मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्याच्या टुनकी येथील कस्तुराबाई मंडासे या महिला तसेच त्यांची मुलगी आणि नातवंडे घरी होत्या. यावेळी त्यांचा जावई अंबादास झाल्टे हा दारु पिऊन त्यांच्या घरी आला. तसेच काही वेळा फोनवर बोलला. त्यानंतर त्याचा मोबाईल परत मागितला असता त्याने कस्तुरबाईसह मुलीला शिवीगाळ केली. तसेच मोबाईल जमिनीवर आदळून फोडून टाकला. यावेळी मोबाईल का फोडला ? असे विचारले असता त्याने कस्तुरबाईच्या मुलीला लाथाबुक्क्याने मारहण करुन जिवे मारुन टाकेल, अशी धमकी देखील दिली.
नंतर घर पेटवून देण्याची धमकी दिली. मात्र जावई अंबादास झाल्टे हा एवढ्यावरच न थांबता त्याने प्रत्यक्षपणे घर पेटवून दिले. यामध्ये कस्तुरबाई यांच्या घरातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि जीवनावश्यक वस्तू जळून गेल्या आहेत. यामध्ये सुदैवाने मुली आणि नातवंडांसह घराबाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला.हा प्रकार घडल्यानंतर कस्तुरबाई यांनी जावयाविरोधात सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी अंबादास झाल्टे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.