कारगिल युद्धः परमवीर योगेंद्र सिंह यादव, जे 15 गोळ्या झेलूनही लढत राहिले
शनिवार, 20 जुलै 2019 (14:20 IST)
रेहान फजल
20 वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वतांवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं. पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या डोंगरांवर घुसखोरी करत मोर्चेबांधणी केली आणि युद्धाला सुरुवात झाली. कारगिल युद्धाला आता 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धाच्या आठवणी आणि माहिती सांगणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग.
3 जुलै 1999. टायगर हिलवर बर्फवृष्टी होत होती. रात्री साडेनऊ वाजता ऑप्स रूम (ऑपरेशन्स)मधला फोन खणखणला. कोअर कमांडर जनरल किशन पाल यांना जनरल मोहिंदर पुरी यांच्याशी तातडीने बोलायचं असल्याचं ऑपरेटरने सांगितलं.
दोघांमध्ये काही मिनिटांचं संभाषण झालं. त्यानंतर 56 माऊंटन ब्रिगेडचे डेप्युटी कमांडर एसव्ही डेव्हिड यांना पुरींनी सांगितलं," टीव्ही रिपोर्टर बरखा दत्त आसपास आहेत का ते पाहा. आणि त्या टायगर हिलवर होणाऱ्या हल्ल्याचं लाईव्ह रिपोर्टिंग करत आहेत का?"
लेफ्टनंट जनरल मोहिंदर पुरी त्या दिवसाची आठवण सांगतात, "टायगर हिलवर करण्यात येणाऱ्या हल्ल्याची बरखा दत्त लाईव्ह बातमी देत असल्याचं मला समजल्याबरोबर मी तातडीने त्यांना भेटलो आणि सांगितलं की हे लगेच थांबवा, कारण आम्हाला हे पाकिस्तानला कळू द्यायचं नाही."
जनरल पुरी म्हणतात, "या हल्ल्याची माहिती मी फक्त माझ्या कोअर कमांडरना दिली होती. त्यांनी याबाबत सेना प्रमुखांनाही सांगितलं नव्हतं. म्हणूनच मला आश्चर्य वाटलं की इतक्या गुप्त आणि संवदेनशील ऑपरेशनचं बरखा दत्त लाईव्ह रिपोर्टिंग कसं करू शकतात?"
टायगर हिल ताब्यात आल्याची घोषणा
तेव्हाचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी टायगर हिलवर भारताने ताबा मिळवल्याची घोषणा जेव्हा 4 जुलै रोजी केली, तोपर्यंत खरंतर भारतीय सैनिकांनी त्यावर पूर्ण ताबा मिळवलेला नव्हता.
टायगर हिलचा कळस तेव्हाही पाकिस्तानच्या ताब्यात होता. भारतीय सैन्यातले दोन शूर तरुण ऑफिसर - लेफ्टनंट बलवान सिंह आणि कॅप्टन सचिन निंबाळकर टायगर हिलवर बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना नेस्तनाबूत करण्यासाठी निकराचे प्रयत्न करत होते.
ते कळसापासून 50 मीटर खाली असताना ब्रिगेड मुख्यालयात संदेश आला, "They're short of the top. (ते कळसाच्या जवळ आहेत)."
श्रीनगर आणि उधमपूर मार्गे हा निरोप दिल्लीला पोहोचेपर्यंत त्याचे शब्द बदलून झाले होते - "They're on the top (ते टायगर टॉपवर पोहोचले आहेत)."
संरक्षण मंत्री फर्नांडिस पंजाबात एका सभेत बोलत असताना त्यांना हा निरोप मिळाला.
पुढचामागचा विचार न करता, या निरोपाची खात्री करून न घेता त्यांनी घोषणा केली - "भारताने टायगर हिल पुन्हा आपल्या ताब्यात घेतला."
पाकिस्तानचं प्रत्युत्तर
जनरल मोहिंदर पुरी सांगतात की जेव्हा त्यांनी कोअर कमांडर जनरल किशनपाल यांना ही बातमी सांगितली तेव्हा ते म्हणाले, 'जा, जाऊन शॅम्पेन उडवा'.
त्यांनी सैन्य प्रमुख जनरल मलिक यांना ही बातमी सांगितली आणि त्यांनी या यशाबद्दल फोनवरून जनरल पुरी यांचं अभिनंदन केलं.
पण गोष्ट अजून संपली नव्हती. टायगर हिलच्या टोकावर इतकी कमी जागा होती की तिथे फक्त काहीच जवान मावू शकत होते. अचानक उतारांवर येत पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांवर प्रतिहल्ला केला.
टायगर हिलच्या कळसाभोवती त्यावेळी इतके ढग होते की भारतीय सैनिकांना पाकिस्तानी सैनिक दिसलेच नाहीत. या हल्ल्यामध्ये शिखराजवळ पोहोचलेले सात भारतीय जवान मारले गेले.
मिराज 2000चा बॉम्बहल्ला
16,700 फूट उंच असणारं टायगर हिल काबीज करण्याचा पहिला प्रयत्न मे मध्ये करण्यात आला. पण तेव्हा मोठं नुकसान सोसावं लागलं.
तेव्हा मग असं ठरवण्यात आलं की जोपर्यंत आजूबाजूची शिखरं ताब्यात येत नाहीत, तोपर्यंत टायगर हिलवर परत हल्ला करायचा नाही.
3 जुलैच्या हल्ल्याआधी भारतीय तोफांच्या 100 बॅटरीजनी टायगर हिलवर एकाचवेळी गोळे डागले. त्याआधी मिराज 2000 विमानांनी 'Pave-way laser-guided bomb(लेझरनी नेम धरून डागलेले 'पेव्ह-वे नावाचे बॉम्ब') डागत पाकिस्तानचे बंकर उद्ध्वस्त केले होते.
त्यापूर्वी जगभरामध्ये कुठेही इतक्या उंचीवर अशाप्रकारच्या आयुधांचा वापर करण्यात आला नव्हता.
90 अंशांची खडी चढण
याभागाची पाहणी केल्यानंतर भारतीय सैनिकांनी पूर्वीकडील चढणीवरून जाण्याचा निर्णय घेतला. हा जवळपास 90 अंशांचा खडा चढ होता आणि त्यावर चढणं जवळपास अशक्यप्राय होतं.
पण हा एकमेव मार्ग होता जिथून जात पाकिस्तानला चकवा देता आला असता.
रात्री 8 वाजता हे जवान आपल्या बेस कॅम्पमधून निघाले आणि त्यांनी चढाईला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ते टायगर हिलच्या शिखराच्या अगदी जवळ पोहोचले होते.
अनेक ठिकाणी वर चढण्यासाठी त्यांनी दोर वापरला. त्यांच्या बंदुका त्यांच्या पाठीला बांधलेल्या होत्या.
'अ सोल्जर्स डायरी - कारगिल द इनसाईड स्टोरी' या आपल्या पुस्तकात वरिष्ठ पत्रकार हरिंदर बवेजा लिहितात, "एक क्षण असा आला की त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांच्या दृष्टिक्षेपात न येणं अशक्य झालं. त्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला आणि भारतीय सैनिकांना मागे फिरणं भाग पडलं. दोन भारतीय जवान गंभीर जखमी झाले. माघार घेणाऱ्या भारतीय जवानांवर पाकिस्तान्यांनी मोठमोठे दगड टाकायला सुरुवात केली."
योगेंद्र सिंह यादव यांची झुंज
18 ग्रेनेडियर्सच्या 25 सैनिकांनी 5 जुलैला पुन्हा चाल केली. पाकिस्तान्यांनी पुन्हा एकदा जबरदस्त गोळीबार केला. तब्बल पाच तास गोळीबार सुरू होता.
18 ग्रेनिडियर्सच्या सैनिकांकडे माघार घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं. आता त्यांच्यातले फक्त 7 सैनिक उरले होते.
'द ब्रेव्ह' लिहिणाऱ्या रचना बिश्त-रावत सांगतात, "भारतीय सैनिक जिवंत आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी साडे अकरा वाजताच्या सुमारास 10 पाकिस्तानी सैनिक खाली आले. प्रत्येक भारतीय सैनिकाकडे फक्त 45 राऊंड गोळ्या उरल्या होत्या. त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना जवळ येऊ दिलं. त्यांनी क्रीम रंगाचे पठाणी सूट घातलेले होते. ते जवळ येताच भारतीय सैनिकांनी फायरिंग सुरू केलं."
त्यातलेच एक होते बुलंदशहरचे 19 वर्षांचे ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव. ते आठवण सांगतात, "आम्ही पाकिस्तान्यांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या आणि त्यांच्यातल्या आठ जणांना ठार केलं. दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी वर जाऊन त्यांच्या साथीदारांना सांगितलं की खाली आम्ही फक्त सातजण आहोत."
मृतदेहांवरही गोळीबार
योगेंद्र पुढे सांगतात, "काही वेळातच 35 पाकिस्तान्यांनी आमच्यावर हल्ला करत आम्हाला चहुबाजूंनी घेरलं. माझे सर्व 6 सोबती मारले गेले. मी भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांच्या मृतदेहांमध्ये पडलो होतो. पाकिस्तान्यांना सगळ्या भारतीयांना ठार मारायचं होतं म्हणून ते मृतदेहांवरही गोळ्या झाडत होते."
"डोळे मिटून मी मृत्यूची वाट पाहू लागलो. माझे पाय, हात आणि इतर शरीरात जवळपास 15 गोळ्या घुसल्या होत्या, पण तरीही मी जिवंत होतो."
यानंतर जे झालं ते अगदी एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखं होतं.
योगेंद्र सांगतात, "आमची सगळी हत्यारे पाकिस्तानी सैनिकांनी गोळा केली. पण माझ्या खिशात ठेवलेला ग्रेनेड त्यांना कळला नाही. माझी सगळी ताकद पणाला लावत मी ग्रेनेड खिशातून काढला, त्याची पिन काढली आणि तो पुढे जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर भिरकावला. तो ग्रेनेड एका पाकिस्तानी सैनिकाच्या हेल्मेटवर पडला आणि त्याच्या चिंधड्या उडाल्या. एका पाकिस्तानी सैनिकाच्या मृतदेहाजवळ पडलेली रायफलही मी उचलली होती. मी केलेल्या फायरिंगमध्ये पाच पाकिस्तानी सैनिक मारले गेले."
ओढ्यामध्ये उडी
तेव्हाच पाकिस्तानी वायरलेसचा संवाद योगेंद्र सिंह यांच्या कानावर पडला. ते सांगत होते की इथून माघार घ्या आणि 500 मीटर खाली असणाऱ्या भारताच्या MMG बेसवर हल्ला करा.
तोपर्यंत योगेंद्र यांचं खूप रक्त वाहिलं होतं आणि शुद्धीत राहणं त्यांना कठीण जात होतं. तिथूनच जवळ एक ओढा वाहत होता. त्याच अवस्थेत त्यांनी या ओढ्यात उडी मारली. पाच मिनिटांमध्ये हे वाहत 400 मीटर खाली आले.
तिथे भारतीय सैनिकांनी त्यांना ओढून बाहेर काढलं. तोपर्यंत इतका रक्तस्राव झालेला होता की त्यांना समोरचं दिसतही नव्हतं. पण जेव्हा त्याचे सीओ खुशहाल सिंह चौहान यांनी त्यांना विचारलं, "तू मला ओळखलंस का?" तेव्हा यादव यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, "मी तुमचा आवाज ओळखला. जय हिंद साहेब!"
योगेंद्र यांनी खुशहाल सिंह चौहान यांना सांगितलं की पाकिस्तान्यांनी टायगर हिल सोडला असून ते आता आपल्या MMG बेसवर हल्ला करण्यासाठी येत आहेत. यानंतर योगेंद्र सिंह यादव बेशुद्ध झाले.
काही वेळानंतर जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी तिथे हल्ला केला तेव्हा भारतीय सैन्य आधीपासूनच त्यासाठी सज्ज होतं.
यादव यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार असणारं परमवीर चक्र देण्यात आलं.
भारतीय सेनेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
तिथे खालून एकापाठोपाठ एक रेडिओ संदेश येऊ आदळत होते. कारण टायगर हिल वर विजय मिळवण्यात आल्याची घोषणा संरक्षण मंत्र्यांनी केल्याची बातमी ब्रिगेच्या मुख्यालयात पोचली होती. आता ब्रिगेडच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लवकरात लवकर टायगर हिलवर भारतीय झेंडा फडकवायचा होता. आणि यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची त्यांची तयारी होती.
आता हा भारतीय सैन्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न होता. कारण साऱ्या जगाला सांगण्यात आलं होतं की टायगर हिल भारतीय सैन्याने ताब्यात घेतलेला आहे.
या सगळ्यातच 18 ग्रेनेडियर्सची एक कंपनी टायगर हिलच्या टोकावर पोहोचली आणि म्हणून मग पाकिस्तानी सैनिकांना आपल्या भागाचं रक्षण करण्यासाठी अनेक पथकांमध्ये विभाजित व्हावं लागलं.
हरिंदर बवेजा आपल्या पुस्तकात लिहितात, "भारतीय सैनिक याच क्षणाची वाट पाहत होते. भारतीय सैनिकांनी आता तिसऱ्यांदा हल्ला सुरू केला. यावेळी नेतृत्व करत होते 23 वर्षांचे कॅप्टन सचिन निंबाळकर. इतक्या लवकर हल्ला होईल अशी पाकिस्तानला अपेक्षा नव्हती. दोनदा वर जाऊन पुन्हा खाली यावं लागल्याने निंबाळकरांना हा रस्ता पूर्णपणे माहीत होता. कोणताही आवाज न करता त्यांचे जवान टायगर हिलच्या शिखरावर पोहोचले आणि काही मिनिटांतच त्यांनी टायगर हिलवरच्या पाकिस्तानच्या आठ बंकर्सपैकी एकाचा ताबा घेतला."
आता त्यांची पाक सैन्यासोबत थेट समोरासमोर लढाई सुरू होती. आता पाक सैनिकांना उंचीवर असण्याचा फायदा मिळत नव्हता. रात्री दीड वाजता टायगर हिलचं शिखर भारतीय सैनिकांच्या ताब्यात आलं, पण टायगर हिलच्या दुसऱ्या बाजूला अजूनही पाकिस्तानी सैनिक मोर्चा रोखून होते.
गड आला पण...
तेव्हाच भारतीय सैनिकांना खाली झुंजणाऱ्या त्यांच्या सोबत्यांच्या आरोळ्या ऐकू आल्या. वरच्या सैनिकांनी विजय मिळवल्याचा रेडिओ संदेश कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. देशाच्या संरक्षण मंत्र्यांना दुनियेसमोर मान खाली घालावी लागण्याची आता त्यांना चिंता नव्हती.
भारतीय सैनिक पार थकून गेले होते. लेफ्टनंट बलवान धक्क्यात होते. त्यांनी टायगर हिलवर हल्ला केला तेव्हा त्यांच्यासोबत 20 जवान होते. आता त्यातले फक्त 2 जिवंत होते.
बाकी सगळे एकतर गंभीर जखमी होते वा शहीद झाले होते. पाकिस्तानी सैनिक जो शस्त्रसाठी टाकून पळाले होते, त्याची काही जणांनी पहाणी करायला सुरुवात केली.
तो साठा पाहिल्यांवर त्यांच्या अंगावर शहारा आला. तो शस्त्रसाठा इतका मोठा होता की पाकिस्तानी सैनिक तिथे कोणत्याही रसदीशिवाय अनेक आठवडे लढू शकले असते. अवजड हत्यारं आणि 1000 किलोंची 'लाईट इंफंट्री गन' तिथे हेलिकॉप्टरने आणल्याशिवाय पोहोचूच शकली नसती.
पाकिस्तानची युद्धबंदी
टायगर हिलवर हल्ला करायच्या दोन दिवस आधी भारतीय सैनिकांनी एका पाकिस्तानी जवानाला जिवंत पकडलं होतं. त्याचं नाव होतं मोहम्मद अशरफ. तो गंभीर जखमी होता.
ब्रिगेडियर MPS बाजवा सांगतात, "मी माझ्या जवानांना सांगितलं, त्याला खाली माझ्याकडे पाठवा. मला त्याच्याशी बोलायचं आहे. जेव्हा त्याला माझ्याकडे आणण्यात आलं तेव्हा मी माझा ब्रिगेडियरचा युनिफॉर्म घातलेला होता. माझ्या समोर त्याच्या डोळ्यांवरची पट्टी काढण्यात आली. मला पाहून तो रडायला लागला."
"हे पाहून मी चकित झालो. त्याला मी पंजाबीत विचारलं, 'क्यों रो रेया तू?' (तू का रडतोयस?) त्याचं उत्तर होतं, 'मैंने कमांडर नहीं वेख्या जिंदगी दे विच.(मी आयुष्यात कधीही कमांडर पाहिलेला नाही.) पाकिस्तानात ते आमच्याजवळ येत नाही. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही इतके मोठे ऑफिसर आहात आणि माझ्याशी माझ्या भाषेत बोलत आहात. ज्याप्रकारे तुम्ही माझ्यावर उपचार केलेत, मला खाऊ घातलंत ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे.' "
मृतदेहांना मान
डोंगरातल्या युद्धामध्ये जीवीतहानी मोठ्या प्रमाणावर होते. कारण गोळी लागून घायाळ झालेल्या जवानाला खाली आणायला भरपूर वेळ लागतो आणि तोपर्यंत भरपूर रक्त वाहून जातं.
पाकिस्तानी सेनेचे बहुतेक जवान मारले गेले. जनरल मोहिंदर पुरी सांगतात की 'अनेक पाकिस्तानी जवानांचं भारतीय मौलवींच्या उपस्थितीत पूर्ण इस्लामी पद्धतींनी दफन करण्यात आलं.'
हे लोक पाकिस्तानी सैन्याचे नाहीत, असं म्हणत पाकिस्तानने सुरुवातीला मृतदेह स्वीकारायला नकार दिला. पण नंतर ते आपले मृतदेह स्वीकारायला तयार झाले.
बिग्रेडियर बाजवा एक किस्सा सांगतात, "टायगर हिलच्या विजयाच्या काही दिवसांनंतर माझ्याकडे पाकिस्तानकडून एक रेडिओ संदेश आला. तिथून आवाज आला, 'मी CO 188 MF बोलतोय. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या मारल्या गेलेल्या साथीदारांचे मृतदेह परत करावेत."
ब्रिगेडिअर बाजवांनी विचारलं की याबदल्यात ते काय करतील? समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ते परत निघून जातील आणि त्यांना हटवण्यासाठी हल्ला करावा लागणार नाही.
बाजवा सांगतात, "युद्धभूमीमध्ये आम्ही अगदी मानाने त्यांचे मृतदेह पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळले. मी त्यांना अट घातली की पार्थिव नेण्यासाठी तुम्हाला तुमची स्ट्रेचर्स आणावी लागतील. ते स्ट्रेचर्स घेऊन आले. आम्ही पूर्ण लष्करी इतमामात त्यांचे मृतदेह परत केले. या पूर्ण कारवाईचं व्हीडिओ शूटिंग करण्यात आलं, जे आजही युट्यूबवर तुम्ही पाहू शकता."