रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर हे '3' परिणाम होणार

बुधवार, 9 मार्च 2022 (11:15 IST)
- सरोज सिंग
युक्रेनवर रशियाने हल्ला केला, तर त्याचा थेट परिणाम भारतावरसुद्धा होईल, असं आधीपासूनच बोललं जात होतं. आता ते वास्तवात उतरताना दिसतं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. स्वाभाविकपणे याचा परिणाम येत्या काही दिवसांत भारतावरही होईल.
 
भारतीय रुपयासुद्धा या संकटामुळे गर्तेत अडकला आहे. रशियाने 2424 फेब्रुवारीला युक्रेनमध्ये 'विशेष सैनिकी मोहीम' सुरू करण्याची घोषणा केली. त्या वेळी सुरू झालेल्या युद्धाला 13 दिवस उलटत असताना भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचे परिणाम होताना दिसत आहेत.
 
डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन आहे. 7 मार्चला हा विनिमय दर नीचांकी गेला होता. त्या दिवशी एका डॉलरचं मूल्य 77 रुपयांपर्यंत गेलं होतं.
 
चलन म्हणून रुपया कमकुवत झाल्याचा थेट परिणाम आपल्या सर्वांच्या जगण्यावर पडतो.
 
रुपया आणि डॉलर
रुपया आणि डॉलर यांच्यातील समीकरण समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा, एकाकडे 67 हजार रुपये असतील व दुसऱ्याकडे एक हजार डॉलर आहेत, आणि एका डॉलरचा भाव 67 रुपये इतका आहे. अशा वेळी पहिल्या व्यक्तीकडील रुपयांचा आकडा मोठा दिसत असला, तरी त्याच्याकडील आर्थिक मूल्य दुसऱ्या- म्हणजे डॉलरधारक व्यक्तीइतकंच असेल.
 
आंतरराष्ट्रीय व्यापार मुख्यत्वे डॉलरमध्ये होतो, त्यामुळे कोणत्याही देशाकडे डॉलर असणं अत्यावश्यक ठरतं. डॉलरच्या तुलनेत एखाद्या देशाच्या चलनाचा विनिमय दर ठरतो, त्यामागे विविध कारणं असतात. संबंधित देशाकडील परकीय चलनाचा साठा किती आहे आणि आयातीच्या तुलनेत निर्यात किती आहे, ही त्यातील दोन प्रमुख कारणं आहेत.
 
रुपया कमकुवत झाला की डॉलर मिळवण्यासाठी जास्त रुपये भरावे लागतात. म्हणजे आपण परदेशात जात असलो आणि डॉलरची आपल्याला गरज असली, तर आधी 67 रुपये देऊन एक डॉलर मिळत होता, त्याऐवजी आता एका डॉलरकरता 77 रुपये भरावे लागतील.
 
रुपयाचं अवमूल्यन होण्यामागील कारणं
सौदी अरेबिया, रशिया व अमेरिका, हे जगातील तीन सर्वांत मोठे तेलउत्पादक देश आहेत.
 
जगातील 12 टक्के तेलउत्पादन रशियामध्ये, 12 टक्के सौदी अरेबियामध्ये आणि 16 ते 18 टक्के तेलउत्पादन अमेरिकेमध्ये होतं.
 
या तीनांपैकी दोन मोठे देश युद्धग्रस्त परिस्थितीत एकमेकांना सामोरे गेले, तर स्वाभाविकपणे जगभरातील तेलपुरवठ्याला त्याचा फटका बसेल.
 
भारत 85 टक्के तेल आयात करतो, त्यातील बहुतांश आयात सौदी अरेबिया आणि उर्वरित आखाती देशांकडून केली जाते.
 
जगातील बहुतांश देश डॉलरमध्येच वस्तूंची खरेदी-विक्री करतात. त्यामुळे डॉलरला जागतिक चलनाचा दर्जा मिळाला आहे.
 
अर्थशास्त्राचे प्राध्यापक अरुण कुमार म्हणतात, "आता भारताला 85 टक्के तेल आयात करायला जास्ती रुपये खर्च करावे लागतील, त्याचा परिणाम परकीय चलनाच्या साठ्यावर पडेल."
 
दुसरीकडे, अनिश्चततेच्या काळात लोक जास्त प्रमाणात सोनं विकत घेतात. त्यामुळे सध्या सोन्याची आयात खूप वाढली आहे.
 
या दोन गोष्टींवर भारताचा जास्त खर्च होत असल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होतो आहे.
 
रुपयाचं मूल्य घटल्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम
 
1. महागाईत वाढ
रुपयाचं अवमूल्यन झालं की भारत इतर देशांकडून ज्या काही वस्तू घेतो त्यांच्या किंमती वाढतील.
 
ज्येष्ठ पत्रकार आलोक जोशी म्हणतात, "आयफोन, इलेक्ट्रॉनिक्सचं इतर सामान, ऑटोमोबाइल क्षेत्रातील सुटे भाग, परदेशात शिकायला जाण्यासाठीचा खर्च, या सगळ्याबाबतीत महागाई वाढेल. रंग तयार करण्यासाठी कच्चं तेल वापरलं जातं. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात रंगांची किंमत 50 टक्क्यांनी वाढली."
 
याशिवाय, स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या वस्तूंवरही याचा परिणाम होतो.
 
युद्धामुळे तेलाचे दर वाढले, तेलाचे दर वाढल्याचा थेट परिणाम पेट्रोल व डिझेलच्या किंमतींवर होतो. अन्नधान्य शेतांमधून कारखान्यांपर्यंत, कारखान्यांमधून दुकानांपर्यंत पोचवण्यासाठी वाहनं वापरली जातात आणि वाहनं पेट्रोल नि डिझेलवर चालतात.
 
यामुळे सर्व अन्नपदार्थ महाग होतील. परिणामी, आपल्या खिश्यावरचा भार वाढेल.
 
"कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींचा थेट परिणाम आता खाद्य तेलावर होऊ लागला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये खाद्य तेलाचा वापर इंधन म्हणून होतो आहे. भारतात ब्लेडिंगसाठी इथेनॉलचा वापर केला जातो, तसं जगभरातील इतर काही देशांमध्ये पाम तेलाचा वापर करून ब्लेडिंग केलं जातं. परिणामी, खाद्य तेलाच्या किंमतीसुद्धा वाढतील," असं आलोक जोशी सांगतात.
 
2. गुंतवणूक कमी होईल
प्राध्यापक अरुण कुमार म्हणतात, "महागाईचा परिणाम गुंतवणुकीवर होतो. वस्तू महागल्या, तर लोक गुंतवणूक करायला धजावणार नाहीत. गुंतवणूक कमी झाल्याचा थेट परिणाम रोजगाराच्या संधींवर पडतो. लोकांकडे गुंतवणुकीसाठी पैसा पुरेसा नसेल, तर नोकऱ्यांची संख्या कमी होते आणि नोकऱ्या कमी झाल्याचा परिणाम म्हणजे बेरोजगारीत वाढ व देशाच्या विकास दराची अधोगती."
 
3. विकास दरात घट
प्राध्यापक अरुण कुमार यांच्या म्हणण्यानुसार, विकास दराचा थेट संबंध गरीब समाजघटकांशी असतो. विकास दर कमी झाला तर आर्थिकदृष्ट्या खालच्या थरातील लोकांचं उत्पन्नही कमी होईल. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रावर होईल. कोरोनाच्या जागतिक साथीनंतर आता अर्थव्यवस्था पूर्ववत होण्याची आशा व्यक्त केली जात होती, पण याबाबत विपरित परिणाम दिसू शकतात.
 
रुपयाचं अवमूल्यन झाल्याचा काही फायदाही होईल का?
प्राध्यापक अरुण कुमार म्हणतात, "डॉलर बळकट झाल्याचा सकारात्मक परिणाम निर्यातदारांवर होतो." या संदर्भात ते एक उदाहरण देतात:
 
युक्रेन आणि रशिया हे जगातील गव्हाचे मोठे निर्यातदार देश आहेत. सध्या हे दोन देश युद्धात गुंतलेले असल्यामुळे भारतातील निर्यातदारांची सुगी होण्याची शक्यता आहे. भारतात गव्हाचा दर किमान हमीभावाहून जास्त झालेला आहे. भारतीय निर्यातदारांनी इतर देशांना गहू विकला, तर त्याची किंमत त्यांना डॉलरमध्ये मिळेल. यातून त्यांचा लाभ होईल. पण यामुळे भारतीय बाजारातील गव्हाच्या किंमती वाढण्याचीही शक्यता आहे.
 
रुपयाचं अवमूल्यन झालं तरी सर्वसामान्य लोकांवर त्याचा फारसा परिणाम होऊ नये, यासाठी प्राध्यापक अरुण कुमार काही उपाय सुचवतात. ते म्हणतात, "सरकारने लोकांच्या हातात जास्त पैसे जातील अशी तजवीज करावी, जेणेकरून जनतेची क्रयशक्ती वाढेल. या उपायामुळे लोकांची आर्थिक स्थिती आणखी खालावणार नाही."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती