Sameer Wankhede : समीर वानखेडे जन्माने मुस्लीम नाहीत, जातवैधता समितीचा निर्वाळा

शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (14:05 IST)
जात पडताळणी समितीने एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांना क्लीन चीट दिली आहे. समितीने दिलेल्या एका निर्णयात समीर वानखेडे जन्माने मुस्लीम नाहीत हे नमूद केलं आहे.
 
वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारलेला नाही, असंही सांगितलं आहे. तसंच ते महार-37 या अनुसुचित जातीचे आहेत असं म्हटलं आहे.
 
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गेल्या वर्षी (NCB) 2 ऑक्टोबर रोजी अटक केल्यापासून हे ड्रग्ज प्रकरण राज्यात आणि देशात गाजत होतं.
 
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट NCB चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले.
 
त्यापैकीच एक आरोप हा वानखेडे यांच्या जात दाखल्यासंदर्भात आहे. हा आरोप करताना मलिक यांनी येत्या वर्षभरात वानखेडे यांची नोकरी जाईल, असाही दावा केला होता.
 
काय आहे प्रकरण?
समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना मलिक यांनी त्यांचा कथित जन्मदाखला ट्वीट केला होता.
 
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले, "समीर वानखेडे यांचा मी दिलेला जन्माचा दाखला खरा आहे. त्यावर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद आहे. ज्ञानदेव वानखेडे जन्मानं दलित आहेत. वाशिममधून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवलं. त्याच आधारे नोकरी केली. माझगावमध्ये असताना त्यांनी स्वर्गीय झायदा खान यांच्यासोबत लग्न केलं. ते दाऊद खान बनले. दोन मुलांचा जन्म झाला. पूर्ण कुटुंब मुस्लिम धर्मीयांप्रमाणे जगत होतं."
 
"वडिलांच्या आधीच्या कागदपत्राच्या आधारावर समीर वानखेडे यांनी आपली कागदपत्रे तयार केली. बोगस कागदपत्राच्या साहाय्यानं त्यांनी एका मागासवर्गीय उमेदवाराचा अधिकार हिसकावून घेतला आहे. आम्ही हे प्रमाणपत्र जातवैधता समितीसमोर सादर करणार आहोत. वानखेडे यांच्या विरोधात तक्रार करणार आहोत. सत्य लोकांसमोर येईल," असा आरोप मलिक यांनी केलेला आहे.
 
या आरोपांना उत्तर देताना बीबीसीशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले होते, "मी हिंदू आहे. माझे वडीलही हिंदू आहेत. माझी आई मुस्लीम होती. पण आईवडिलांनी दोघांनी धर्म बदलला नाही."
 
समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपांचं खंडन करण्यासाठी त्यांचे वडीलही प्रसारमाध्यमांसमोर आले होते. ते म्हणाले, "माझं नाव दाऊद नाही. माझं नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आहे."
 
समीर वानखेडे 2008च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. त्यावर्षी ते अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रशासकीय सेवेत दाखल होते.
 
त्यामुळे त्यांनी मुस्लीम असूनही SC प्रवर्गातलं प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
 
समीर वानखेडे कोण आहेत?
समीर वानखेडे 2008च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) रूजू झाले होते.
 
CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय (CBI), नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB), नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी (NIA) यांसारखे विविध विभाग येतात.
 
त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले.
 
भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.
 
त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीतही (NIA) त्यांनी काम केलंय.
 
ऑगस्ट 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याच वर्षी वानखेडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
 
समीर वानखेडे मूळचे कुठले आहेत?
समीर वानखेडे यांचं कुटुंब मूळचं महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातलं आहे. रिसोड तालुक्यातील भरुणतोफा हे गाव वानखेडेंच मूळ गाव.
 
समीर वानखेडे यांच्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. समीर वानखेडेंचे काका शंकरराव वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना "समीरच्या वडीलांचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे," अशी माहिती दिलीये.
 
समीर वानखेडे यांचे वडील महाराष्ट्र सरकारच्या अबकारी (State Excise) विभागात कामाला होते. साल 2007 मध्ये अबकारी खात्यातून वरिष्ठ निरीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडेंचं शिक्षण मुंबईत झालं. त्यांचे वडील 1970 च्या दशकात मुंबईत कामानिमित्त आले होते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती