अब्दुल कदीर खान : जगातला सगळ्यांत धोकादायक माणूस?

सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (21:23 IST)
गोर्डन कोरेरा
ही गोष्ट 11 डिसेंबर 2003 मधली आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए आणि ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय-6 चे अधिकारी लीबियामध्ये एका गुप्त मोहिमेवर चालले होते. त्यांच्याकडे करड्या रंगाच्या पाकिटांची सहा बंडलं देण्यात आली.
 
ही टीम लीबियामधील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एका गुप्त मोहिमेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली होती. अधिकाऱ्यांनी पाकिट उघडल्यानंतर आपल्याला हवे असलेले पुरावे आतमध्ये असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या पाकिटात एका आण्विक अस्त्राचं डिझाइन होतं.
 
हे डिझाइन बनविणाऱ्या आणि लीबियाच्या आण्विक कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य पुरविणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं- अब्दुल कदीर खान. रविवारी (10 ऑक्टोबर) वयाच्या 85 व्या वर्षी कदीर खान यांचं निधन झालं.
गेल्या पाच दशकांपासून जागतिक सुरक्षेचा विचार करता अब्दुल कदीर खान हे नाव अतिशय महत्त्वाचं राहिलं होतं. त्यांच्या गोष्टीमध्ये जगातील सर्वांत घातक अशा तंत्रज्ञानाची लढाई केंद्रस्थानी होती. या लढाईत दोन बाजू होत्या- ज्यांच्याकडे हे तंत्रज्ञान आहे असे देश आणि ज्यांना हे तंत्रज्ञान मिळवायचं होतं असे देश
 
सीआयएचे माजी संचालक जॉर्ज टेनेट यांनी अब्दुल कदीर खान हे ओसामा बिन लादेन इतकेच धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. ही तुलना खूप महत्त्वाची आहे. कारण बिन लादेन अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.
 
पाश्चिमात्य देशातील गुप्तचर संस्थांच्यादृष्टिने अब्दुल कदीर खान हे जगातील धोकादायक व्यक्तींपैकी एक होते, पण त्यांच्या देशात मात्र ते हिरो होते. त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून जगाचा आण्विक शस्त्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आपल्या लक्षात येऊ शकतो.
 
युरोपमधील नोकरी ते हेरगिरीपर्यंतचा प्रवास
1970च्या दशकात खान हे नेदरलँड्समध्ये काम करत होते. ते युरोपमध्ये अणुतंत्रज्ञानासाठी हेरगिरी करायला नक्कीच आले नव्हते, पण नंतर त्यांनी ती केली.
 
हा तोच काळ होता जेव्हा 1971च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्ताननं बॉम्ब बनविण्याचं काम अधिक वेगानं सुरू केलं होतं. भारताच्या आण्विक प्रगतीची पाकिस्ताननं धास्ती घेतली होती.
खान युरोपमध्ये युरेनियम संवर्धित करण्यासाठी सेंट्रीफ्यूज बनविणाऱ्या कंपनीत काम करत होते. संवर्धित युरेनियमचा वापर अणुऊर्जा बनविण्यासाठी केला जातो आणि ते जास्त संवर्धित असेल तर त्याचा वापर अणुबॉम्ब बनविण्यासाठी होतो.
 
खान यांनी या कंपनीतील सगळ्यांत प्रगत अशा सेंट्रीफ्यूजच्या डिझाइनची नक्कल केली आणि ती मायदेशी परत आले. त्यांनी एक गुप्त नेटवर्क तयार केलं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर युरोपियन व्यावसायिकांचा समावेश होता. हे लोक आवश्यक अशा तंत्रज्ञानाचा पुरवठा करत होते.
 
यासाठी खान यांनी नेमकं काय केलं आणि कसं केलं याची पूर्ण माहिती आता कदाचित समोर येणारच नाही.
 
पाश्चिमात्य देशांचे शत्रू?
खान यांना पाकिस्तानच्या अणुबॉम्बचं जनक मानलं जातं. पण, वास्तवात ते यासाठीची जी टीम होती तिचे महत्त्वपूर्ण सदस्य होते. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक स्वत:विषयीची गोष्ट विकसित केली, ज्यामुळे त्यांना एक 'राष्ट्र नेता' अशी ओळख मिळाली. यानं भारतापासूनच्या धोक्यापासून पाकिस्तानची सुरक्षा निश्चित केली.
 
पण, अणुबॉम्ब बनवण्याच्या इतर काही गोष्टींनी खान यांना महत्त्वपूर्ण बनवलं. त्यांनी त्यांच्या नेटवर्कचं रुपांतर इम्पोर्टमधून एक्स्पोर्टमध्ये केलं.
 
अनेक देशांशी करार करणारे ते चेहरा बनले. पाश्चिमात्य देश अशा देशांना 'राँग स्टेट' मानतात. याचा अर्थ असे देश ज्यांची प्रवृत्ती आणि हेतू स्वच्छ नसतो.
 
इराणमधील नतांझ आण्विक संयंत्रामुळे नुकतीच जागतिक रणनीतीमध्ये हालचाल निर्माण झाली. याच्या डिझाइन आणि मटेरियलचा एक मोठा हिस्सा खान यांच्याकडून प्रदान करण्यात आला होता. एका बैठकीत खान यांच्या प्रतिनिधींनी मूळ रुपात एका मेन्युसोबत मूल्य-सूची सादर केली होती. यासाठी इराण ऑर्डर देऊ शकत होता.
खान यांनी अनेकदा उत्तर कोरियाचा दौरा केला. असं म्हटलं जातं की, कोरियानं पाकिस्तानला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान दिलं आणि त्याबदल्यात यांनी अणुतंत्रज्ञान.
 
खान स्वत: हे करार करत होते की आपल्या सरकारच्या आदेशानुसार करत होते, हे या करारांमधील रहस्य कायम राहिलं.
 
विशेष करून उत्तर कोरियासोबतचा करार. या कराराची फक्त सरकारला माहितीच नव्हती, तर सरकार पूर्णपणे यात सहभागी होतं, सगळ्या गोष्टी याकडे अंगुलीनिर्देश करत होत्या.
 
खान स्वत: पैशांच्या मागे आहे, असं कधीकधी सांगितलं जात होतं. पण, हे असं समजणं इतकं सोपं नाहीये. आपल्या सरकारसोबत काम करत करत त्यांची इच्छा होती की, आण्विक शस्त्रांबाबतचा पाश्चिमात्य देशांचा एकछत्री अंमल संपुष्टात आणला पाहिजे.
काहीच देशांना शस्त्र ठेवायची परवानगी का होती आणि काही देशांनी का नाही? हे म्हणजे पाश्चिमात्य देशांचं पाखंड आहे, असं ते म्हणत होते.
 
त्यांनी म्हटलं होतं, "मी मूर्ख नाहीये. त्यांना मी आवडत नाही. मी त्यांच्या राजकीय योजनांना खराब केलं आहे, त्यामुळे ते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत."
 
खान यांच्यावर पुस्तक लिहिण्यादरम्यान जेव्हा मी त्यांच्या नेटवर्कमधील काही लोकांना भेटलो तेव्हा मला वाटलं की, ते लोक पैशांसाठी काम करत आहेत. 1990च्या दशकात लीबिया कराराच्या बदल्यात बक्षीस तर भेटलं, पण हीच त्यांच्या पतनाची सुरुवात होती.
 
लिबियाचा करार आणि पतनास सुरुवात
ब्रिटनच्या एमआय 6 आणि सीआयएनं खान यांचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवली जाऊ लागली, फोन कॉल्स इंटरसेप्ट केले जाऊ लागले. त्यांच्या नेटवर्कमधील लोकांना कोट्यवधी रुपये देऊन एजेंट बनवलं गेलं.
 
11 सप्टेंबर 2001च्या हल्ल्यानंतर ही भीती वाढीस लागली की, दहशतवाद्यांच्या हातात हे शस्त्र पडली, तर हल्ले अजून वाढू शकतात. अशात पाकिस्तानला खान यांच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितलं जाऊ लागलं.
 
मार्च 2003 मध्ये अमेरिका आणि ब्रिटननं विध्वंसक आण्विक शस्त्रांच्या नावानं इराकवर हल्ला केला. तिथं मात्र काहीच मिळालं नाही. लिबियाचे शासक कर्नल गडाफी यांनी ठरवलं की, ते आपल्या आण्विक योजनांपासून दूर जाऊ पाहत आहेत.
 
यासाठी त्यांनी सीआयए आणि एमआय-6ची मदत केली आणि त्यांचा एक गुप्त दौरा आयोजित केला. यात एका लिफाफ्यात पुरावे देण्यात आले. त्यानंचर लगेच कराराची माहिती सार्वजनिक करण्यात आली.
 
यामुळे मग अमेरिकेला खान यांच्याविरोधात पक्के पुरावे मिळाले आणि त्यांनी पाकिस्तानवर खान यांच्याविरोधात कारवाई करण्याचा दबाव आणला.
 
यानंतर खान यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि त्यांना टीव्हीवर कबुलीजबाब देण्यास प्रवत्त करण्यात आलं.
 
इथून पुढे त्यांनी आपलं जीवन एका विचित्र अवस्थेत काढलं, या अवस्थेत ते ना स्वतंत्र होते ना कैदेत.
 
देशात अणुबॉम्ब आणल्याप्रकरणी पाकिस्तान त्यांची प्रशंसा करत आलं आहे आणि आता निधनावर शोक व्यक्त करत आहे. पण, त्यांच्यावर नेहमीच प्रवास करण्याची बंदी राहिली. शिवाय देशाबाहेर कुणाशी बोलण्यासही त्यांनी मनाई होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती