राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेतला आहे. ही व्यक्ती वेडसर असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहिती दिली असून ते म्हणाले, ती विकृती आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे याची चौकशी करण्याचं काम पोलीस करत आहेत असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर आज एका व्यक्तीने फोनवरून पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली असून पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांत अज्ञाताविरोधात भादंवि कलम 294, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहिती दिली असून ते म्हणाले, “शरद पवारांचे स्वीय सहाय्यक राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचं काम पोलीस करत आहेत.
” परंतु, त्यांचे फोन येते होते, ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. अतिशय खराब शब्द वापरत होती. दिवाळीत हे फार चालू होते. तेव्हा तक्रार केल्यानंतर ही व्यक्ती सापडली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
माजी मंत्री आणि आमदार राजेश टोपेंचा सरकारला इशारा
शरद पवार यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. ते म्हणाले, “पवार साहेबांना एक माथेफिरु फोन करून शिव्या देत असल्याची माहिती टोपे यांनी दिली. त्यामुळे या माथेफिरुचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी टोपे यांनी केली. तर पवार साहेबांच्या केसलाही धक्का लागला नाही पाहिजे, याची सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची असून शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही टोपे यांनी केली आहे.