पतंजली कंपनीचे कोरोनील हे औषध कोरोनावरील उपचार आहे का?
मंगळवार, 2 मार्च 2021 (17:45 IST)
वनस्पती औषधांचे मिश्रण कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी असल्याचा दावा पुन्हा एकदा केला जातोय. कोरोनील नावाचे हे औषध नुकतेच काही सरकारी मंत्र्यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले.
हे औषध कोरोनावर उपचार करण्यासाठी गुणकारी असल्याचा कोणताही पुरावा नाही. पण तरीही या औषधाला मान्यता दिल्यासंदर्भात विविध दावे करण्यात येत आहेत.
कोरोनील संदर्भात काय माहिती आहे?
कोरोनील हे पारंपरिकरित्या भारतीय औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. भारतातील पतंजली या मोठ्या कंपनीकडून हे औषध विकले जात आहे. याला कोरोनील असं नाव देण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात सर्वप्रथम या औषधाचा उल्लेख करण्यात आला. प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावरील 'इलाज' म्हणून या औषधाचा प्रचार केला.
भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर या औषधाचे मार्केटिंग थांबवण्यात आले. या औषधामुळे कोरोना बरा होऊ शकतो अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.
'इम्युनिटी बूस्टर' म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढविणारं औषध म्हणून कोरोनीलची विक्री केली जाऊ शकते असंही सरकारकडून सांगण्यात आलं.
19 फेब्रुवारीला कंपनीने आणखी एक कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. कोरोनील कोरोनापासून संरक्षण आणि उपचार करू शकते असा दावा यावेळी कंपनीने पुन्हा केला.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने भारतातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांच्यावर टीका केली.
आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'अवैज्ञानिक औषधाची' प्रसिद्धी हा भारतातील जनतेचा अपमान असून आरोग्यमंत्री या औषधाचे समर्थन करतात का? हे स्पष्ट करावं अशी भूमिका असोसिएशनने घेतली.
या कार्यक्रमाला डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते यासंदर्भात विचारण्यासाठी आम्ही आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधला, पण लेख प्रकाशित होईपर्यंत आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पतंजली कंपनीने मंत्र्यांच्या उपस्थितीचे समर्थन केले आणि म्हटलं, "त्यांनी आयुर्वेदाला (भारताचे पारंपरिक वैद्यकशास्त्र) किंवा आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेला पाठिंबा दिलेला नाही."
कोरोनीलबाबत करण्यात आलेले दावे
आपले उत्पादन कोरोनावर उपचार करते, असा दावा कंपनी वारंवार करत आहे. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी बीबीसीला सांगितले, "या औषधाने लोकांवर उपचार केला आहे."
या औषधाच्या वैज्ञानिक चाचण्या झाल्या असून याचे निष्कर्ष अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाल्याचंही कंपनी सांगते.
यासाठी कंपनी नोव्हेंबर 2020 मध्ये स्वित्झर्लंडमधील एमडीपीआयने प्रकाशित केलेल्या एका नियतकालिकाचा उल्लेख केला. हे नियतकालिक प्रयोगशाळेतील चाचण्यांवर आधारित आहे.
हा प्रयोग माशांवर करण्यात आला होता. त्यामुळे हे औषध मानवांमधील कोरोना विषाणूवर उपचार करू शकते असा पुरावा असल्याचा उल्लेख या संशोधनात करण्यात आलेला नाही. त्यात एवढेच म्हटले आहे की, सद्यपरिस्थितीत पूर्व-वैद्यकीय अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की मानवांमध्ये सविस्तर वैद्यकीय चाचण्या केल्या जाऊ शकतात.
युकेमधील साउथॅम्प्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. मायकल हेड यांनी बीबीसीला सांगितले की, प्रयोगशाळेत प्री-क्लिनिकल ट्रायल्स घेणे आणि मानवांवर काम करणाऱ्या गोष्टीसाठी नियामक मंजुरी मिळवणे यात फरक आहे.
ते सांगतात, "अनेक औषधं प्रयोगशाळेत चांगला प्रतिसाद देतात पण मनुष्यावर त्याची चाचणी होते तेव्हा विविध कारणांमुळे औषध काम करत नाही."
कोरोना विषाणूमुळे पॉझिटिव्ह आढळलेल्या 95 रुग्णांची गेल्या वर्षी मे ते जून या कालावधीत मानवी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 45 जणांवर उपचार करण्यात आले आणि 50 प्लेसबो ग्रुपचा भाग होते (जे दिले गेले नाही).
हे निष्कर्ष सायन्स डायरेक्ट या प्रसिद्ध नियतकालिकाच्या एप्रिल 2021 च्या आवृत्तीत प्रकाशित केले जात असल्याची माहिती पतंजली कंपनीने दिली आहे.
कोरोनील औषध दिलेले रुग्ण ओषध न दिलेल्या रुग्णांच्या तुलनेत लवकर बरे होत होते असं कंपनीने सांगितलं आहे. हे केवळ प्राथमिक पातळीवर प्रयोग करण्यासाठी केल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं.
या कारणांमुळेच हे निष्कर्ष ठोस असण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण उपचारात इतर अनेक कारणांमुळे फरक पडू शकतो.
कोरोनीलला अधिकृत मंजुरी मिळाली आहे का?
डिसेंबर 2020 मध्ये उत्तराखंड येथील पतंजली कंपनीने राज्य प्रशासनाला कोरोनीलच्या 'इम्युनिटी बूस्टर'च्या परवान्याचे 'कोव्हिड-19' औषधात' रूपांतर करण्यास सांगितले.
कोरोनीलला जानेवारी महिन्यात 'सहाय्यक उपाय' म्हणून मंजुरी देण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
राज्य प्रशासनाने बीबीसीशी बोलताना सांगितलं, की कंपनीला नवीन परवाना देण्यात आला आहे पण हे औषध कोरोनावर उपचार म्हणून देता येणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
पारंपरिक वैद्यकीय आणि राज्य परवाना प्राधिकरणाचे संचालक डॉ. वाय.एस. रावत यांनी बीबीसीला सांगितले, "सुधारित परवाना म्हणजे झिका, व्हिटॅमिन सी, मल्टी व्हिटॅमिन किंवा इतर कोणतेही पूरक औषध म्हणून कोरोनीलची विक्री केली जाऊ शकते."
"कोरोनील उपचार नाही," असंही संचालकांनी स्पष्ट केले.
गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस (जीएमपी) प्रमाणपत्र मिळाल्याचंही कंपनी सांगत आहे. हे प्रमाणपत्र म्हणजे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) प्रमाणीकरण योजनांशी सुसंगत असल्याचं कंपनी सांगते.
वरिष्ठ अधिकारी राकेश मित्तल यांनी एका ट्विटमध्ये कोरोनीलला WHO ने मान्यता दिल्याचं म्हटलं पण नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले.
भारताचा सर्वोच्च औषध नियामक WHO मान्यताप्राप्त योजनेअंतर्गत जीएमपी प्रमाणपत्र प्रदान करतो. हे प्रमाणपत्र निर्यातीच्या उद्देशाने उत्पादन मानकांची खात्री करण्यासाठी दिले जाते.
उत्तराखंड राज्य सरकारचे डॉ. रावत म्हणाले, "जीएमपी सर्टिफिकेटचा दाव्याच्या परिणामकारकतेशी काहीही संबंध नाही. हे केवळ उत्पादनादरम्यान गुणवत्तेचा दर्जा राखण्यासाठी असते."
WHO ने बीबीसीशी बोलताना स्पष्ट केले की, "कॉविड-19 च्या उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाची परिणामकारकता प्रमाणित केलेली नाही."
साउथॅम्प्टन विद्यापीठातील डॉ. हेड सांगतात, "ही उत्पादने कोव्हिड-19 च्या उपचारासाठी किंवा प्रतिबंधासाठी फायदेशीर असल्याचा अद्याप कोणताही स्पष्ट पुरावा नाही."