अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मात्र त्या मागील कारण ते काय आहे? सोने खरेदी करताना या गोष्टी ध्यानात घ्या

शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (18:09 IST)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, वाहन, घर, दुकान, फ्लॅट, प्लॉट इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया २२ एप्रिलला म्हणजेच शनिवारी साजरी होणार आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी मोठ्या संख्येने लोक सोने खरेदी करतात. पण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ का मानले जाते? यामागचे कारण काय आहे? जाणून घेऊ…

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचा शुभ मुहूर्त
ऋषिकेश पंचांगानुसार, अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदीला विशेष महत्त्व आहे. शनिवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ८:०४ वाजल्यापासून रविवार, २३ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत सोनेखरेदीचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी दागिने खरेदी करून परिधान केल्यास अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. हा २४ तासांचा काळ त्रेतायुगाचा योग बनवतो. यामध्ये भगवान परशुरामांचा जन्म झाला. हा मुहूर्त वर्षातून एकदा येतो.
 
सोने खरेदी करताना या गोष्टी ध्यानात घ्या -
 
सोन्याचा भाव
- प्रत्येक शहरात सोन्याचा भाव बदलता असतो. महाराष्ट्रात जळगाव येथील सोन्याचा भाव हा आधारभूत मानला जातो. मात्र इबजा संघटनेने घोषित केलेल्या भावात स्थानिक कर, जीएसटी, घडणावळ इ. मिळवल्यावर ग्राहकाला किरकोळ (रिटेल) भाव मिळतो.
- प्रत्येक शहरात सोन्याचा भाव सकाळी व सायंकाळी असा दोनदा बदलतो.
- दागिने घडवणाऱ्या कारागीरांचे मानधन शहरानुसार बदलते असल्याने एकाच प्रकारचा दागिना शहरानुसार वेगवेगळ्या भावात मिळू शकतो.
 
सोन्याची शुद्धता-
- सोन्याचे दागिने किंवा नाणी तयार करताना त्यात काही संयुगे मिसळली जातात. त्यावरून सोन्याची शुद्धता ठरते.
- कॅरेट व गुणवत्ता या दोन गोष्टी या मौल्यवान धातूसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, २४ कॅरेट ही सोन्याची अत्युच्च शुद्धता मानली जाते.
- सोन्याचे दागिने व नाणी ही बऱ्याचदा १४ किंवा १८ कॅरेटमध्येही उपलब्ध होतात.
 
घडणावळ-
- सोन्याच्या भावावर सराफांकडून मेकिंग चार्जेस किंवा घडणावळ आकारली जाते.
- दागिना घडवणे हा कारागीरांवर आणि त्यांच्यात असलेल्या कसबावर अवलंबून असलेला उद्योग आहे. प्रत्येक दागिना स्वतंत्र घडवावा लागत असल्यामुळे त्यासाठी मेहनत खूप लागते. परिणामी, सोन्याच्या भावावर तुम्हाला दागिना घेताना ८ ते १० टक्के अधिक किंमत द्यावी लागण्याची शक्यता आहे.
- गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असाल तर ते नाणे किंवा चिप, बिस्किट या स्वरूपात खरेदी करावे.
 
घट व त्यासाठीचे शुल्क-
- सोने वितळून व कापून दागिना बनवला जातो. दागिन्यासाठी विशिष्ट आकार देताना काही सोने वाया जाते. दागिन्याच्या एकूण किंमतीत सराफ या वाया जाणाऱ्या सोन्याची किंमतही घेतात. याला घट म्हणतात.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दागिना घडवताना येणारी घट कमी करता येत असली तरी घटसाठी शुल्क द्यावेच लागते.
 
अंतिम किंमत-
- सोन्याचा ग्राहक म्हणून तुम्हाला मिळणारा भाव हा अनेक घटकांचे मिश्रण असतो.
- दागिन्याची अंतिम किंमत = निव्वळ सोने ज्या दिवशी खरेदी केले त्या दिवसाचा भाव x सोन्याचे वजन + घडणावळ + घट + एकूण किंमतीवर ३ टक्के जीएसटी
 
ज्योतिषाचार्यांच्या मते, पौराणिक कथा आणि आख्यायिकांनुसार, ब्रह्मदेवाचा पुत्र अक्षय याचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. म्हणूनच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या तिथीला कोणतेही शुभ कार्य केले तरी त्याचे चौपट फळ अक्षय्य राहते. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच कधीच क्षय न पावणारा, म्हणजे नाश न पावणारा, असा होतो. सोने आणि दागिने हे लक्ष्मीचे भौतिक रूप मानले जाते, ज्यांच्यावर लक्ष्मीमातेचा विशेष आशीर्वाद असतो. 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती