स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, आता वॉशरुमलाही मी जाऊ नये का ?

सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (15:47 IST)
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अजित पवार  कार्यक्रम अर्धवट सोडून बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील  बोलले. त्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली. तिथे बोलायचं की नाही हे आम्ही ठरवलं नव्हतं. त्यामुळे मी बोललो नाही. त्यामुळे कारण नसताना चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या, असं अजित पवार म्हणाले. पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
 
अजित पवार स्पष्टीकरण देत म्हणाले की, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात पक्षाच्या धोरणं, पुढच्या वाटचालीबद्दल सदस्यांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील बोलले. त्यामुळे मी तिथे बोलणं टाळलं. तिथे बोलू नका म्हणून कोणी सांगितलं नव्हतं. वेळेअभावी सुनिट तटकरे बोलले नाहीत. वंदना चव्हाणही बोलू शकल्या नाहीत. मी वॉशरुमला जाण्यासाठी बाहेर आलो. आता वॉशरुमलाही जाऊ नये का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तुस्थितीत आधारित बातमी देण्याची जबाबदारी माध्यमांवर आहे. मी राज्यात गेल्यानंतर माध्यमांसमोर बोलेन, असं अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सहसा राष्ट्रीय पातळीवर मी भाषण करत नाही. मी १९९१ साली खासदार झालो. आता ३१ वर्षे पूर्ण झाली. आतापर्यंत राष्ट्रीय कार्यक्रमात मी भाषण केलं नाही. पण राज्यातील अधिवेशन, कार्यक्रम, सभांमध्ये मी सहभाग घेतो. तिथे मार्गदर्शन करत असतो.
 
मला अजिबात पक्ष डावलत नाही. कार्यक्रम बराच लांबला होता. तीन वाजेपर्यंत कोणी जेवलं नव्हतं. शरद पवारांच्या भाषणाकडे आम्ही सर्व वाट पाहत होतो. कार्यकर्ते नाराज नाही. त्यांना जे सांगायचं ते सांगितलं. त्यामुळे रुसायचा फुगायचा प्रश्नच नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती