मैदानात सराव करणाऱ्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (15:35 IST)
नागपूर जिल्ह्यातील चनकापूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे.चनकापूर येथील मैदानावर सरावसाठी  गेलेल्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली.यामध्ये दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक खेळाडू गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.अनुज कुशवाह (वय-22) आणि तन्मय दहीकर  (वय-12 दोघे रा.चनकापूर कॉलनी,सावनेर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.तर सक्षम सुनील गोठीफोडे (वय-12 रा.पाचपावली,नागपूर) असे जखमी झालेल्या खेळाडूचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चनकापूर वेकोली वसाहत परिसरातील खेळाडू चनकापूर येथील मैदानावर नियमितपणे सरावासाठी येत असतात.आजही ते आले होते. दुपारी पावणे चारच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. त्यावेळी मैदानावर काही जण फुटबॉल (Football) तर काही जण धावण्याचा (running) सराव करीत होते. सव्वा चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

पाऊस सुरु झाल्याने मैदानातील मुले शेडकडे धावली.यात धावपट्टू अनुज आणि फूटबॉलपटू तन्मय आणि सक्षम मागे राहिले.तिघेही शेडच्या दिशेने धावत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली.यामध्ये अनुज आणि तन्मय हे दोघे पूर्णत: भाजले आणि त्यांचा मैदानावरच मृत्यू झाला.तर सक्षम हा गंभीर भाजला.
 
सक्षमला उपचारासाठी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात (private hospital) दाखल करण्यात आले आहेत. मयत अनुज हा अभियांत्रिकी (Engineering) शाखेचा विद्यार्थी होती.तर तन्मय याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्याने तो आणि त्याची आई काकाकडे चनकापूर येथे राहत होते.सक्षम हा नागपूरला राहतो. त्याच्या आजीचे निधन झाल्याने तो चनकापूर येथे आजोबांकडे आला होता.याप्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल,अशी माहिती सावनेरचे तहसीलदार सतीश मसाळ  यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती