राज्यात आणखी कडक लॉकडाऊन लागणार - राजेश टोपे

मंगळवार, 20 एप्रिल 2021 (18:36 IST)
राज्यात असलेला लॉकडाऊन आणखी कडक केला जाणार अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे. सध्या राज्यात जागोजागी नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं शेख यांनी सांगितलं. या संबंधातली नियमावली लवकरच राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात येईल.
 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील असलम शेख यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊन लावून राज्यातील नागरिकांचे लसीकरण व्हावे अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.
 
लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं. केंद्राकडे आम्ही जास्त ऑक्सिजनची मागणी केली आहे, असं ते पुढे म्हणाले.
 
दहावीच्या परीक्षा रद्द
दहावीच्या परीक्षा रद्द होणार असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मागणी केली होती त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द व्हाव्यात असं ठरलं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. बारावीच्या परीक्षा मात्र होणार आहेत, असंही ते म्हणाले.
 
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यांकन करून त्यांनी पुढील वर्गात बढती देण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती