वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही-अजित पवार
रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (10:22 IST)
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान हे अंदाजे 4 हजार कोटींचं असल्याचा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. एनडीआरएफच्या नियमांनुसार हा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात 48 लाख हेक्टरपैकी 35 ते 36 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 75 टक्के क्षेत्राचं नुकसान झालं असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी वेळ आली तर कर्ज काढू पण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असंही अजित पवार म्हणाले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय होईल, असंही पवार म्हणाले.
शेतीच्या नुकसानीबरोबर रस्ते, पूल वाहून गेल्यानंदेखील नुकसान झालं आहे. त्याची माहिती घेतली जात असल्याचं पवारांनी सांगितलं. तसंच केंद्रानं पिकविम्याचे पैसे द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.