शेतीच्या वादातून सख्ख्या भावानेचा भावाच्या डोक्यात टिकाव मारल्यामुळे भावाचा मृत्यू

शुक्रवार, 17 जून 2022 (15:42 IST)
मौजे जलालपूर शिवारात शेतीच्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या भावाच्या डोक्यात टिकाव मारल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेले बळवंत यशवंत शेळके (५७, रा. यशवंतनगर, पो. मुंगसरा, नाशिक ) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मळ्याच्या बांधावरच हा वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी पुतण्याने काकाचे हात धरून ठेवले आणि सख्ख्या भावाने आपल्या भावाच्या डोक्यात टिकाव हाणला. नाशिक तालुका पोलिसांनी याप्रकरणी पुतण्या संशयित जयदीप शेळके यास ताब्यात घेतले आहे.
 
ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या बळवंत यांना त्यांचा मुलगा अक्षय व भाऊ यशवंत यांनी पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र दुपारी त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयत बळवंत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन सूना, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. या घटनेनंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित जयदीप याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. मात्र त्याचे वडील संशयित श्रीहरी व आई सुमन यांचा रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शोध घेतला जात होता.
 
हा आहे वादबळवंत यशवंत शेळके व त्यांचा सख्खा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके (६१) यांच्यात शेतीचा वाद असून तो न्यायप्रविष्ट आहेत. गुरुवारी सकाळी श्रीहरी यांचा मुलगा जयदीप व पत्नी संशयित सुमनदेखील मळ्यात होत्या. त्यावेळी बळवंत व त्यांचा दुसरा भाऊ यशवंत आणि मुलगा अक्षय शेळके हे मळ्यात जात असताना त्यांनी त्यांचा रस्ता अडविला. त्यांच्यात भांडण सुरू झाल्याने यशवंत व अक्षय या काका पुतण्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता संशयित जयदीप याने बळवंत यांना धरून ठेवले व श्रीहरी यांनी बाजूला पडलेला टिकाव उचलून त्यांच्या डोक्यात हाणला. यावेळी संशयित सुमन यांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती