सप्तश्रृंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले राहणार

रविवार, 14 एप्रिल 2024 (10:35 IST)
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आद्यस्वयंभू शक्तीपीठ सप्तश्रृंगी मातेच्या चैत्रोत्सवास १६ एप्रिलपासून सुरूवात आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने सप्तश्रृंगी गडावरील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चैत्रोत्सव काळात भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. महोत्सव १६ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे.
 
चैत्रोत्सव काळात अनेक भाविक दूरवरुन देवीच्या दर्शनासाठी येत असतात. अनेकदा प्रवासामुळे भाविकांना उशिर होतो त्यामुळे दर्शन घेता येत नाही. अशा भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भाविकांना २४ तासात कधीही देवीचे दर्शन घेता येणार आहे.
 
त्याचबरोबर चैत्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडावरील खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहे. तसेच महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. वाढत्या उन्हाच्या झळा टाळण्यासाठी पहिल्या पायरीसमोर मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाविकांसाठी ७ ठिकाणी आरोग्य पथके राहणार तैनात ठेवण्यात येणार आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती