सोन्याच्या जेजुरीनगरीत माउली विसावली

सोमवार, 1 जुलै 2019 (11:28 IST)
वारी हो वारी ।
देई का गां मल्हारी ॥
त्रिपुरीरी हरी ।
तुझ्या वारीचा मी भिकारी ॥
 
सोपानदेवांच्या सासवडनगरीचा निरोप घेऊन जेजुरीकडे मार्गस्थ झालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जेजुरी नगरीत आगमन होताच जेजुरीवासियांनी बेलभंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले.
 
पहाटे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने माउलींच्या पादुकांची विधिवत पूजा करून हा सोहळा सकाळी जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा 10 वाजता बोरावके मळा पोहोचला. येथे वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी घेतली. सकाळी 10.30 वाजता सोहळा दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी यमाई शिवरीकडे मार्गस्थ झाला. बोरावके मळा येथे हिरवीगार फळा फुलांच्या मळ्यातून मार्गक्रमण करीत सोहळा दुपारी 12.15 वाजता यमाई शिवरी येथे पोहोचला. रविवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरु होती. अशा वातावरणच वारकरी मार्गक्रमण करीत होते. दुपारी यमाई शिवरी येथे सोहळा पोहोचताच पावसाचा जोर वाढला. या पावसातच वारकर्‍यांनी दुपारचे भोजन घेतले. सुमारे एक तास पावसाने वारकर्‍यांना झोडपले. भोजन व विश्रांतीनंतर हा सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी 3.30 वाजता तो साकुर्डे येथे पाहोचला.
 
जेजुरीसमीप येताच दिंड्यादिंड्यांमधून मल्हारीचे गुणगान करणारे संतांचे अभंग गायले जात होते. वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. टप्पा लहान असल्याने वारकरी न थकता मार्गक्रमण करीत होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या रेनकोटचा वापर वारकर्‍यांना आजच्या वाटचालीत झाला. दिवसभर पावसाची भुरभुर सुरु होती. 
 
जेजुरीनगरीत माउलींचे अश्व सायंकाळी 5 वाजता तर पालखी सोहळा सायंकाळी 5.30 वाजता जेजुरी हद्दीत पोहोचला. जेजुरी हद्दीत सोहळा येताच जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपाध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, मुख्याधिकारी संजय केदार, मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड.अशोक सपकाळ, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, राजकुमार लोढा, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे यांच्यासह जेजुरी नगरवासियांनी बेलभंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत सोहळ्याचे उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. संपूर्ण सोहळ्यावर भंडारा उधळल्याने सोहळ्याला सोन्याची झळाळी आली होती. येथील स्वागत स्वीकारून सायंकाळी साडेसहा वाजता सोहळा पालखीतळावर पोहोचला. आरतीनंतर सोहळाजेजुरी मुक्कामी विसावला. आज (सोमवारी) हा सोहळा सकाळी वाल्हे येथे मुक्कामासाठी  मार्गस्थ होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती