नाशिककर एका बटणावर थांबवणार ट्रॅफिक; असे आहेत त्याचे फायदे

मंगळवार, 14 जून 2022 (14:32 IST)
आपल्या देशातील गेल्या काही वर्षात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास वाहन संख्येत आपल्या राज्याचा देशात खूप वरचा क्रमांक लागतो, त्यातच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या सारख्या मोठ्या शहरांमध्ये तर भरधाव वेगाने वाहने जात असतात. तसेच कोणत्याही रस्त्यावर वाहनांची सिग्नल दरम्यान मोठी गर्दी दिसून येते. परंतु सिग्नल पडण्यापूर्वी वाहने धावू लागतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होऊन बसते. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती यांना रस्ता ओलांडतांना मोठी कसरत करावी लागते. इतकेच नव्हे तर जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. मात्र आता त्यावर नाशिक शहरात एक आगळा वेगळा पर्याय शोधून काढण्यात आला आहे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडतांना सिंगल स्वतः थांबविता येणार आहे, त्यामुळे सर्वांची सोय होऊन वाहने देखील शिस्तीत जाऊ शकतील, असे सांगण्यात येत आहे.
 
शहरात सिग्नलवर भरधाव वेगाने धावणारी वाहने दिसतात, इतकेच नव्हे तर एक सिग्नल थांबत नाही तोच दुसरा पडतो. त्यामुळे सर्वसामान्य पादचाऱ्याला रस्ताच ओलांडता येत नाही. मात्र आता त्यावर नवीन स्मार्ट पर्याय नाशिक स्मार्ट सिटीने शोधला आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पेलिकन सिग्नल बसवण्यात येणार आहेत. परंतु हा प्रयोग सर्वप्रथम त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान साकारलेल्या स्मार्टरोडवर हे पेलिकन सिग्नल्स बसविण्यात येणार आहेत.
 
वास्तविक पाहता रस्त्यांवर चालणे हे पादचाऱ्यांचा पहिला हक्क मानला जातो. त्यामुळे पादचाऱ्यांचा हा हक्क अबाधित ठेवण्यासाठी परदेशात विविध संकल्पना राबविल्या जातात. तसेच नवीन रस्ता तयार करताना त्याशेजारी पदपथ असलेच पाहिजेत आणि त्याची लांबी रुंदीही पुरेशी असली पाहिजे यासाठी आता रोड डिझायनिंग संकल्पनाही राबविली जात आहे.
 
सिग्नलवर वाहनतळावर होणारी अडचण लक्षात घेऊन राबविण्यात येणारी संकल्पना प्रथमच राबविण्यात येणार आहे. मात्र स्मार्ट सिटीची संकल्पना चांगली असली तरी नाशिकमध्ये ती कशी यशस्वी ठरेल याबाबत मात्र संबंधित प्रशासनामध्ये मतभेद आहेत. नाशिकमध्ये सिग्नल असूनही त्याचा उपयोग हाेत नाही. सिग्नलचे दिवे न बघताच वाहने पळवली जातात अशावेळी पादचाऱ्याने बटन दाबून सिग्नल थांबविण्याचा प्रयत्न केला तरी तो कसा उपयुक्त ठरेल याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
 
खरे म्हणजे अनेक सिग्नलवर पादचाऱ्यांसाठी पांढऱ्या काळ्या पट्टया अर्थात झेब्रा क्रॉसिंग करून सोय केलेली असते. मात्र, तरीही वाहने त्यावर उभी राहत असल्याने रस्ता ओलांडणे कठीण होते. चहूबाजूंचे सिग्नल सुरू झाल्यानंतर पादचाऱ्यांना चालणे कठीण होते. त्यावर आता पेलिकन सिग्नलची सोय शोधण्यात आली आहे. सिग्नलवरील बटणचा वापर करून सिग्नल थांबवून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येईल असे सांगण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती