संजय राठोड यांचा राजीनामा, पण धनंजय मुंडे या कारणांमुळे बचावले होते

सोमवार, 1 मार्च 2021 (17:38 IST)
दीपाली जगताप
बीबीसी मराठी
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला मग धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
 
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारवर अनेक आरोप करण्यात आले. ही परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत जानेवारी महिना सुरू झाला आणि महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला.
 
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. यावेळी स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनीही आपले विवाहबाह्य संबंध आणि त्यापासून आपल्याला दोन अपत्य असल्याचे जाहीर केले.
 
या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली होती.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही दिले पण काही तासातच या प्रकरणाला वेगळे वळण लागले.
 
वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात मात्र तसे घडले नाही. गेल्या अठरा दिवसांपासून या प्रकरणाती तीव्रता वाढत गेली. पण पोहरादेवी मंदिराजवळ त्यांनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी चर्चा होऊ लागली. पण अखेर रविवारी (28 फेब्रुवारी) संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द करावा लागला.
आरोप झाल्यानंतर जवळपास 18 दिवसांनंतर संजय राठोड यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ का आली? एकाच सरकारमध्ये मंत्री असून धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही पण संजय राठोड यांना थेट राजीनामा का द्यावा लागला? संजय राठोड यांना नेमकं काय भोवलं? या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.
 
1. शक्तिप्रदर्शन भोवले
संजय राठोड यांनी 23 फेब्रुवारी रोजी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं.
 
यावेळी संजय राठोड यांच्या समर्थनासाठी हजारो कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गर्दी केली. पोलिसांना लाठीमार करावा लागला.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचेही उल्लंघन त्या ठिकाणी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले.
 
पूजा चव्हाण संजय राठोड प्रकरण : आमच्या बायकांचं आम्ही बघून घेऊ' ही वृत्ती कुठून येते?
 
पोहरादेवी मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने संजय राठोड यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बंजारा समाज आपल्या पाठीशी उभा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
 
पण हे दबावतंत्र संजय राठोड यांच्या कामी आले नाही. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "पंधरा दिवस गायब असताना थेट पोहरादेवी मंदीराजवळ संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यात कोरोना काळात अशी गर्दी केल्याने टीका झाली. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नाराज होते."
 
"असे गंभीर आरोप होत असताना फरार होऊन मग समाजाला ढाल बनवल्याने लोकांमध्येही चुकीचा संदेश गेला. हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले," असंही अभय देशपांडे सांगतात.
 
या प्रकरणाची तुलना धनंजय मुंडे प्रकरणाशी होऊ शकत नाही असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना वाटते.
 
 
ते सांगतात, "धनंजय मुंडे प्रकरण हे व्यक्तिगत आयुष्याशी संबंध होते. सहमतीने असलेले संबंध आणि त्यातून निर्माण झालेले वाद कोर्टात गेले होते. त्यामुळे धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणाची तुलना होऊ शकत नाही. केवळ नैतिकतेच्या आधारावर टीका होऊ शकते. बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेनेही तक्रार मागे घेतली."
 
"पण संजय राठोड प्रकरण गुन्ह्याशी संबंधित आहे. यात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. यात समोर आलेले व्हिडिओ, ऑडिओ संशय निर्माण करणारे आहे," असं विजय चोरमारे सांगतात.
 
2. आक्रमक विरोधी पक्ष
धनंजय मुंडे प्रकरणातही भाजपकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पण भाजप नेत्यांची भूमिका संमिश्र होती.
 
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. किरीट सोमय्या महिलेच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचले.
 
 
पण त्याचवेळी भाजपचेच नेते कृष्णा हेगडे यांनी समोर येत आरोप करणाऱ्या महिलेवरच आरोप केले. 2010 मध्ये या महिलेने आपल्यालाही त्रास दिला होता, असा आरोप त्यांनी केला.
 
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू."
 
संजय राठोड प्रकरणात मात्र भाजप पहिल्या दिवसापासून आक्रमक दिसली. भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ सातत्याने विविध पुरावे समोर आणत संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा संजय राठोड प्रकरणामुळे मलिन होत असल्याचंही त्या म्हणाल्या.
 
 
"संजय राठोड एवढे दिवस गायब असल्याने भाजपलाही जोरदार आरोप करण्याची संधी मिळाली. त्यात पुराव्याप्रमाणे अनेक गोष्टी समोर येत होत्या. भाजपला त्याचीही मदत झाली. मुख्यमंत्री, गृहमंत्री समोर येऊन भूमिका घेत नसल्याने भाजप आणखी आक्रमक झाला," असं विजय चोरमारे सांगतात.
 
3. संजय राठोड फरार
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. यानंतर काही तासातच पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली.
 
संभाषणाच्या काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. याच आधारावर संजय राठोड यांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी जोर धरू लागली.
 
यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्री असलेले संजय राठोड मात्र स्पष्टीकरण देण्यासाठी समोर आले नाहीत. याउलट कित्येक दिवस त्यांचा फोन बंद होता. ते फरार आहेत अशीही चर्चा सुरू झाली.
 
 
यावेळी भाजपने थेट संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप करण्यास सुरू केली. चित्रा वाघ म्हणाल्या, "पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
 
धनंजय मुंडे प्रकरणात स्वत: मुंडेंनी आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली. त्यापासून त्यांना दोन अपत्य असून त्यांची जबाबदारी स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं. आरोप करत असलेली महिला आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी समोर येऊन केला.
 
याप्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.
 
संजय राठोड यांनी आरोप झाल्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवसांनंतर आपले स्पष्टीकरण दिले. त्यातही पुराव्यांना आव्हान दिले नाही तर केवळ आपली बद्नामी होत असल्याचं ते म्हणाले.
 
4. व्हायरल फोटो आणि व्हिडिओ
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. कथित व्हिडिओ आणि ऑडिओचा संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याचाही आरोप झाला.
 
पूजा चव्हाण संजय राठोड प्रकरण : आमच्या बायकांचं आम्ही बघून घेऊ’ ही वृत्ती कुठून येते?
 
पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसू लागले. यामुळे संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात अडकले.
 
अभय देशपांडे सांगतात, "संजय राठोड यांनी या अशा सर्व क्लिप्ससंदर्भात स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. संभाषणात त्यांचा आवाज नव्हता तर मग त्यांनी समोर येऊन हे स्पष्ट का केले नाही?" असाही प्रश्न उपस्थित होतो.
 
5. ठाकरेंच्या प्रतिमेला धक्का
वनमंत्री पदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचा असून यावेळी ठाकरे कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे.
 
"गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात यश आले. त्यामुळे संजय राठोड प्रकरणात शिवसेनेची होत असलेली बदनामी पक्षाला आणि सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना परवडणारी नव्हती," असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सांगतात.
 
 
"दररोज नवीन पुरावे जनतेसमोर येत होते. त्यामुळे शिवसेनेच्या प्रतिमेला फटका बसत होता. एवढा गंभीर गुन्हा असताना मंत्री दबाव टाकत होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत होता. यामुळे चुकीचा संदेश जात होता," असंही विजय चोरमारे सांगतात.
 
संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? उद्धव ठाकरे संजय राठोड यांना पाठिशी घालत आहेत असेही अरोप करण्यात आले.
 
"संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे वाशिम, यवतमाळमध्ये शिवसेनेला नुकसान होईल याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती पण संपूर्ण महाराष्ट्रात बद्नामी होत असल्याने अखेर त्यांना निर्णय घ्यावा लागला."
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती