल्ली गावात जातानाही अशीच वेळ आली होती. पोचमपल्ली हे 'इक्कत' साड्या तयार करणारं गाव हैदराबादपासून थोड्या अंतरावर आहे.
भूदान पोचमपल्ली
हैदराबादमधून बाहेर पडताना गुगलवर पोचमपल्ली असं सर्च करून पाहात होतो तर Bhoodan Pochampally अशी अक्षरं दिसू लागली. वाटलं कदाचित हे दुसरं गाव असावं. पण पोचमपल्ली गावालाच आता भूदान पोचमपल्ली म्हणून ओळखलं जात असल्याचं समजलं. याच गावात विनोबांनी भूदान चळवळीला सुरूवात केली असं तिथे गेल्यावर समजलं.
भारतभर फिरणारे विनोबा एकेदिवशी पोचमपल्लीला उतरले होते. तिथं भूदानाची कल्पना मांडल्यावर गावातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याने आपली जमीन दान देण्याचा निर्णय घेतला. झालं तेव्हापासून विनोबांचा भूदानाचा यज्ञ सुरू झाला. विनोबांच्या भूदान चळवळीनं स्वातंत्र्योत्तर काळात अत्यंत शांततेत एक सामाजिक क्रांतीच केली होती.
आजच्या काळात असं कोणी केलं असतं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या चळवळीला नक्की नावाजलं गेलं असतं. भूदान चळवळीत पहिलं पाऊल टाकणाऱ्या पोचमपल्लीला 'भूदान' बिरूद कायमचं मिळालं.
पोचमपल्लीचं ते डोक्यात घोळवतच विनोबांच्या घरात गेलो. आजही हे घर उत्तम स्थितीत ठेवण्यात आलं आहे.
विनोबांच्या घरात कोणीच नव्हतं. जवळच विनोबांची जन्मखोली आहे. तिथे त्यांची पत्रं, जन्मपत्रिका आणि काही वस्तूही आहेत. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला आंग्रे सरदारांनी भावे कुटुंबाला इथे जमीन दिली आणि त्यांना वास्तव्यास यायला सांगितलं. आंग्र्यांनी सनद दिल्यापासून या कुटुंबाचं गावाशी नातं जोडलं गेलं ते कायमचंच.
याच घरात 11 सप्टेंबर 1895 रोजी विनोबांचा जन्म झाला. बालपणीची पहिली दहा वर्षं या घरात गेल्यावर ते पुढे बडोद्याला गेले. त्यानंतर त्यांचा या घराशी फारसा संपर्क राहिला नाही. पण पुढे 1920 आणि 1936 साली ते काही दिवसांसाठी इथे राहायला आले होते. त्यांचा आयुष्याचा बहुतांश काळ भ्रमणामध्ये आणि उत्तरायुष्य पवनारला गेलं.
विनोबांच्या कुटुंबातील काही सदस्य इथं काही काळा राहात होते. स्वातंत्र्यानंतर विनोबांच्या कुटुंबानं आपली जमीन दान दिली आणि एकेदिवशी याच घरासमोर जमून गावकऱ्यांनी गागोदे ग्रामदानात सहभागी होत असल्याची घोषणा केली. या घरातून सर्वोदयी चळवळीचं काम चालवलं जातं. मधल्या काळात वेळोवेळी या घरात बदल करण्यात आले आहेत. पण विनोबांच्या वास्तव्यामुळं घराला एक वेगळं पावित्र्य मिळालेलं दिसतं.
गागोद्यानंतर ते बडोद्याला गेले. महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्यावर भगवत गीता आणि गांधीजी या दोन्हींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. साबरमतीलाही गांधीजींच्या आश्रमात ते राहिले. तिथे अजूनही 'विनोबा कुटी' आहे. आयुष्यभर ते धर्म, तत्वज्ञान, भाषा यांचा अभ्यास करत राहिले, उपासना करत राहिले.
पुढे आणीबाणीच्या काळात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीकाही झाली. 15 नोव्हेंबर 1982 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढच्या वर्षी त्यांना भारतरत्न सन्मान देण्यात आला.
मी गेलो होतो तेव्हा गागोदे एका वेगळ्याच कारणामुळं गाजत होतं. शीना बोरा हिचा मृतदेह याच गावाजवळ फेकण्यात आला होता. इंद्राणी मुखर्जीला अटक होऊन सगळ्या आरोपींची चौकशी सुरु असल्यामुळं गागोद्याचं नाव चर्चेत होतं. त्यातच या गावाजवळ मृतदेह फेकण्याचे अनेक प्रकार घडल्याचंही कोणीतरी सांगितलं होतं. विनोबांचं गाव शीना बोरा हत्याकांडामुळं मराठी- इंग्रजी वर्तमानपत्रात रोज यायला लागलं होतं.
शिवाजी महाराजांनी गागोद्याच्या खिंडीतच कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लूटला होता अशी अख्यायिका आहे. वरसईजवळचा माणिकगड शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात मुघलांना दिला होता. पेशव्यांचंही या सगळ्या परिसराशी नातं होतं.
बाळाजी विश्वनाथ पेशव्यांवर वरसईलाच उपनयन संस्कार झाला होता. असा मोठा इतिहास असणाऱ्या या परिसराचं नाव आता खून खटल्यांशी जोडलं गेलं होतं.
थोडावेळ विनोबांच्या घरात काढल्यानंतर आता निघण्याची वेळ होती. विनोबांच्या घरातच काही पुस्तकं विक्रीस ठेवली होती त्यातलं एक घेतलं. त्यातलं सहज जे पान येईल ते वाचायचं ठरवलं आणि ही विनोबांच्या गागोद्यातलीच ही गोष्ट वाचायला मिळाली.
त्यात विनोबा लिहितात, "गावात विन्या (विनोबा भावे) मजुरांना काम करताना पाहत असे. एकदा मजूर मोठा दगड फोडत होते. तिथे उभा राहून विन्या पाहत होता. मजुरांनी विचारले, फोडणार का दगड ? विन्या हो म्हणाला..दगडावर घाव मारुन मारुन जेव्हा तो फुटून दोन तुकडे व्हायला आले तेव्हा त्यांनी विन्याच्या हातात हातोडा दिला, मग विन्याने जोरात प्रहार केला आणि दगडाचे दोव तुकडे झाले. ते मजूर विन्याला खूष करण्यासाठी ओरडू लागले, इनामदाराच्या मुलाने दगड फोडला, विन्याने दगड फोडला."
विनोबा पुढे लिहितात, "या घटनेचा माझ्यावर खोल परिणाम झाला, यश प्राप्त करून देणारा शेवटचा घाव ज्या व्यक्तीकडून केला जातो, ती व्यक्ती कमी योग्यतेची असते; आणि त्यापूर्वी ज्यांनी काम केलेले ते महान असतात असे मी मानतो."
ही गोष्ट वाचल्यावर पुढच्या अनेक वर्षांमध्ये विनोबांना वाचत राहायला हवं असं वाटलं.