कोरोना लस: दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला सुरुवात, नोंदणी कशी कराल?

सोमवार, 1 मार्च 2021 (17:50 IST)
कोव्हिड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरू होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये लस घेतली. पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली.
 
आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर यांच्यासोबतच आता 60 वर्षांच्या वरील सगळ्यांना, तर 45 ते 60 या वयोगटातील सहव्याधी असणाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नव्या पत्रकानुसार आता खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, केंद्र सरकारच्या आरोग्य योजना आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनांशी जोडलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये हे लसीकरण केंद्र असतील.
महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेशी निगडित हॉस्पिटलमध्येही लसीकरण केंद्र उघडले जातील.
 
सरकारी आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण मोफत असेल, तर खासगी आरोग्य संस्थांमध्ये त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीत खासगी आरोग्य संस्था यूजर फी म्हणून 100 रुपये आणि लशीची किंमत म्हणून 150 रुपये असे एकूण 250 रुपये प्रति डोस प्रति व्यक्ती असे शुल्क आकारणार आहेत.
 
दुसऱ्या टप्प्यातील लशीसाठी नोंदणी कशी करायची?
कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
 
नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
 
वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रोल करून खाली या, तिथे तुम्हाला 'Find Your Nearest Vaccination Center' हा पर्याय दिसेल. यावरील Registration Yourself या पर्यायावर क्लिक करा.
 
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
 
त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
 
त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
 
या अकाऊंट डिटेल्सच्या पानावरच युजर लसीकरणाची तारखी देऊ शकतात.
 
नंतर तुम्ही लसीकरण केंद्रासाठीही संपूर्ण माहिती भरू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड अशी माहिती दिल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
 
तुम्हाला जवळ असलेल्या केंद्रावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध वेळ सांगितली जाईल. तिथे Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation चं पान उघडेल. तिथे Confirm करा.
 
तुम्हाला नोंदणी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. ते पान तुम्हाला डाऊनलोडही करता येईल.
 
लसीकरण केंद्रावर जाताना कुठली कागदपत्रं सोबत हवीत?
 
लसीकरणासाठी 45 वर्षांपेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेले ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी काही कागदपत्रे सोबत आणणं बंधनकारक आहे.
 
आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.
 
45 ते 60 वर्ष या वयोगटातील ज्या व्यक्तींना सहव्याधी (को-मोरबीडीटी) असेल त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून सहव्याधी असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
 
लसीकरण केंद्रावर येताना आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांनी एम्प्लॉयमेंट सर्टीफिकेट अथवा कार्यालयीन ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती