रांजणगावाचा महागणपती

बुधवार, 10 एप्रिल 2024 (08:15 IST)
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.
 
मंदिर
रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला "महोत्कट' असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 
सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे सांगतात.
 
पौराणिक कथा
आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने "प्रणम्य शिरसा देवम्‌' या श्‍लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.

पुणे-अहमदनगर रस्त्यावर व पुण्यापासून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती