शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया

सोमवार, 12 जुलै 2021 (08:07 IST)
नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आहे. जळगाव दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील जळगाव दौऱ्यावर असताना उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती.
 
जळगाव दौऱ्यावर असणारे एकनाथ शिंदे  उज्ज्वल निकम यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. जवळपास १५ ते २० मिनिटं उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यावेळी उज्ज्वल निकम यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
 

राष्ट्रवादीने दिली होती ऑफर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर जाण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र उज्ज्वल निकम यांनी दोन वेळा हा प्रस्ताव नाकारला होता. त्यात आता शिवसेनेकडून उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे जर ऑफर देण्यात आली असेल तर उज्ज्वल निकम काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 

उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे भेटीनंतर राजकीय वर्तुळात शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असताना उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली असून मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही असं म्हटलं आहे. “एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा झाली असून त्याचा तपशील सांगता येणार नाही. यापूर्वी मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येत असतात,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती