विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, असे काम करा - जयंत पाटील

गुरूवार, 28 मार्च 2019 (10:35 IST)
केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. म्हणूनच या सरकारविरोधात आपल्याला एकत्र यायचे आहे. विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असे काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलयांनी हातकणंगले येथील जाहीर सभेत केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
 
पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार प्रत्येक वर्षी विजेचे दर वाढवते आहे. खताच्या किंमती वाढवल्या पण शेतीमालाला भाव काही वाढवून मिळत नाही. राजू शेट्टी यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी खोटी आश्वासने दिली. राजू शेट्टी यांना जेव्हा कळले की, हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करते आहे, तेव्हा सर्वात आधी त्यांनी भाजपाची साथ सोडली. अनेक वर्षे खासदार राजू शेट्टी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे शेट्टी यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही पाटील यांनी टीका केली. ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. मीच काय तो पाच वर्षांपासून काम करतो आहे, असे बिंबवण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. पण लोकांना कळून चुकले आहे की, मोदी आपली फसवणूक करत आहेत. त्यामुळे मोदींवर आता जनतेचा भरोसा राहिलेला नाही, असे ते म्हणाले. देशात चातुर्वण्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हे आम्ही कदापि सहन करणार नाही, असा खणखणीत इशाराही या वेळी पाटील यांनी दिला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती