राहुल गांधी: 'आणीबाणी लागू करण्याचा आजीचा निर्णय चुकीचा'

बुधवार, 3 मार्च 2021 (18:15 IST)
आणीबाणी लागू करण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा निर्णय चुकीचा होता असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांच्याशी ते बोलत होते.
 
1975 ते 1977 दरम्यान आणीबाणीच्या 21 महिन्यांच्या काळात जे काही घडलं ते चुकीचं होतं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
 
आणीबाणीच्या काळात राज्य घटनेने दिलेले अधिकार आणि नागरी स्वातंत्र्यावर गदा आली होती, प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालण्यात आले होते आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना मोठ्या प्रमाणावर तुरुंगात बंद करण्यात आलं होतं.
 
राहुल गांधी म्हणाले, "मला मान्य की ती एक चूक होती. तो पूर्णपणे चुकीचा निर्णय होता. माझी आजी (इंदिरा गांधी) यांनी सुद्धा असंच म्हटलं होतं. मात्र त्या वेळी काँग्रेसने भारताची संस्थात्मक रचना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. काँग्रेसची विचारसरणी आम्हाला असं करण्याची परवानगी सुद्धा देत नाही."
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले भाजपाचे नेते नेहमी काँग्रेसला लक्ष्य करत आले आहेत. विशेषतः काँग्रेस जेव्हा-जेव्हा भाजपवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून हल्लाबोल करते त्या त्या वेळी भाजपकडून आणीबाणीची आठवण करून दिली जाते.
 
गेल्या वर्षी जून महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि नेहरू गांधी घराण्यावर हल्लाबोल केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की 'एका घराण्याच्या सत्ता लालसेपोटी एका रात्रीतून संपूर्ण देश बंदिशाळा झाला होता.'
 
मंगळवारी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांच्याशी बोलताना राहुल गांधी म्हणाले आणीबाणीच्या काळात जे काही घडलं आणि आजही घडतंय त्यात मूलभूत अंतर आहे.
 
याविषयी बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरकारी संस्थांमध्ये आपली माणसं भरती करण्याचा सपाटा लावला आहे. आम्ही निवडणुकीत भाजपचा पराभव केला तरीसुद्धा या संस्थांमध्ये भरणा करण्यात आलेल्या त्यांच्या लोकांपासून आपण मुक्त होऊ शकणार नाहीत."
 
ते पुढे म्हणाले, "आधुनिक लोकशाही यंत्रणा संस्थात्मक समतोल यामुळे टिकून आहे. संस्था स्वतंत्रपणे काम करतात. या संस्थांच्या स्वातंत्र्यावर भारतातील सर्वांत मोठा संघटना असणारी आर. एस. एस. हल्ला करत आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे सगळं सुरू आहे. लोकशाही कमजोर करण्याचा प्रयत्न होतोय, असे आम्ही म्हणणार नाही. उलट लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय."
 
कौशिक बासू यांच्याशी बोलताना राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितलेली गोष्ट सांगितली. राहुल गांधी म्हणाले, "जेव्हा कमलनाथ मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आपल्या आदेशांचे पालन करत नाहीत. कारण ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. म्हणूनच आज जे काही घडतंय आणीबाणीपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे."
 
काँग्रेसच्या पक्षांतर्गत लोकशाही वर सुधा राहुल गांधी यांनी आपलं मत मांडलं.
 
त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या सरकारमधले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यांच्या आदेशाचे पालन करत नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती