गौतम गंभीर टीम इंडियाचा नवीन मुख्य प्रशिक्षक; अशी आहे गंभीरची कारकीर्द

बुधवार, 10 जुलै 2024 (09:51 IST)
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा माजी खासदार गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच T20 क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्यानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर BCCI नवीन प्रशिक्षकाच्या शोधात होती.
 
मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचं जाहीर केलं आहे.
 
गौतम गंभीर 2019 साली पूर्व दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आला होता. पण गंभीरने राजकारणातून निवृत्त होऊन क्रिकेटकडेच पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला यावेळी खासदारकीचे तिकीट देण्यात आलं नव्हतं.
 
आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्याने भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्याकडे केली होती.
 
टीम इंडियाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची कामगिरी कशी असेल हे तर आपल्याला येत्या काळात समजेलच. पण आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासाविषयी बीबीसी प्रतिनिधी पराग फाटक यांनी 2018मध्ये लिहिलेला लेख आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.
 
गौतम गंभीरचा प्रवास
एप्रिल फूलनंतरचा पुढचा दिवस- 2 एप्रिल. वर्ष होतं 2011. यजमान वर्ल्डकप जिंकू शकत नाही ही तेव्हाची कटू आकडेवारी बाजूला सारण्यापासून भारतीय संघ एक विजय दूर होता.
 
शेरास सव्वाशेर संघांचे अडथळे पार करत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. देशवासियांना विश्वविजेतेपदाची आस लागली होती.
आपण वर्ल्डकप जिंकणार या आशेने खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यात टीव्ही आणि रेडिओ सज्ज झाले होते.
 
मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी जमू लागली होती. ढोल-ताशे, झांजा, व्हुव्हुझुएला यांनी परिसर निनादून गेला होता.
 
मॅचआधी जनगणमन सुरू झालं तेव्हाच आजचा दिवस काहीतरी विशेष आहे हे जाणवू लागलं होतं. फायनलमध्ये आव्हान होतं सख्खे शेजारी श्रीलंकेचं.
 
त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली. कॅप्टन माहेला जयवर्धनेच्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने 274 धावांची मजल मारली. हे लक्ष्य गाठण्यासारखं आहे असा विश्वास वातावरणात दिसत होता.
 
इंडिया इंडिया या नाऱ्याचा जोर कायम होता. आपली इनिंग्ज सुरू झाली. धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग शून्यावरच तंबूत परतला. ज्याच्यासाठी वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न देशवासीयांनी पाहिलं त्या सचिन तेंडुलकरच्या बॅटची कड घेऊन चेंडू कीपरच्या हातात विसावला आणि वानखेडेवर अस्वस्थ शांतता पसरली.
 
हसरं-खिदळणारं स्टेडियम एकदम चिडीचूप झालं. टीव्हीसमोर बसलेल्या मंडळींमध्येही आता कठीण आहे अशी भावना होती. पिचवर नव्या सहकाऱ्याची वाट पाहणारा गौतम गंभीर खंबीरपणे उभा होता.
 
बॅटिंग करताना बाहेर येणारी त्याची जीभही तशीच होती. गंभीरने सराईतपणे इनिंग्ज रचायला सुरुवात केली. अब्जावधी देशवासीयांच्या आशाआकांक्षा आपल्यावर एकवटल्या आहेत, याचं दडपण त्याच्या खेळात जाणवत नव्हतं. थोडा वेळ साथ देऊन विराट कोहली परतला.
 
मुरलीधरनचा धोका ओळखून महेंद्रसिंग धोनी पिचवर अवतरला. गंभीर-धोनी जोडीने हळूहळू पराभवाचा धोका दूर केला आणि मग विजयाची वीट रचायला सुरुवात केली. या जोडीने विजयासाठी ऑटोमोड अंगीकारला होता.
 
स्टेडियममध्ये उत्साह नांदू लागला. वाद्यं झणझणू लागली. आता गंभीरचं शतक साजरं करूया या तयारीत चाहते होते. शतकाच्या उंबरठ्यावर थिसारा परेराच्या चेंडूला दूरवर फेकण्याचा गंभीरचा प्रयत्न फसला आणि चेंडू स्टंपवर जाऊन आदळला. जिंकून देण्याचा त्याचा इरादा अपुरा राहिला होता. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने निराशेने उडवलेलं हेल्मेट आजही स्मरणात आहे.
 
गंभीरचं अपुरं राहिलेलं काम धोनीने पूर्णत्वास नेलं. त्याने मारलेला तो विजयी षटकार आणि समालोचक रवी शास्त्रीचे शब्द आजही अनेकांच्या हृद्यात कोरलेले आहेत.
 
करिअरमधल्या सर्वोत्तम फिनिशर खेळीसाठी धोनीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. धोनीनेच वर्ल्डकप उंचावला. पाणावलेल्या डोळ्यांनी वर्ल्डकप न्याहाळणारा सचिनही जगाने पाहिला. नायकपण निभावूनही गंभीर उपनायक म्हणूनच नोंदला गेला.
 
दिल्लीचा बटू
पंधरा वर्षांपूर्वी दिल्लीचा हा बटुमूर्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर अवतरला. दिल्लीकर असल्याने उपजत आत्मविश्वास. त्याला बेडरपणाची मिळालेली जोड. त्यामुळे कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची सदैव तयारी.
 
डावखुऱ्या बॅट्समनकडे असणारी स्टाईल त्याच्या बॅटिंगमध्येच होती. या शैलीला अफलातून टायमिंग आणि अखंड मेहनतीची साथ मिळाल्याने गंभीरला खेळताना पाहणं नेहमीच पर्वणी असे.
 
क्रिकेटविश्वात ओपनिंगला येणं नेहमीच अवघड मानलं जातं. नवा कोरा लाल किंवा पांढरा बॉल आणि ताज्या दमाचे बॉलर्स यांना सामोरं जाणं धाडसाचं काम.
 
या दोन गोष्टींना खेळपट्टीची साथ असेल तर फेफे उडण्याचीच शक्यता जास्त. पण गंभीरने उणीपुरी पंधरा वर्षं हे शिवधनुष्य समर्थपणे पेललं.
 
ओपनर विजयाचा पाया रचू शकतात. टीम इंडियाचा विजयरथ घोडदौड करत असताना गंभीर वर्षानुवर्ष पायाचा दगड झाला होता. म्हणूनच विजयरूपी कळस उभे राहत गेले.
 
विदेशात चांगली कामगिरी असणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये गंभीरचं नाव घेतलं जातं. नेपियरच्या बोचऱ्या थंडीत कसोटी वाचवण्यासाठी 16 तास किल्ला लढवत गंभीरने साकारलेली शतकी खेळी अतुलनीय मानली जाते. भारतीय संघाने टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. त्यामध्ये गंभीरची भूमिका कळीची आहे.
 
गंभीरने वर्चस्व गाजवत धावा केल्या. कधीही शामळूपणा पत्करला नाही. बारावीनंतर 'आर्मी की क्रिकेट' या पेचात टाकणाऱ्या प्रश्नावेळी गंभीरने क्रिकेटची निवड केली.
 
शाब्दिक लढाया
'सचिन तेंडुलकर-राहुल द्रविड-VVS लक्ष्मण-सौरव गांगुली' या फॅब फोरच्या काळातच गंभीर उदयास आला. या चौकडीत वीरेंद्र सेहवाग नावाच्या स्फोटकाची भर पडली.
 
आजूबाजूला दिग्गजांची मांदियाळी असताना त्या वलयाने हरवून न जाता स्वत्व टिकवणं अवघडच पण गंभीरने ते जपलं. त्याने कोणाचीही शैली कॉपी केली नाही, त्याला कोणासारखं व्हायचं नव्हतं.
 
ओपनिंग बॅट्समन या भूमिकेत तो शिरला. भूमिकेचे सगळे कंगोरे आत्मसात केले. प्रत्येक हंगामागणिक तो या भूमिकेत परिपक्व होत गेला.
 
म्हणूनच भारताच्या दोन वर्ल्डकपविजेत्या संघात (2007 ट्वेन्टी-20 आणि 2011 वनडे वर्ल्डकप) त्याची भूमिका मोलाची होती. भारताच्या सर्वोत्तम ओपनिंग पेअर यादीत सेहवाग-गंभीर जोडीचं नाव आजही अग्रणी आहे.
 
भारतीय क्रिकेटचा हा शूर शिपाई शाब्दिक युद्धांसाठीही प्रसिद्ध आहे. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन यांच्याबरोबरची गंभीरची वाक्युद्धं युट्यूबवरच्या प्रचंड लोकप्रिय आहेत.
 
करिअरमध्ये कधीही कमी उंचीचा बाऊ केला नाही. नायकत्व मिरवता येत नसल्याची तक्रार केली नाही. फायरब्रँड पद्धतीने खेळत राहिला म्हणूनच निवृत्तीच्या घोषणेनंतर जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना रुखरुख लागून राहिली.
 
टीम इंडियाव्यतिरिक्त IPL स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स संघाचं नशीब घडवण्यात गंभीरचा सिंहाचा वाटा आहे. अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री जुही चावला यांचं सहमालकत्व असलेला हा संघ सुरुवातीच्या हंगामांमध्ये चाचपडत होता.
 
शाहरुखने गंभीरला ताफ्यात समाविष्ट केलं, त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं. विविध भाषा, संस्कृती असलेल्या असंख्य खेळाडूंची मोट गंभीरने बांधली. जिंकण्याइतकंच प्रोसेसचं महत्त्व बिंबवलं. दोन जेतेपदांसह गंभीरने शाहरुखचा विश्वास सार्थ ठरवला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यग्र झाल्यानंतरही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गंभीरने दिल्ली संघासाठी खेळण्याला प्राधान्य दिलं. स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचा दबदबा निर्माण करण्यात गंभीरचा वाटा आहे. दिल्ली संघातल्या अनेक युवा खेळाडूंसाठी 'गौतमभैय्या' मेंटॉर आहे.
भारतीय क्रिकेटपटू सेलिब्रेटी गटात मोडतात. सेलिब्रेटी झाल्यावर मनस्वी राहता येत नाही असं म्हणतात. गंभीर या थिअरीला ठोस अपवाद आहे. तो कधीच बनचुका झाला नाही.
देशभक्ती अन्'शाब्दिक दहशतवाद'
ट्विटर हँडलवर गंभीर स्वत:ची ओळख 'Father.Cricketer.Patriot.' अशी करून देतो. गंभीरचं आर्मीप्रती प्रेम आजही जाज्वल्य आहे. सोशल मीडियावर भारतीय लष्कराप्रती काहीबाही बोलणाऱ्यांचा गंभीर खरपूस समाचार घेतो. पण फक्त बोलून गंभीर थांबत नाही.
काही महिन्यांपूर्वी छत्तीसगढमधल्या सुकमा इथं माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPFच्या 25 जवानांचा मृत्यू झाला होता. या सर्व जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी गंभीरने उचलली आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या भीषण प्रदूषणासाठी त्याने राजकीय पक्षांना फटकारलं होतं. काही दिवसांपूर्वी भारत-वेस्टइंडिज मॅच कोलकाता येथे झाली. प्रसिद्ध इडन गार्डन्सवर मॅचआधी घंटानाद करण्यात येतो. माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला त्यावेळी बोलावण्यात आलं. मॅचफिक्सिंगप्रकरणी दोषी आढळलेल्या अझरुद्दीनला तिथे पाहून गंभीर संतापपूर्ण ट्वीट केलं होतं.
त्याने राजकारण्यांवर टीका केल्यामुळे त्याच्यावरही सोशल मीडियावर टीका झाली. तो रिटायरमेंटनंतर राजकारणात जाणार असून आतापासूनच त्यासाठी बॅटिंग करत आहे, असं लोकांनी म्हटलं.
ऑस्ट्रेलियन पत्रकार डेनिस फ्रीडमन यांनी गंभीरला 'शाब्दिक दहशतवादी' म्हटलं होतं. भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं बंद करावं, एवढं बोलून गंभीर थांबला नव्हता. भारताने सर्व क्षेत्रात पाकिस्तानशी संबंध तोडावेत, असं विधान गंभीरने केल्यानंतर फ्रीडमन यांनी ही टीका केली होती.
स्वत:ला देशभक्त म्हणणारा गंभीर, भगत सिंहांना मानतो. त्यांच्या जयंतीदिनी मी 'B पॉझिटिव्ह' म्हणजे भगत पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलं होतं.
रोखठोक बोलण्यामुळे DDCA अर्थात दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि गंभीर यांच्यातला कलगीतुरा वर्षानुवर्ष कायम आहे.

Published By- Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती