मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेत रमेश बैस यांनी स्वीकारला पदभार

शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (20:49 IST)
मुंबई : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला.
 
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. शनिवारी राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली.
 
राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
 
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली
 
कोण आहेत रमेश बैस?
 
रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रमेश बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती