मुंबई बत्तीगुल प्रकरणाच्या चौकशीत आढळल्या या 6 धक्कादायक गोष्टी

बुधवार, 3 मार्च 2021 (18:31 IST)
मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेमागे घातपाताची शक्यता असू शकते, अशी शंका वाटल्याने मी या प्रकरणाची चौकशी गृह विभागाच्या महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्याची विनंती गृहविभागाला केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सायबर सेलच्या वरिष्ठ पोलिस महानिरीक्षकांनी अहवाल दिला आहे,' असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं.
 
यासंदर्भात गृह खात्याने केलेल्या चौकशीचा अहवाल उर्जामंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर मांडला. त्यावेळी ते बोलत होते. पाहूया या अहवालात नेमकं काय आहे ते.
 
गेल्या वर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान प्रांतात संघर्ष झाला होता. यानंतर चारच महिन्यात मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या पॉवरग्रिडमध्ये बिघाड झाला आणि काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
 
अखंड वीजपुरवठा मिळणारं शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं.
 
अमेरिकेतल्या मॅसाच्युसेट्सस्थित रेकॉर्डेड फ्युचर या सायबर सेक्युरिटी कंपनीच्या अहवालात असं म्हटलं आहे की चीनच्या सरकारशी संलग्न हॅकर्सच्या समूहाने मालवेअरच्या माध्यमातून भारतातल्या महत्त्वपूर्ण पॉवरग्रिडला लक्ष्य केलं गेलं.
 
रेकॉर्डेड फ्युचर सायबर सेक्युरिटी कंपनी आहे. विविध देशांतल्या इंटरनेटचा ही कंपनी अभ्यास करते.
 
सायबर सेलच्या अहवालातील महत्वाचे निष्कर्ष
1. विघातक प्रोग्राम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 14 ट्रोजन हॉर्सनी महापारेषणच्या संगणक प्रणालीत प्रवेश केल्याचं आणि त्याद्वारे विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्न केल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यापैकी काही ट्रोजन हॉर्सेस यांनी यापूर्वीही जगात अश्या प्रकारे मोठे सायबर हल्ले केलेले आहेत.
 
2. विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयटी आणि ओटी (IT & OT Servers) सर्व्हरच्या फायरवॉलमध्ये या ट्रोजन हॉर्सेसने सहजतेने प्रवेश केल्याचं आढळून आलं आहे.
 
3. कळवा राज्य भार प्रेषण केंद्रातील (एसएलडीसी) सर्व्हरच्या फायरवॉलमध्ये सायबर सिक्युरिटी इकोसिस्टीमवर आघात करू शकतील तसंच रचना कार्यपध्दतीमध्ये बिघाड करू शकतील अशा प्रकारच्या संशयास्पद विघातक कोड्स आणि सॉफ्टवेअर प्रोग्राम्सनी सहजतेने प्रवेश केल्याचं आढळून आलं.
 
4. एका मिनिटापेक्षा कमी अवधीत 3 अलार्मस् आयटी सिस्टममधून देण्यात आले. तथापि त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही, ही बाब सायबर हल्ला झाल्याची शक्यता दर्शवतात.
 
5. विदेशातील विशेषतः संशयास्पद आणि ब्लॅकलिस्टेड असलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल अड्रेसवरून (IP Address) राज्य भार प्रेषण केंद्राच्या (एसएलडीसी) सायबर सर्व्हरमध्ये लॉगईन करणे, यंत्रणा हॅक करणे, यंत्रणेस विघातक ठरतील या प्रकारचे प्रयत्न वारंवार केले असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा प्रकारचे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस संशयास्पद आणि विघातक असल्याचं महत्वाच्या क्रेडिट रेटींग एजन्सींनी प्रमाणित केले आहेत.
 
6. विद्युत पुरवठा खंडीत होईल अशा प्रकारचे विघातक संशयास्पद इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेसवरून सुमारे 8 जीबी डेटा राज्य भार प्रेषण केंद्राच्या (एसएलडीसी) सायबर सर्व्हरमध्ये वर्ग करणे किंवा काढून घेणे अशा प्रकारचा प्रयत्न झाल्याचं निदर्शनास आले आहे.
 
वरील निष्कर्षांच्या अनुषंगाने सायबर सेलने त्यांच्या अहवालात आयटी आणि ओटी रचना {Information Technology (IT) & Operational Technology (OT) Infrastructure} एकमेकांपासून वेगळे करणे, पासवर्ड मॅनेजमेंट करणे, वेब ॲप्लिकेशन सुरक्षा विषयक प्रणाली अद्यावत करणे, आयटी आणि ओटी रचनेचे अद्यावतीकरण करणे, एसएलडीसीच्या सायबर प्रणालीचे सक्षमीकरण करणे, इत्यादी शिफारशी केल्या आहेत.
 
भविष्यात मुंबई शहरात वीज ठप्प होण्याची घटना घडू नये तसंच मुंबई महानगराला दर्जेदार आणि पुरेसा वीजपुरवठा 24 तास उपलब्ध व्हावा, या संदर्भात विभागाकडून आवश्यक ती पावले उचलली जातील, असं आश्वासनही नितीन राऊत यांनी सभागृहाला दिलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती