Lamine Yamal: युरो 2024 मध्ये 16 वर्षाच्या सुपरस्टारचा उदय, ऐतिहासिक गोल आणि स्तुतीसुमनांचा वर्षाव
बुधवार, 10 जुलै 2024 (21:00 IST)
युरोपियन चॅम्पिअनशिपमध्ये दरवर्षी एखादा गोल असा होतो की ज्याची दीर्घकाळ आठवण राहते, तो वारंवार रिप्ले करून पाहिला जातो, आणि दशकानुदशकं त्याची चर्चा होते.
मार्को वॅन बेस्टन ने 1988 च्या युरो कप मध्ये असाच एक गोल केला होता. पॉल गास्कॉईन चा 1996 मधला रन अँड फिनिश हाही एक प्रकारचा गोल होता. त्याच स्पर्धेत कारेल पोबोरोस्कीने अशीच उल्लेखनीय कामगिरी केली होती.
लामिन यमालने युरो कप 2024 च्या सेमी फायनलमध्ये असाच एक ऐतिहासिक गोल केला. त्याचीही नोंद आता इतिहासात होईल.
स्पेन 1-0 ने पिछाडीवर होता, त्याने बॉक्सच्या बाहेरुन टॉप कॉर्नरवरून एक स्ट्राईक केला आणि इतिहासात त्याची नोंद झाली.
16 वर्षं 362 दिवसांचा हा तरुण या स्पर्धेत गोल सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. ज्यांनी हा गोल पाहिला त्यांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली.
“एक सुपरस्टार जन्माला आला आहे.” असं इंग्लंडचे माजी स्ट्रायकर गॅरी लिनकर बीबीसी वन शी बोलताना म्हणाले. “तो या मॅचमधला सर्वोच्च क्षण होता, कदाचित स्पर्धेतला सर्वोच्च क्षण होता.”
“अविश्वसनीय” असं इंग्लंडचे माजी स्ट्रायकर अलन शेरेर म्हणाले. “आम्ही त्याच्याबद्दल संपूर्ण स्पर्धेत बोलत आहोत आणि तो किती तरुण आहे. या वयात हे करणं म्हणजे फारच भारी आहे.”
जिनियस किक
तो अविश्वसनीय गोल पाहून मैदानात बसलेले प्रेक्षक आणि जगभरातील प्रेक्षक स्तब्ध झाले.
जेव्हा गोल झाला तेव्हा वेगामुळे त्याची वैशिष्ट्यं लक्षात आली नाही, मात्र जेव्हा स्लो मोशनमध्ये जेव्हा तो पाहिला तेव्हा लक्षात आलं की हा अद्भुत गोल आहे.
या महत्त्वाच्या स्पर्धेत यमालची टीम 1-0 ने पिछाडीवर होती. सर्व खेळाडू दबावाखाली खेळत होते. त्यातच या गोलमुळे हा तणाव कुठल्या कुठे पळाला.
या सामन्यात कुठेही यमालच्या चेहऱ्यावर तणाव दिसला नाही.
सेमीफायनल सुरू होण्याच्या काही तास आधी तो मैदानावर इतर खेळाडूंबरोबर हास्यविनोद करताना दिसला. आपल्या खेळातही त्याने हा आत्मविश्वास कायम ठेवला.
स्पेनचे फुटबॉल कोच बॉस लुईस डी ला फुएंते यमालच्या गोलबद्दल म्हणाले, “आम्ही एक जिनिअस गोल पाहिला आहे. आम्ही त्याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. मला वाटतं की त्याने असंच नम्र रहावं, शिकत रहावं आणि आपले पाय सतत जमिनीवर असू द्यावे.”
ते म्हणाले, “मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की यमाल त्याच्या वयापेक्षा अधिक अनुभवी वाटतो. तो आमच्या टीममध्ये आहे याचाच मला फार आनंद आहे.”
“माझा यमाल वर विश्वास आहे. येत्या काही काळात तो खेळाचा असाच आनंद घेऊ शकेल असा आम्हाला विश्वास आहे.”
यमालला प्रत्येक परिस्थितीत जिंकायचंय
यमाल आता आंतरराष्ट्रीय मंचावर त्याची छाप सोडत आहे. मात्र तो ज्या बार्सिलोना क्लबकडून खेळतो तिथे त्याने आधीच आपली छाप उमटवली आहे.
तो त्याच्या टीमचा सर्वांत कमी वयाचा आणि गोल स्कोरर झाला आहे. या आधी तो स्पेनच्या 'ला लीगा' मध्ये सर्वांत कमी वयाचा स्कोरर झाला होता.
यमाल 13 जुलैला 17 वर्षांचा होईल म्हणजे युरो कपच्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी.
आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मी फक्त विजयावर लक्ष केंद्रित कऱणार आहे असं तो म्हणाला. यावरून त्याची विचारसरणी दिसून येते.
अंतिम फेरीत स्पेनचा सामना इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातल्या विजेत्याशी होईल.
मात्र सामन्यात कोणतीही टीम असली तरी त्यांना एकच सल्ला आहे की त्यांनी या युवकाला उकसवायला नको. कारण फ्रान्सच्या विरूद्धच्या सामन्यात त्यांचा मिडफिल्डर एडरियां राबियो म्हणाला की यमाल आतापर्यंत स्पर्धेत जसा खेळला आहे त्यापेक्षा चांगलं खेळणं अपेक्षित आहे.
मॅचनंतर यमालने टीव्ही कॅमेऱ्याकडे पाहून ओरडून म्हटलं, “आता बोला, आता बोला”
इंग्लंडचा माजी डिफेंडर रियो फर्डिनेंट म्हणतात, “असं वाटत होतं की यमालने राबियोला पाहिलं आहे आणि विचार करतोय की थांब आता तुला दाखवतोच.”
“या मुलाने अद्भुत गोल केला.”
यमाल सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. तेव्हा पत्रकारांनी त्याला विचारलं की, “आता बोला” हे वक्तव्य कोणासाठी होतं?
तो म्हणाला, “ज्याच्यासाठी बोललो त्याला कळलंय की मी हे त्याच्यासाठी बोललोय.”
“आपल्या टीमसाठी गोल करणं आणि फायनल मध्ये जाणं एक स्वप्न साकार केल्यासारखं आहे.”
मैदानात जसा आत्मविश्वास आहे तसाच आत्मविश्वास त्याचा पत्रकार परिषदेतही दिसला. आता त्याचा फोकस अंतिम सामन्यावर आहे.
फायनल इंग्लंड बरोबर खेळण्याची इच्छा आहे की नेदरलँड या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, “मला काही फरक पडत नाही. अंतिम फेरीत तुम्हाला चांगलं खेळणं भाग आहे. मग समोर कोणीही असो. आम्ही नेटाने लढू”