सोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी मांडले जगापुढे दुःख

शनिवार, 20 जुलै 2019 (14:33 IST)
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांना भेटल्या. शुक्रवारी पीडित कुटुंबांना भेटण्यापासून उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवलं होतं नि नारायणपुरातून 'ताब्यात' घेतलं.
 
नंतर त्यांना चुनार विश्रामगृहात थांबवण्यात आलं होतं, जिथे त्या शुक्रवारपासून आहेत. पीडितांना भेटूनच परत जाईन, असं म्हणत प्रियंका गांधींनी धरणं आंदोलन केलं होतं. काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही त्यांच्यासोबत आहेत.
 
सोनभद्र गोळीबाराच्या पीडित कुटुंबीयांनी अखेर त्यांची या विश्रामगृहावर येऊन भेट घेतली. यावेळी पीडितांच्या भावनांचा बांध फुटला. प्रियंका गांधींना मिठी मारून अनेकांनी हंबरडा फोडला आणि आपल्या व्यथा मांडल्या. "आम्ही स्वत: प्रियंका गांधींना भेटायला आलो," असं पीडित म्हणाले.
 
उत्तर प्रदेश पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रियंका गांधी या आता पोलिसांच्या ताब्यात नाहीत. वाराणसी विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बृज भूषण यांनी बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांना सांगितलं की, "प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात नाहीत. सोनभद्र वगळता तुम्ही कुठेही जाऊ शकता, असं आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय. चुनार विश्रामगृहात त्या स्वेच्छेने थांबल्या आहेत."
 
दुसरीकडे, प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "पीडितांची भेट घेणं हा गुन्हा नसून, तो नेत्यांचा धर्म असतो. मी कुठलाही गुन्हा केला नाहीये. मी जामीन भरणार नाही. एक पैसा भरणार नाही."
 
शनिवारी सकाळीदेखील त्यांनी चुनार येथे धरणे आंदोलन सुरू केलं. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "प्रशासनाला काय हवंय, मला कळत नाहीये. ते मला या कुटुंबाला का भेटू देत नाहीयेत."
 
"मी त्यांची भेट घेतल्याशिवाय तर परत जाणार नाही. जर सरकारला वाटत असेल तर मी त्यांना सोनभद्रऐवजी दुसरीकडे कुठेही भेटण्यास तयार आहे. तशी व्यवस्था सरकारने करावी," असंही गांधी म्हणाल्या.
 
दरम्यान, काही वेळापूर्वीच पीडित कुटुंबातील दोघांनी इथे येऊनच गांधींची भेट घेतली. प्रियंका गांधींची भेट घेतल्यावर ते म्हणाले, "आम्ही स्वतःहून इथवर प्रियंका जींना भेटायला आलोय. आम्ही 15 जण आलो आहोत, पण पोलिसांनी बाकिच्यांना अडवलं आहे. फक्त आम्ही इथे आलोय."
 
विश्रामगृहात ना वीज, ना पाणी!
प्रियंका गांधी यांना शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा चुनार विश्रामगृहात आणलं गेलं, त्यावेळी तिथे ना पाणी होतं ना विजेची व्यवस्था होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावल्या आणि भजन-कीर्तन सुरू केलं.
 
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विश्रामगृहावर जनरेटर आणण्यात आलं आणि पर्यायी विजेची व्यवस्था झाली.
 
या दरम्यान पोलीस अधिकारी प्रियंका गांधींना परत जाण्यासाठी विनंती करत होते. मात्र पत्रकारांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "हिंसाचार पीडितांना भेटल्याशिवाय मी परत जाणार नाही."
 
विश्रामगृहात पाणी, वीज नसल्याबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर त्या थेटपणे न बोलता म्हणाल्या, "मी संघर्ष करत आहे आणि करत राहीन."
 
"जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी मला सांगितलं की, इथे एसी नाहीये, तुम्ही वाराणसीला जा. तर मी त्यांना सांगितलं की, मी जाणार नाही. मला एसी किंवा विजेची आवश्यकता नाही. मला तुरुंगात टाकायचं असेल तर टाका, पण पीडितांना भेटल्याशिवाय परत जाणार नाही."
 
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील घोरवाल परिसरात बुधवारी एका जमिनीच्या वादातून हिंसाचार झाला होता. या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 24 हून जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या हिंसाचाराला 'नरसंहार' म्हटलं असून, उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे.
 
शुक्रवारी त्या पीडितांना भेटायला सोनभद्र येथे आल्या असताना त्यांना रोखण्यात आलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चुनार विश्रामगृहात ठेवलं. प्रियंका यांनी विश्रामगृहातच धरणे आंदोलन सुरू केलं.
 
परिसरातील तणाव पाहता स्थानिक प्रशासनाने सोनभद्रमध्ये कलम 144 लागू केला.
 
प्रियंका यांना ताब्यात घेतल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी माध्यमांना सांगितलं की, प्रियंका गांधी यांना सोनभद्र येथे जाण्यापासून रोखण्यात आलं तर त्या रस्त्यावरच बसून आंदोलन करू लागल्या. त्यानंतर त्यांना मिर्झापूर रोडवरील नारायणपूरमधून ताब्यात घेण्यात आलं.
 
प्रियंका गांधी म्हणाल्या, "सोनभद्रमध्ये कलम 144 लागू असेल, तर मी त्याचं उल्लंघन करणार नाही, असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं. मी तुमच्यासोबत पीडितांना भेटायला जाईन. कुठल्याही स्थितीत पीडितांची भेटवून द्या. तरीही माझ्यावर पोलिसांनी कारवाई केली. मला इथे ठेवलंय. मात्र पीडितांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही, हे स्पष्ट आहे."
 
प्रियंका गांधी यांच्या माहितीनुसार, मिर्झापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि वाराणसीला परतण्याचा आग्रह केला.
 
तुम्ही कधीपर्यंत वाट पाहाल, असा प्रश्न प्रियंका यांना विचारला, तेव्हा त्या म्हणाल्या, "माझ्यात प्रचंड सहनशक्ती आहे."
 
चौकशीसाठी समिती स्थापन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्रमधील हिंसाचाराला काँग्रेसला जबाबदार ठरवलंय. याआधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत योगी आदित्यनाथ सोनभद्रमधील हिंसाचाराबाबत माहिती देत होते, त्यावेळी काँग्रेस आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे त्यांना नीट बोलता आलं नव्हतं.
 
त्यानंतर एका चर्चासत्रात योगी आदित्यनाथ यांनी या संपूर्ण हिंसाचाराला काँग्रेसला जबाबदार ठरवत म्हटलं, काँग्रेसच्या सत्ताकाळात आदिवासींच्या जमिनी एका सोसायटीच्या नावे करण्यात आल्या होत्या.
 
प्रियंका गांधींना याबाबत विचारल्यावर त्या म्हणाल्या, "केंद्रात आणि राज्यात सरकार कुणाचं आहे?"
 
दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले, सोनभद्रच्या घटनेवरून राजकारण करू नये.
 
दरम्यान, सोनभद्र हिंसाचाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती 10 दिवसात अहवाल देईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती