पल्लवी जाधव : 'खाकी वर्दीत मी रफ अँड टफ असते आणि रॅम्पवर सौंदर्यवती'

गुरूवार, 4 मार्च 2021 (17:49 IST)
अनघा पाठक
बीबीसी मराठी
महाराष्ट्रात असाल आणि इंस्टाग्रामवर असाल तर पीएसआय पल्लवी जाधव यांच्या अकाउंटला तुम्ही भेट दिली असल्याची शक्यता आहेत.
 
सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या या महिला पोलीस अधिकाऱ्याला इंस्टाग्रामवर सव्वाचार लाख तर फेसबुकवर पंचवीस हजार फॉलोअर्स आहेत.
 
पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करतात. नुकताच त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला आहे. मिस फोटोजेनिकचा पुरस्कारही त्यांच्या वाटेला आला आहे.
 
त्यांच्या या यशाबदद्ल गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून त्यांचं अभिनंदन केलं आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून पल्लवी यांचा फोन सतत वाजतोय. अनेक पत्रकारांचे, हितचिंतकांचे फोन येत आहेत. पण या सगळ्या प्रसिद्धीच्या पलिकडे आपलं लहानपणापासून जपलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद पल्लवी यांच्या बोलण्यात मला जाणवला.
 
आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल त्यांनी मोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारल्या.
 
"मला आठवत नाही कधीपासून, अगदी लहान असल्यापासून माझं स्वप्न होतं की आपणही मॉडेल बनावं, हिरोईन बनावं आणि टीव्हीवर झळकावं. जशी जशी मोठी होत गेले तसं तसं लक्षात आलं की आपण ग्रामीण भागात राहातो, आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही, आपले आईवडील गरीब शेतकरी आहेत. त्यामुळे आपलं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही," पल्लवी जुन्या दिवसांना आठवत सांगतात.
पल्लवी जाधव मुळच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रेल गावाच्या. लहानपणापासूनच त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांनी आपलं शिक्षणही 'कमवा आणि शिका' या योजनेअंतर्गत काम करून पूर्ण केलं. अनेकदा त्या दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करायला जायच्या.
 
"मी सोळा वर्षांची झाले तेव्हा इतक्या मोठ्या वयाची लग्न न झालेली मी एकटीच मुलगी होते. चौदाव्या-पंधराव्या वर्षी आमच्याकडे मुलींची लग्न करून टाकायची पद्धत होती. माझ्या मोठ्या बहिणींचेही बालविवाह झाले होते. पण मी अभ्यासात हुशार होते, घरातही एकटीच शिल्लक राहिले होते, त्यामुळे वडीलांनी मला शिकवायचं ठरवलं."
 
पण शिक्षण पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी आल्या.
 
'मी या वर्दीसाठी खूप मेहनत घेतलीये'
एका बाजूला शिक्षण चालू होतं तर दुसरीकडे घरचे स्थळ पाहायला लागले. त्यावेळी लग्न जुळवण्यासाठी आलेल्या एका वयोवृद्ध मध्यस्थांनीच तिच्या घरच्यांना सांगितलं की मुलीत स्पार्क आहे, तिला तुम्ही चांगल करियर घडवण्यासाठी पोलिसात जाऊ द्या.
 
"मी सायकोलॉजीमध्ये एमए केलं. मग मी पोलीस अधिकारी बनायचं ठरवलं. ही वर्दी मिळवण्यासाठी मी खूप स्ट्रगल केला आहे. 3 वर्षं मेहनत केली आहे. मला कोणाच्या मदतीने किंवा उपकाराने ही वर्दी मिळालेली नाही. मी अनेकदा उपाशी राहून अभ्यास केलाय त्यामुळे वर्दी हेच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे," त्या ठामपणे उत्तरतात.
 
पल्लवी जाधव यांना पुढे डिवायएसपी व्हायचं आहे.
 
'मॉडलिंग हा फक्त छंद आहे'
असं असलं तरी मॉडेलिंग करणं त्यांच्या छंद आहे, आणि आपल्या मोकळ्या वेळात तो पूर्ण करायचा त्या प्रयत्न करतात.
 
सौंदर्यस्पर्धेचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, "2019 साली मी सोशल मीडियावर जाहिरात पाहिली की ग्लॅमॉन मिस इंडियाची सौंदर्यस्पर्धा घेतंय. ते पाहिल्यावर मला वाटलं की माझं लहानपणीचं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होऊ शकेल. मग मी भाग घेतला. मागच्या वर्षी ही स्पर्धा कोरोनामुळे स्थगित झाली. यावर्षी ती जयपूरला झाली. त्यात माझी फर्स्ट रनरअप म्हणून निवड झाली."
 
त्या आता एका सिनेमातही अभिनय करत आहेत अर्थात पुढे या क्षेत्रात पूर्णवेळ यायचा त्यांचा काहीही विचार नाही.
 
"मी आयुष्यभर पोलिसच राहीन आणि पोलीस अधिकारी म्हणूनच निवृत्त होईन."
 
मॉडेलिंगच्या छंदामुळे लोक पोलीस अधिकारी म्हणून सिरीयसली घेत नाहीत असं वाटलं का?
 
महिलांना अनेकदा कमी लेखलं जातं, एखादी महिला दिसायला सुंदर नसेल, छान कपडे घालत नसेल किंवा मेक-अप करत नसेल तर 'बहनजी' म्हणून हिणवलं जातं तर एखादी महिला आपल्या दिसण्याकडे विशेष लक्ष देत असेल तर 'हिला काय काम जमणार, नुस्ती बाहुली आहे,' म्हणत अपमान केला जातो.
 
अशावेळेस एक पोलीस अधिकारी आणि मॉडेल, सौदर्यवती या दोन भूमिका कशा निभवल्या याबद्दल बोलताना पल्लवी सांगतात की, "पोलीस अधिकारी असणं माझं कर्तव्य आहे, जिद्द आहे तर मॉडेल बनणं हा छंद. पोलिसांचे नियमही हेच सांगतात की पोलीस दलातले लोक आपले छंद जोपासू शकतात. त्यामुळे मला डिपार्टमेंटमधून कधी विरोध झाला नाही, उलट कौतुकच झालं. आणि समाजाचं म्हणाल तर आख्या महाराष्ट्राला माहिती आहे की पल्लवी जाधव पोलीस अधिकारी म्हणून कशी आहे, कशी राहते, कसं काम करते. लोकांना माझ्या कामाचंच कौतुक आहे. सोशल मीडियावरही माझ्या वर्दीतल्या फोटोंना जास्त लाईक्स मिळतात."
 
ड्युटीच्या काळात ड्युटीच असं त्या सांगतात. "मी खाकीवर्दीत रफ अँड टफ असते आणि रँपवर सौंदर्यवती असते."
 
जे लोक महिलांची फक्त त्यांच्या दिसण्यावरून पारख करतात त्यांनाही पल्लवी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देताना म्हणतात की, "कोणतीही महिला तुमची बांधील नाही. तिला स्वतःचे हक्क आहेत, अधिकार आहेत आणि मतं आहेत. त्या महिलेला तुम्ही खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका. आणि महिलांनाही माझं हेच सांगणं आहे की तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका."
 
'मिसेस व्हायच्या आधी मिस इंडिया व्हायचं होतं'
व्यक्तीगत आयुष्याचे पुढचे प्लॅन विचारलं की त्या दिलखुलास हसतात. लग्न करायचं आहे आणि योग्य व्यक्तीचा शोध चालू आहे असं त्या म्हणतात.
 
"आतापर्यंत मी थोडी चालढकल करत होते, कारण कोणाची मिसेस होण्याच्या आधी मला 'मिस इंडिया' व्हायचं होतं," त्या हसत हसत उत्तरतात.
 
पण पुढच्याच क्षणात एका महत्त्वाच्या विषयाला हात घालतात.
 
"मी स्थळं पाहतेय, पण जे मला आवडले, त्यांना पोलीस सून नको होती. आजही आपल्या समाजात सूनेला गुलाम समजण्याची वृत्ती आहे. हिने आपलंच ऐकलं पाहिजे. आपण म्हणू तसं राहिलं पाहिजे, आपल्या शब्दाबाहेर नको, आपण म्हणू ते केलं पाहिजे ही वृत्ती घराघरात दिसते. त्यामुळे पोलीस सून म्हटलं की ते घाबरतात आणि नको म्हणतात."
 
पल्लवी जाधव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आहे आणि पुढेही महिलांच्या हक्कासाठी त्यांना काम करायचं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती