जितेंद्र आव्हाड : 'नशीब रश्मी शुक्लांचं 'ते' पत्र आम्ही परत दिलं नाही'
गुरूवार, 25 मार्च 2021 (17:23 IST)
"शिरोळ (कोल्हापूर) चे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता भाजपसोबत रहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला," असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आज (24 मार्च) पत्रकार परिषद घेत रश्मी शुक्लांवर आणखी गंभीर आरोप केले आहेत.
जितेंद्र आव्हाड आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले, "मी स्वतः राजेंद्र येड्रावरकरांशी बोललो. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली. त्यांच्या मागे पोलीस ऑफिसर लावण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांनी 'मेरे साथ चाय पिओगे तो नमक हरामी नहीं होगी' असं रश्मी शुक्ला यांनी त्यांना म्हटलं."
"या सरकारला दिलदार राहणं महागात पडलं. रश्मी शुक्ला यांनी रडून माझ्या पतीचं आताच निधन झालंय, असं म्हणून माफी मागितली. मग आमच्या सरकारला पाझर फुटला," असं आव्हाड यांनी सांगितलं.
तसंच, आव्हाड पुढे म्हणाले, "रश्मी शुक्ला यांनी पाया पडत असं सांगितलं की, माझं पत्र परत द्या. नशीब सरकारनं ते पत्र परत दिलं नाही. हा कटाचा भाग असेल असं सरकारला वाटलंच नव्हतं."
हे सरकार अधिकार्यांना ओळखण्यात कमी पडलं, असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.
दरम्यान, काल (24 मार्च) सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत भाष्य केलं होतं.
केवळ गृहमंत्रीच नाहीत तर संपूर्ण मंत्रिमंडळाचे फोन टॅप झाले असू शकतात असा संशय महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, "हे फोन टॅप करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव यांची परवानगी लागते. आम्ही सीताराम कुंटे यांना परवानगी दिली का विचारलं तर त्यांनी उत्तर नाही असं दिलं. फोन टॅपिंग करणं हा गुन्हा आहे. रश्मी शुक्ला यांचं कृत्य लक्षात आल्यानंतर त्यांना बोलावून घेतलं."
काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर आव्हाड बोलत होते.
"रश्मी शुक्ला यांनी याची कबुली दिली आणि माफी मागितली होती. अनेक मंत्र्यांचे फोन टॅप होतायेत हे लक्षात आलं. संपूर्ण मंत्रिमंडळाचे फोन टॅप झाले असतील. यातून सरकारला बदनाम करण्याचा कट होता. मंत्रिमंडळात याची चर्चा झाली. अत्यंत संतप्त प्रतिक्रिया यावर मंत्र्यांनी दिल्या. याची चौकशी निश्चितपणे झाली पाहिजे. हे मोठं कटकारस्थान होतं.
"रश्मी शुक्ला यांनी माफी मागितली तेव्हा आम्ही माफ केलं होतं. परवानगी एकाची मागितली फोन टॅप केला दुसर्यांचे. जर तुम्ही राष्ट्रविरोधी कृत्य किंवा अशांतता पसरवणे असं काही एखादी व्यक्ती करत असेल तेव्हा फोन टॅप केले जातात," असं आव्हाड म्हणाले.
फोन टॅपिंग बेकायदेशीर - मलिक
फोन टॅपिंग हे बेकायदेशीर आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती. जेव्हा फोन टॅपिंग प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.
"देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. बदल्या करण्यासाठी समिती असते. थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत. तसंच रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर होतं. म्हणून त्यांना शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.
परवानगी शिवाय फोन टॅप करणं हा गुन्हा आहे, असं मलिक यांनी म्हटलं. सरकार स्थापन होताना रश्मी शुक्ला महाविकास आघाडीच्या लोकांचे फोन टॅप करण्याचं काम करत होत्या, अस दावाही मलिक यांनी केला आहे.
"देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. बदल्या करण्यासाठी समिती असते. थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत. केंद्रीय समितीच्या मान्यतेनंतरच बदल्या होतात. सरकार यात हस्तक्षेप करत नाही. खोट्या रिपोर्टच्या आधारे फडणवीस कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.
रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात. रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होत्या. सत्यपरिस्थिती बाहेर आल्यानंतर सरकारने त्यांना पाठिशी घालण्याचे काम केले नाही, असं मलिक यांनी सांगितलं आहे.
बहुमत असेपर्यंत आम्हाला कोणीही सत्तेपासून दूर करू शकत नाही, फडणवीस दिल्लीत जाऊन कट-कारस्थान करत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही मलिक म्हणालेत.