आमदार अपात्र प्रकरण विरोधात गेल्यानंतर ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेऊन जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या सभेची सुरुवात रायगड येथून होणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता पेण शहर हायस्कूल जवळ उद्धव ठाकरेंची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता चौल (अलिबाग) तर, संध्याकाळी सहा वाजता रोहा येथे त्यांची सभा होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी म्हसळा शहर, दुपारी पोलादपूर शहर आणि संध्याकाळी माणगाव-मोर्बा रोड मैदान, माणगाव येथे ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
रायगडच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला जनसंवाद यात्रेमधून सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. 4 फेब्रुवारीला सकाळी सावंतवाडी येथे उद्धव ठाकरेंचे भव्य स्वागत केले जाणार आहे. तेथून ते किल्ले सिंधुदुर्ग येथे जातील. त्याठिकाणी ते नागरीकांशी संवाद साधणार आहेत. त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे हे आंगणेवाडी येथे श्री भराडीदेवीचे दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता राजापूर तालुक्यातील जवाहर चौकात शिवसैनिकांसमवेत ते संवाद साधतील. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास श्रीदेव धूतपापेश्वर मंदिर येथे दर्शन घेणार आहेत आणि मंदिर बांधकामाची पाहणी करणार आहेत. दुपारी 2 वाजता रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालय येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजता संगमेश्वर येथे तर संध्याकाळी 6 वाजता चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करतील.