कर्नाटक सेक्स टेप प्रकरण : जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांचा 'तो' व्हीडिओ खोटा की खरा?
बुधवार, 3 मार्च 2021 (17:46 IST)
सेक्स टेप प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
"या प्रकरणी करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून त्यात कोणतंही तथ्य नाही. या प्रकरणाची चौकशी निःपक्षपातीपणे होण्यासाठी आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहोत, तुम्ही तो मंजूर करा, अशी मी विनंती करतो," असं जारकीहोळी यावेळी म्हणालेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सुचनेनंतर जारकीहोळी यांनी राजीमाना दिला, असं वृत्त PTI वृत्तसंस्थेने दिलं आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तसंच कर्नाटकचे प्रभारी अरूण सिंह यांनी राज्य नेतृत्वाला याबाबत सूचना केली होती.
आगामी काळात देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तसंच कर्नाटकमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा राजीनामा घेण्याचा निर्णय झाला आहे.
रमेश जारकीहोळी यांचे भाऊ आणि भाजप आमदार बालचंद्र जारकीहोळी यांनी याप्रकरणी CBI चौकशीची मागणी केली. तसंच ही बनावट सीडी कुणी बनवली, त्या व्यक्तीविरुद्ध 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचं बालचंद्र जारकीहोळी म्हणाले.
कथित व्हीडिओमध्ये जारकीहोळी हे एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येतात. हा व्हीडिओ कर्नाटकात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसंच अनेक कन्नड वृत्तवाहिन्यांमध्ये हा व्हीडिओ दाखवण्यात आला.
"ज्या महिलेवर अन्याय झाल्याचा दावा केला जात आहे, ती कोण आहे, हे अद्याप माहीत नाही. त्या महिलेच्या नातेवाईकांच्या मागणीवरून कुणीतरी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार पूर्णपणे चुकीची आहे. पीडित व्यक्तीने स्वतः तक्रार करणं अपेक्षित असतं. इतर कुणीही रस्त्यावरचा व्यक्ती ही तक्रार दाखल करू शकत नाही," असंही बालचंद्र जारकीहोळी म्हणाले.
कर्नाटकचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांतच होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा राजीनामा झाल्याने बी. एस. येडीयुरप्पा सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रमेश जारकीहोळी हे गोकाक मतदारसंघाचे आमदार आहेत. आधी ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. पण दोन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय नाट्यादरम्यान सरकारचा पाडाव झाल्यानंतर त्यांनी भाजपची वाट धरली होती.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहळी यांनी मंगळवारी (2 मार्च) रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
नोकरीच्या मागणीसाठी आलेल्या महिलेवर रमेश जारकीहोळी यांनी लैंगिक अत्याचार केले, तिच्यासह तिच्या कुटुंबीयांना धमकावलं, असा आरोप कल्लाहळी यांनी केला आहे.
रमेश जारकीहोळी यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. हा व्हीडिओ 100 टक्के बनावट असून यामुळे आपल्याला धक्का बसला आहे, असं वक्तव्य रमेश जारकीहोळी यांनी केलं आहे.