देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार

शनिवार, 18 जून 2022 (08:11 IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रातून विविध प्रकारचे शिक्षण मिळणार आहे, या उपकेंद्राच्या माध्यमातून देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
 
आज दिंडोरी तालुक्यातील शिवनाई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते. यावेळी कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, उपकुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, दिंडोरी प्रांताधिकारी संदीप आहेर, शिवनाई गावच्या सरपंच सुनंदा निंबाळकर यांच्यासह शिवनाई गावाचे गावकरी, महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
 
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला आहे. या शिक्षणात बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असून या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या प्रगतीसाठी कसा करतो हे महत्त्वाचे आहे. नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून साधारण दीड लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होणार आहे. तसेच या उपकेंद्रांची संख्या अजून वाढवून प्रत्येक घरात शिक्षण पोहोचविण्याचे काम करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शिक्षण मिळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील माहिती असणे आवश्यक असते आणि माहितीचे रूपांतर ज्ञानार्जनात करण्याचे काम या नाशिक उपकेंद्रामार्फत होणार आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे राजकारणाच्या पलीकडे जावून जनतेच्या कल्याणासाठी विचार केला तरच राज्य प्रगतीच्या वाटेवर यशस्वी वाटचाल करू शकेल, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
 
शिक्षण विकासात प्रगल्भ भारत बनविण्याची ताकद – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
 
स्वत: सोबत देशाचा विकास करून प्रगल्भ भारत बनविण्याची ताकद शिक्षण विकासात आहे. शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसून ती निरंतर चालणारी प्रक्रीया आहे. शिक्षणाच्या ज्योतीमुळे आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून प्रत्येकाने पुढे जाणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून नाशिक उपकेंद्रामध्ये कौशल्य विकास अंतर्गत वाइनरी, पैठणी बनविणे अशा स्थानिक पातळीवर असणाऱ्या उद्योगांच्या प्रशिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात शिक्षण व तंत्रज्ञानाच्या आधारे लसीकरणात संशोधन करू शकलो. आत्मनिर्भर भारत अंतर्गत आपला देश अनेक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. देशाची प्रगती अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी शिक्षण व आरोग्याची ताकद महत्त्वाची आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
 
जिल्हा नियोजनातून उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी देणार पाच कोटी – पालकमंत्री छगन भुजबळ
 
उपकेंद्रांच्या मार्फत विद्यापीठांचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. तसेच या उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी मागणी केल्याप्रमाणे पाच कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.
 
सावित्रीबाई फुलेंची विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे असतील तर शैक्षणिक प्रगती महत्वाची आहे. देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नाशिक जिल्ह्याची एज्युकेशनल हब म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या उपकेंद्रातून व्यावसायिक, औद्योगिक, संशोधनात्मक अशा विविध प्रकारच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी शिवनाई गावाने जागा उपलब्ध करून दिली त्यासाठी पालकमंत्री यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. उपकेंद्र व शिवनाई गावासाठी वीज, रस्ते, पाणी यासारख्या आवश्यक सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले आहे.
 
राज्य शासन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
 
शिक्षणाला कौशल्यपूर्ण ज्ञानाची जोड देवून विद्यार्थ्यांना स्वबळावर आयुष्य जगण्यासाठी राज्य शासन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. एखादे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असते. त्याचप्रमाणे हे उपकेंद्र उभारण्यासाठी देखील लोकप्रतिनिधी व शासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारस असल्याने तो कधीही वाईट मार्गावर जाणार नाही असा विश्वास मंत्री श्री. सामंत यांनी व्यक्त केला.
 
या उपकेंद्रात कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्राच्या सक्षमीकरणा करीता पालकमंत्री यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
 
नवीन शैक्षणिक धोरणाची तंतोतंत अंमलबजावणी करणारे आपले पहिले राज्य आहे. कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची प्रक्रीया निरंतर सुरू ठेवण्यात यश आले आहे. परंतू आता कोरोनाच्या दृष्टचक्रातून आपण बाहेर पडत असून सर्वस्तरावर सुरळीतपणा येत असल्याने आता राज्यात सर्वत्र प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाली असून परीक्षा देखील ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री छगन भुजबळ व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नाशिक उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमीपूजन करून कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगरु डॉ. कारभारी काळे यांनी प्रास्ताविकात नाशिक उपकेंद्राची व त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती