मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजपाने जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जरांगे यांचे आंदोलन, त्यांनी केलेले आरोप, या आंदोलनाच्या मागे असलेल्या शक्ती या सर्व बाबींची विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यामुळे विधानसभेचे कामकाज एकदा तर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. विधानसभेत अध्यक्षांनी सरकारला चौकशीचे निर्देश दिले तर विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्र अशांत करण्यामागे कोण कोण आहेत, याची एसआयटी चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करताना गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यामुळे आजपर्यंत जरांगे यांच्या बाबतीत सावध भूमिका घेणा-या सत्ताधारी मंडळींनी आक्रमक रुप धारण केले आहे. आज सत्ताधारी आमदारांनी विशेषत: भाजपा सदस्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची व त्या माध्यमातून राज्यात हिंसाचार घडवण्याच्या प्रयत्नाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित केला.
मुंबई उच्च न्यायालयाने सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अशी टिप्पणी सोमवारी केली होती. तो दाखला देत आशिष शेलार म्हणाले, मराठा समाजाच्या भावना आणि मागण्यांबाबत सर्वांचेच एकमत आहे; पण महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा कोणी करीत असेल तर त्याची दखल घ्यावीच लागेल. प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र म्हस्के यांची घरे जाळली गेली. जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल आम्हाला आक्षेप नाही; पण त्या मागे कोणत्या शक्ती आहेत? कोण कोण या कटकारस्थानामध्ये होते? कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या? याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.