'बांगलादेशातून आणून मला बुधवार पेठेत विकलं, देहविक्रीसाठी दबाव टाकण्यात आला'

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (21:04 IST)
राहुल गायकवाड
"माझ्या पतीला माहितच नव्हतं मी कुठंय? काय करतेय? जेव्हा आम्ही जेलमध्ये महिन्याभराने भेटलो तेव्हा एकमेकांना पाहून खूप रडलो. मी त्यांना सांगितलं मला विकायला नेलं होतं पण मी नाही गेले."
 
पुण्यातल्या फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये राहत असलेल्या बांग्लादेशी नागरिक माजिदा सांगत होत्या.
 
मोहम्मद आणि माजिदा या जोडप्याचं फरासखाना पोलीस स्टेशन सध्या घर झालंय. फरासखाना पोलीस त्यांना त्यांच्या घरी बांग्लादेशमध्ये परत पाठविण्यासाठी प्रयत्न करतायेत.
 
मोहम्मद आणि माजिदाची भारतात अडकण्याची कहाणी सुरू होते, 2019ला. दोघे बांग्लादेशमधल्या खुलना जिल्ह्याचे रहिवासी. त्यांना तीन मुलं देखील आहेत. घरची परिस्थिती हलाकीची.
 
मोहम्मद टमटम रिक्षाचा व्यवसाय करत होते. एका अपघातात त्यांच्या पायाला जबर मार लागला. त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची टमटम चोरीला गेली. ज्याच्यावर घर चालत होतं तीच टमटम चोरीला गेली होती.
त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. मोहम्मद आणि माजिदा हताश झाले. मोहम्मदच्या एका मित्राने त्यांना काम लावून देतो असं सांगून भारतात येण्यासाठी आग्रह धरला.
 
पासपोर्टच सगळं बघून घेतो असंही तो म्हणाला. त्या मित्राने बांग्लादेशमध्येच एका व्यक्तीकडे दोघांना सोपवलं. त्या व्यक्तीने त्यांना भारतात आणून पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीकडं दिलं. त्यांने त्यांना ट्रेनमधून पुण्यात आणलं.
 
बंगालमधून बुधवार पेठेत
पुण्यातल्या बुधवार पेठेत दोघांना ठेवण्यात आलं होतं. पोलिसांच्या कारवाईत मोहम्मदला अटक करण्यात आली.
 
माजिदा यांना एका खोलीत ठेवण्यात आलं होतं. पतीला सोडवायचं असेल तर तुला देहविक्री व्यवसाय करावा लागेल असं त्यांना सांगण्यात आलं.
 
त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिला. काही दिवस त्या खोलीत राहिल्याने जवळच पोलीस चौकी आहे याचा अंदाज त्यांना आला होता. एका बंगाली महिलेच्या मदतीने त्यांनी जवळची पोलीस चौकी गाठली आणि सगळी आपबीती सांगितली.
माजिदा आणि मोहम्मद यांनी भारतात बेकायदेशीर घुरखोरी केली होती. त्यामुळे पोलिसांनी माजिदा यांना अटक केली. कोर्टात दोघांनीही गुन्हा कबूल केला. त्यांना 2 वर्षं 3 महिन्याची शिक्षा झाली. 16 जून 2021 ला त्यांची शिक्षा संपली.
 
दोघांची कागदपत्रं गोळा करुन त्यांना बांग्लादेशात पोहचविण्यापर्यंत त्यांना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याचा आदेश सुद्धा कोर्टाने दिला.
 
त्यामुळे 16 जूनपासून माजिदा आणि मोहम्मद फरासखाना पोलीस स्टेशनला राहतायेत.
 
फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "कोर्टाच्या आदेशानुसार हे जोडपं पोलीस स्टेशन सोडू शकत नाही. आम्ही ते बांग्लादेशी असल्याच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. ते सर्व बांग्लादेश दुतावासाला देखील पाठवले आहेत. त्यांच्याकडून आदेश येईपर्यंत त्यांना इथेच ठेवावे लागणार आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची काळजी आमचे सर्व पोलीस कर्मचारी घेत आहेत."
फरासखान्याच्या एका ऑफिसच्या खोलीतील टेबलाजवळच त्या दोघांच आता घर झालंय. कॉन्स्टेबल समीर पवार दोघांना त्यांच्या मोबाईलवरुन घरच्यांशी बोलणं करुन देतात.
 
आपल्या लहानग्यांना पाहून माजिदाला रडू कोसळतं. कधी आपल्या मुलांना जाऊन भेटतीये असं तिला वाटतं.
 
"आमचा परत जायचा अजून कुठलाच मार्ग निघत नाहीये. माझी मुलं रडतायेत. माझी आई रडतीये. ती मला रोज विचारते तुम्ही परत कधी येणार? तुम्हाला इतके दिवस का ठेवलंय तिकडे? आम्ही त्यांना सांगतोय, बांग्लादेश सरकारशी भारत सरकार बोलतंय. त्यांनी परवानगी दिल्यावर आम्हाला सोडतील. आमच्या घरी खायचे वांदे आहेत. माझी मुलं उपाशी झोपतायेत," माजिदा सांगत होती.
 
घरची आठवण काढल्यावर मोहम्मद यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. मोहम्मद सांगतात, "आमच्या घरची स्थिती खराब आहे. घरचे सध्या भीक मागून जगत आहेत. माझाच त्यांना आधार होता. तीन मुलं आई आम्ही परत कधी येऊ याची वाट ते बघतायेत. गेला दीड महिना आम्ही इथे आहोत. भारत सरकारकडून सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे पण अद्याप बांगलादेश सरकारकडून काय हालचाल झाली आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्ही घरी जाई पर्यंत आमच्या घरचे जिवंत असतील की नाही सांगता येत नाही."
फरासखाना पोलिसांनी मोहम्मद आणि माजिदा यांच्या गावचा पत्ता शोधून काढला. मोहम्मद यांचं तिकडचं ओळखपत्र सुद्धा पोलिसांना मिळालंय. माजिदाचं बर्थ सर्टिफिकेट सुद्धा पोलिसांनी तिकडून मिळवलं.
 
बांग्लादेशमधील अटलिया युनियन परिषद या मान्यताप्राप्त संस्थने देखील मोहम्मद आणि माजिदाला ओळखत असल्याचं मान्य केलंय.
 
माजिदा म्हणतात, "मला तिकडं जाऊन माझ्या घरच्यांना जगवण्यासाठी काम करायचंय. नाहीतर मला भारतात तरी काम द्यावं जेणेकरुन मी पैसे कमवून माझ्या घरी पाठवून माझ्या घरच्यांना जगवीन."
 
मोहम्मद आणि माजिदा परतीच्या वाटेकडे आस लावून बसलेत तर त्यांची तीन मुलं आई वडील कधी येतील याची वाट पाहतायेत. त्यांच्या घरी फोन नाही. त्यांच्या एका नातेवाईकाकडे कॉन्स्टेबल समीर पवार फोन लावून देतात.
 
फोनवर आपल्या मुलांशी बोलताना माजिदा यांचे अश्रू थांबता थांबत नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती