हिमाचल प्रदेशात शेतात 'उगवतात' चक्क नव्या कोऱ्या गाड्या

गुरूवार, 13 जून 2019 (12:11 IST)
तुम्ही प्रवासाला निघाला आहात, झाडं, झरे, रस्ते वेगाने पळत आहेत. लांबलचक शेतांकडे पाहून तुम्ही शहराच्या गर्दीतून, ट्रॅफिकमधून बाहेर पडलो असं म्हणत निश्वास टाकता तेवढ्यात तुम्हाला बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या शेकडो नव्याकोऱ्या गाड्या दिसतात.
 
तुम्ही म्हणाल अरेच्चा! आजकाल शेतात गाड्यापण उगवायला लागल्या की काय?
 
पण खरी स्टोरी थोडी वेगळी आहे.
 
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाकडे जाताना रस्त्यात लागणाऱ्या छोट्या, मोठ्या डोंगरांवर नजर टाकली तर तिथल्या शेतात उभ्या असणाऱ्या शेकडो नव्याकोऱ्या कार दिसतात.
 
एखाद्याला असं वाटू शकतं की या कार इथल्या शेतकऱ्यांच्या समृद्धीचं लक्षण आहे पण गावात गेलं की काही वेगळंच ऐकायला मिळतं.
 
या शेतकऱ्यांनी आपलं शेती सोडून गाड्या उभ्या करायला जागा का दिली?
 
रानडुकरं, माकडं आणि नीलगायींचा हैदोस
इथल्या शेतकऱ्यांनी शेती करणं सोडण्याचं मुख्य कारण आहे रानडुकरं, माकडं आणि नीलगायींचा त्रास. हे प्राणी या शेतकऱ्यांची पिकं खाऊन टाकतात.
 
म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवर कार कंपन्यांच्या गाड्या उभ्या करायला सुरुवात केली. या गाड्या काही दिवस इथे पार्क होतात आणि मग शोरूममध्ये जातात.
 
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते याने काही नुकसान होत नाही कारण त्यांना आपल्या जमिनीवर शेती न करता प्रत्येक गाडीमागे दर महिन्याला 100 रूपये मिळतात.
 
इथल्या जलेल नावाच्या गावात राहाणाऱ्या स्थानिक कांता देवी सांगतात, "दिवसा माकडांपासून पीक वाचवणं शक्य तरी आहे पण रात्री समस्या गंभीर होते. कारण तेव्हा रानडुकरं आणि नीलगायी पिकांचा फडशा पाडतात. एवढा पैसा घालवून, मेहनत करून आमच्या पदरात काही पडत नाही. अशात या कंपन्यांनी गाड्या उभ्या करण्यासाठी आमच्या जमिनी भाड्याने घेतल्या ही देवाची कृपा म्हणायची. कारण शेती करणं आता अशक्य आहे."
 
कांता विचारतात की, उजाड जमिनीतून शेतकऱ्यांना 8 ते 10 हजार कमाई होत असेल तर काय वाईट.
 
आसपासच्या 5-6 गावांमध्ये हजाराहून जास्त गाड्या उभ्या असतात.
 
इथल्याच भागात राहाणाऱ्या मीना कुमारी यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या शेतात 100 गाड्या उभ्या करायला जागा दिली.
 
याआधी त्या आपल्या शेतात डाळी, टमाटे, ढोबळी मिरची, कोबी, मुळे आणि मक्याची पिकं अशी पिकं घ्यायच्या.
 
माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्यांनी 4 वर्षांपूर्वी मक्याचं पिकं घेणं बंद केलं.
 
"मग माकडांनी भाज्यांच्या पिकांवरही हल्ला करायला सुरुवात केली. रानडुकरांनी आणि नीलगायींनी शेती करणं मुश्कील करून टाकलं. खरं आमची मानसिक तयारी नव्हती की शेतात गाड्या उभ्या कराव्यात. पण घरातल्या काही लोकांची इच्छा होती. आता काही न करता आम्हाला पैसै मिळतात."
 
पण मारुती-सुझुकीचे या भागातले डीलर गोयल मोटार्सच्या अधिकाऱ्यांनी या बाबतीत काही बोलायला नकार दिला आहे.
कंपनीचं म्हणणं आहे की गावकऱ्यांनी आपल्या मर्जीने जमिनी दिल्या आहेत आणि त्या बदल्यात त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत. अर्थात हे पैसै शेती करून मिळणाऱ्या मोबदल्याइतके नाहीत.
 
कंपनीचे एक वरिष्ठ अधिकारी सांगतात की त्यांनी गावकऱ्यांसोबत कोणताही अधिकृत करार केला नाहीये. दोन्ही पक्षांनी हे मान्य केलंय कारण दोघांनाही गरज आहे. या प्रक्रियेत फक्त त्या लोकांच्या जमिनी भाड्याने घेतल्या आहेत ज्यांनी शेती करणं बंद केलंय.
 
गावकरी दुसऱ्या ठिकाणहून पकडलेली माकडं आपल्या भागात सोडल्याची तक्रारही करतात.
 
ते म्हणतात की सरकारतर्फे माकडं पकडून त्यांची नसबंदी केली जाते, पण ही माकडं पकडणारी माणसं ज्या भागातून माकडं पकडली त्या भागात सोडतीलच असं नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती