शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली

बुधवार, 6 एप्रिल 2022 (18:37 IST)
महाराष्ट्रा बाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या गृहराज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. यात गडकरींशिवाय काँग्रेसचे आमदार आणि शिवसेना नेते संजय राऊतही उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 
 
वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्यातील ही भेट सुमारे 20 - 25 मिनिटं चालली. महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना लोकसभा सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 5 व 6 एप्रिल रोजी ठेवण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. 

या भेटीमध्ये राज्यपाल नियुक्त 12 सदस्य आणि संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या ईडीच्या कारवाई बाबत चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
या गोष्टी मी त्यांच्या कानावर घातल्या, त्यांची प्रतिक्रिया विचारली नाही, असं पवार यांनी मोदींनी त्यावर काय म्हटलं असं विचारल्यावर सांगितलं आहे.
 
तसंच या भेटीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं, त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, "आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही."
 
तसंच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. बिगर भाजप पक्षांची बैठक बोलवायला हवी आणि भविष्याची चर्चा करायला हवी, असं त्यांनी पुढे सांगितलंय.
 
नवाब मलिकांवरील कारवाईवर मात्र मोदींशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगत राष्ट्रवादीचा कुठलाही मंत्री बदलणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरे यांच्या विषयावर मी काही बोलू इच्छित नाही, असं यावेळ पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती