कोरोना लॉकडाऊन : 'मोबाईलच्या नादानं मुलांचं घरात लक्षच नसतं, रात्रभर झोपतच नाहीत'

शुक्रवार, 12 मार्च 2021 (17:05 IST)
हर्षल आकुडे
"लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुलाला कधीच मोबाईलशिवाय बसलेलं मला आठवतच नाही. त्याच्या हातात मोबाईल पाहून मलाच आता कंटाळा येऊ लागला आहे. घरात काय चाललंय, याकडे त्याचं लक्ष नसतं. खरंतर त्याला घराची काळजीच नसते. मोबाईल मिळाला की बास झालं. या मोबाईलच्या नादाने तो रात्रभर झोपतही नाही."
 
गृहिणी असलेल्या सुनीता चौधरी (बदललेलं नाव) त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचत होत्या.
 
सुनीता यांचा मुलगा रोहित (बदललेलं नाव) पुण्यातील एका नामांकित शाळेत नववीत शिकतो. कोरोना लॉकडाऊननंतर गेल्या एका वर्षापासून त्याची दिनचर्याच बदलून गेली आहे.
 
रोहितचे ऑनलाईन क्लासेस सकाळी होतात. त्यानंतर युट्यूबवर व्हीडिओ पाहणं, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, गेम खेळणं यामध्येच तो दिवसभर गुंतलेला असतो.
बाहेर खेळायला जाणं रोहितने कधीच सोडून दिलं. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून तो आता घरातील व्यक्तींना उलटून उद्धट उत्तरंही देत असल्याचं सुनीता यांच्या लक्षात आलं.
 
कोरोना काळात सुनीता चौधरी यांच्या घरात निर्माण झालेली ही परिस्थिती देशातील अनेकांच्या घरात पाहायला मिळते.
 
लॉकडॉऊनच्या काळात मुलांचा स्क्रीनटाईम वाढला असून त्यामुळे इतर समस्यांना आता तोंड द्यावं लागत आहे. मात्र, प्रत्येक जण याकडे अशा प्रकारे गांभीर्याने पाहतोच, असं नाही. याबाबत आपण तज्ज्ञांकडून सविस्त माहिती घेऊ.
 
मुलांची झोप उडाली
सतत मोबाईल वापरल्यामुळे शाळकरी आणि कॉलेजवयीन विद्यार्थ्यांच्या झोपेचं प्रमाण कमी झाल्याची माहिती मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.
त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दहा ते वीस वर्षांच्या मुलांना रात्रभर मोबाईल पाहायची सवय लागली आहे. मुलांचा कुटुंबीयांशीही संवाद कमी झाला आहे. मोबाईल दिला नाही तर मुलं आक्रमक होतात, असंही पालक सांगतात."
 
आपण कमीत कमी सहा ते आठ तास झोप घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टर नेहमी देताना दिसतात. पण झोप कमी झाल्यामुळे इतर आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ पाहायला मिळते.
 
लहान मुलांमध्ये झोपेच्या अभावाने चिडचिडेपणा वाढत जातो. भविष्यात ही समस्या अत्यंत गंभीर बनते, असं डॉक्टर सांगतात.
 
डोळ्यांचे विकार, मानदुखी, मणक्याच्या समस्या वाढल्या
कोरोना काळात आपल्यापैकी बहुतांश व्यक्ती घरातूनच काम करत होते. वर्क फ्रॉम होम शिवाय व्यायामही नाही, यांमुळे त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे, अशी माहिती औरंगाबाद येथील डॉ. सतीश मुंदडा यांनी दिली.
डॉ. सतीश मुंदडा हे ऑर्थोपेडीक तज्ज्ञ आहेत. ते सांगतात, "गेल्या काही दिवसांपासून मानेच्या तसंच मणक्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये डोळ्याबाबत समस्या, अंगठा सुजणं, हाताला मुंंग्या येणं, मानदुखी, पाठदुखी या तक्रारी सध्या वाढल्या आहेत."
 
या तक्रारी केवळ शालेय विद्यार्थीच नव्हे तर सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
 
"एका ठिकाणी बसून काम करणाऱ्या प्रौढांसोबतच शालेय मुलांचं प्रमाणही जास्त आहे. मुलं सध्या मोबाईलवरून शिक्षण घेतात. एकाच ठिकाणी बसून मानेची हालचालही न करता ते खाली वाकून मोबाईल पाहत असतात. यामुळे मानेच्या हाडाच्या ठिकाणी एक व्याधी होते, असंही डॉ. मुंदडा म्हणाले.
 
डॉक्टर सांगतात, "आमच्याकडे नुकतीच एक केस आली होती. संबंधित विद्यार्थी IITची तयारी करत होता. तो विद्यार्थी मोबाईलवर अभ्यास करायचा. पण त्याच्या मानेला त्याचा त्रास सुरू झाला. वैद्यकीय भाषेत 'सेव्हीअर मॅसिव्ह डिसहार्नेशन'चा हा प्रकार होता. सतत मान दुखणं, हातापायांना मुंग्या येणं वगैरे समस्या यामध्ये येतात. त्यावर वेळीच उपचार केले नसते तर रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज लागली असती."
 
सात तासांपेक्षा जास्त मोबाईल वापर हे व्यसन
मानसोपचार तज्ज्ञ आणि माईंडफुलनेस टिचर डॉ. राजेंद्र बर्वे यांनीही मोबाईल वापराची समस्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितली.
 
ते सांगतात, "पूर्वी दिवसभरात आपण सात तासांपेक्षा जास्त मोबाईल वापरत असू, तर त्याला व्यसन म्हटलं जायचं. पण लॉकडाऊनच्या काळात याची व्याख्या बदलली का, असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या कामाच्या निमित्ताने मोबाईलचा वापर होतो. त्याशिवाय शैक्षणिक, चॅटिंग, सोशल मीडिया, गेमिंग, चित्रपट आणि वेबसिरीज पाहणे यांसाठी मोबाईल वापरला जातो.
त्यात फक्त मुलांनाच दोष देऊन चालणार नाही. पालकही दिवसभर तेच करताना दिसतात. बाहेर कुठे जाऊ शकत नाही. इतर पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोबाईलचा वापर वाढला हे स्पष्ट आहे.
 
त्यामुळे आपण याबाबत तक्रारी करण्यापेक्षा आपण काय करत आहोत, याचं भान बाळगणं सर्वात आवश्यक असल्याचं डॉ. बर्वे यांना वाटतं.
उपाय काय?
मुलांनी मोबाईलपासून दूर राहावं यासाठी वरील तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार,
 
डायनिंग टेबलवर कुणीच वापर करू नये.
 
सकाळी दहानंतर मोबाईल सुरू करा
 
रात्री दहानंतर मोबाईल बंद करा.
 
दुपारी दोन तास मोबाईल बंद
 
मुलं काय बघतात याकडे लक्ष ठेवा.
 
हे बघू नको म्हणण्यापेक्षा हे बघ यातून चांगलं शिकायला मिळेल, असं आपण म्हणू शकतो.
 
साय-फाय शोजबद्दल माहिती द्यावी.
 
चांगले ऑडिओ बुक ऐकायला द्यावेत.
 
मुलांसोबत वॉकला जा, व्यायामाची सवय लावा.
 
कोणत्याही व्यसनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण काय करतो त्याचं भान राखणं कधीही चांगलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती