संजय राऊत यांची वाईन कंपनीत भागीदारी,शिवसेना खासदारांवर किरीट सोमय्यांचा आरोप

रविवार, 30 जानेवारी 2022 (15:13 IST)
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल्स, सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. याला भाजपचा विरोध आहे. संजय राऊत यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करत वाईन म्हणजे दारू नाही असे म्हटले होते.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत . या संदर्भात किरीट सोमय्या यांनी आज रविवारी  पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्रातील बडे उद्योगपती अशोक गर्ग यांच्या मालकीच्या मॅग्पी ग्लोबल लिमिटेड या वाईन कंपनीत संजय राऊत यांची भागीदारी आहे. या वाईन व्यवसायात त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी या कंपनीत संचालक पदावर आहेत. या कंपनीचा पब, क्लब, हॉटेल आणि वाईन वितरणाचा व्यवसाय आहे. वाईन व्यवसायात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केल्यामुळे संजय राऊत मॉल्स आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत महाराष्ट्राला ‘मद्य  राष्ट्र’ बनवण्यात गुंतले आहेत.
 
किरीट सोमय्या म्हणाले, '16 एप्रिल 2021 रोजी संजय राऊत यांच्या कुटुंबाने या कंपनीसोबत करार केला आहे. संजय राऊत यांच्या दोघी मुली या कंपनीत संचालक आहेत. त्यांचे आरोप चुकीचे असतील तर ते चुकीचे सिद्ध करून संजय राऊत यांनी दाखवावे, असे सोमय्या म्हणाले. 
 
या हल्ल्यावर संजय राऊत यांनीही सोमय्या यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
किरीट सोमय्या यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना संजय राऊत पत्रकारांना म्हणाले, 'किरीट सोमय्यांची मुले हरभरा विकतात का? अमित शहांची मुले केळी विकतात का? की देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजप नेत्यांची मुलं डान्सबार उघडून बसले आहे का ? माझा काही वायनरी व्यवसाय असेल तर भाजपच्या नेत्यांनी ते आपल्या ताब्यात घ्यावे आणि चालवावे . माझ्या मुली एका कंपनीत डायरेक्टर आहेत, मग काय बिघडलं. निदान भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या पोरासारखा अंमली पदार्थांच्या व्यवसायात तर नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती