दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिलांना स्थान मिळणार

शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (08:04 IST)
सहा महिन्यापूर्वी राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आले. मात्र, ६ महिने उलटूनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने राज्य सरकारवर मोठी टीका करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या बातम्या आल्या मात्र अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. तर दुसरीकडे, शिंदे फडणवीस सरकारने महिला मंत्र्यांना एकही पद न दिल्याने विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. मात्र, यावरून आता भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे.
 
दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिलांना स्थान मिळणार असल्याचे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. तर, लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, याबद्दल घोषणा केली जाईल असेदेखील त्यांनी सांगितले आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, मंत्रिमंडळात महिला नाहीत म्हणून त्यांचा आवाज दाबला गेला, असे म्हणणे चुकीचे आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना मोठ्या प्रमाणात पदे मिळणार आहेत. आगामी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिलांना योग्य स्थान मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. पुणे पोटनिवडणूक जवळ आली असताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती