ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमदारांनी गोंधळ घातल्यानंतर सभागृह तहकूब केल्यानंतर सभागृह अध्यक्षांच्या केबिनमध्ये येऊन काही आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला होता. त्यावेळी खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं असल्याचे फडणवीस म्हणाले होते. मात्र आता पुण्यात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत नवी माहिती दिली आहे.
पुणे शहरातील महापालिकेच्या एसी बसच्या योजनेचे उदघाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. पत्रकाराने शिवसेना भाजपा एकत्र येणार अशी चर्चा सुरु होते त्याचवेळीच असे का होते असा सवाल केला होता. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले.
“मी अतिशय विनम्रपणे सांगतो की, भाजपाच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही. बाचाबाची झाली. सेनेचे लोकं त्या ठिकाणी होते जे आमच्या लोकांच्या अंगावर आले. शिवीगाळ करणारे कोण होते याची माहिती घ्या. मी योग्य वेळी ते सांगेलच. भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याने पिठासीन अधिकाऱ्याला धक्काबुक्की किंवा शिवीगाळ केलेली नाही. हे कुभांड आहे”,असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
१२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आल्यानंतर भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपाने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानंतर माईक जप्त करण्यात आले. त्यानंतरही भाजपा आमदारांनी पत्रकार कक्षामध्ये आपले आंदोलन सुरुच ठेवले होते.