लोकसभा 2019 : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रवीण गायकवाडांची माघार, नवा उमेदवार कधी ठरणार?

पुण्यात आता भाजपाच्या गिरीश बापट यांच्या विरोधात काँग्रेसचां उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुण्यातून काँग्रेसचे मोहन जोशी, अभय छाजेड, उल्हास पवार, अरविंद शिंदे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यापैकी मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा शहरात आहे. प्रवीण गायकवाड यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
 
पुणे लोकसभा मदारसंघ निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचा उमेदवार मात्र अद्याप ठरलेला नाही.
 
पुण्यातून भाजपाने ब्राह्मण चेहरा दिल्याने आता मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली जाते की अरविंद शिंदे यांना याचा निर्णय अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी म्हणाले.
 
ते म्हणाले, पुण्यात ब्राह्मण- ब्राह्मण अशा लढती 5 वेळा झाल्या तेव्हा काँग्रेसच्या ब्राह्मण उमेदवाराने बाजी मारली होती.
 
पुण्यात ब्राह्म्ण उमेदवारांना अनेकदा यश मिळालं आहे. 16 लोकसभा निवडणुकांपैकी 11 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. आपली यंत्रणा तयार असून मी जायंट किलर ठरेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच व्यापारी वर्ग, मुस्लिम समाज, बहुजन वर्ग आपल्यासोबत असल्याचं जोशी म्हणाले.
 
प्रवीण गायकवाड यांची निवडणुकीतून माघार
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पुण्याच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याबाबत बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "25 वर्षे सामाजिक चळवळीत काम केलेल्या कार्यकर्त्याला भेटायला राहुल गांधींना वेळ नाही मात्र अभिनेत्री उर्मिला मातोंडकरना भेटायला वेळ आहे. त्यामुळे मी आता निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला आहे."
 
निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आपण काँग्रेसचं काम करत राहू असंही त्यांनी सांगितलं.
 
नेतृत्वातील गोंधळ आणि सहकारी पक्षाचा हस्तक्षेप
"मनी पॉवर, मसल पॉवर आणि जातीयतेच्या राजकारणाचं बळकटीकरण झालं आहे", असं मत ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाच्या गोंधळामुळे आणि सहकारी पक्षाच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसचा उमेदवार जाहीर करू शकलेला नाही. पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी दावा केला होता. मात्र शरद पवारांनी पुण्याची जागा काँग्रेसची असल्याचं सांगितलं होतं. पुण्याच्या जागेमध्ये शरद पवारांनी मोठा हस्तक्षेप केलेला आहे. महाराष्ट्र काँग्रेस आणि आखिल भारतीय काँग्रेस कमिटी शरद पवारांचं म्हणणं ऐकूनच पुण्याच्या जागेचा निर्णय होईल असं दिसतं"
 
प्रवीण गायकवाड यांच्याउमेदवारीबद्दल बोलताना खोरे म्हणाले, "शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांच्या नावाला पसंती दर्शवली होती. काँग्रेसच्या आधी भाजपाने उमेदवार जाहीर केलेला आहे. भाजपाचा उमेदवार ब्राह्मण आहे, त्यामुळे आपण मराठा किंवा बहुजन समाजाचा उमेदवार द्यायचा यावर निर्णय झाला नसावा. त्याचबरोबर चंद्रपूर येथील उमेदवार बदलला गेला याचाही परिणाम पुण्याच्या जागा वाटपावर झाला आहे. त्यामुळे आघाडीकडे सक्षम उमेदवार सापडत नसल्याची चिंता दिसत आहे."
 
उमेदवार निवडीवर शरद पवारांचा प्रभाव
"भाजपाच्या गिरीश बापट यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यावर देखील शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो. तसंच पुन्हा पुण्याची जागा राष्ट्रवादीला द्यायची आणि जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा काँग्रेसला द्यायची या पर्यायाचा देखील विचार होऊ शकतो. पुण्यात मोहन जोशी यांची तयारी चांगली आहे", असंही अरुण खोरे म्हणाले.
 
प्रवीण गायकवाड यांच्या माघारीबद्दल बोलताना सकाळचे मुख्य वार्ताहर उमेश घोंगडे म्हणाले, "प्रवीण गायकवाड हे निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार असले तरी, काँग्रेस पक्षातून 5- 6 जण इच्छुक असताना, पक्षाच्या बाहेरील उमेदवार देणं यातून पक्ष संघटनेच्या दृष्टीने हिताचं नसल्याने, तसंच यातून चुकीचा संदेश गेला असता त्यामुळे गायकवाडांना डावललं गेलं असावं."
 
काकडे-शिरोळे बापटांच्या पाठीशी
संजय काकडे यांची मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर भाजपमध्येच राहणं पसंत केलं. मंगळवारी गिरीश बापट यांनी संजय काकडेंची भेट घेत मनोमिलन झाल्याचं सांगितलं. मतभेद होते पण मनभेद नव्हते अस काकडे माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
 
विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना तिकीट नाकारून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपाने पुण्यातून तिकीट दिल. अनिल शिरोळे यांनी नाराज न होता गिरीश बापट यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
 
काँग्रेसच्या उमेदवार निश्चितीला उशिर होत असण्याबद्दल गिरीष बापट म्हणाले, "काँग्रेसचा उमेदवार ठरण्याचा निर्णय ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. मला महायुतीनं उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचा कोणताही उमेदवार समोर असला तरी गेल्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसला मतं कमी पडतील. मी गेली अनेक वर्षं सतत काम केलं आहे. नगरसेवक ते मंत्रिपद असा माझा प्रवास आहे. मी जातीपातीच्या आधारे निवडणूक लढवू इच्छित नाही. गुणवत्तेच्या आधारे निवडणूक लढवणार आहे."
 
कोण आहेत मोहन जोशी?
मोहन जोशी गेली गेली चाळीस वर्षें काँग्रेसमध्ये आहेत. 1987 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले आहेत. 1997-2005 या काळात ते काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष होते.
 
1999 मध्ये त्यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यात भाजपाचे प्रदीप रावत विजयी झाले होते. मोहन जोशी यांना 2 लाख 13 हजार मतं मिळाली होती.
 
2008-2014 या कालावधीत विधान परिषदेत आमदार होते.
 
अरविंद शिंदे हे 1997 पासून पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. पुणे पालिकेत 2017पासून ते काँग्रेसचे गटनेते आणि 2013-17 या कालावधीमध्ये ते पालिकेत विरोधी पक्षनेते होते.
 
2010 साली ते पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती